Month: April 2024

ठाणे मतदारसंघात पहिल्या दिवशी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

१ मेला अर्ज स्वीकारले जाणार नाहीत –  अशोक शिनगारे अशोक गायकवाड ठाणे :नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम तारीख ३ मे असून नामनिर्देशन पत्रांची छाननी  ४ मेला करण्यात येणार आहे. उमेदवारी  अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ६ मे आहे. शनिवार,२७ एप्रिल,  रविवार,२८ एप्रिल  व  बुधवार १ मे २०२४ महाराष्ट्र  दिन या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मेला होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी काल सकाळी १० वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरूवात झाली. काल दूपारपर्यंत एकूण ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. सकाळी १० वाजल्यापासून विविध पक्षाच्या उमेदवारांच्या २५ प्रतिनिधींनी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी हजेरी लावली होती. दुपारपर्यत एकूण ४३ नामनिर्देशनपत्र देण्यात आले. यात भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष ३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २,  पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसन पार्टी २ आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.

व्हीलचेअरवरील क्रिकेट अपंग वीरांची प्रीमियर लीग

करीना कपूर ची खास उपस्थिती रमेश औताडे मुंबई : व्हीलचेअर स्पोर्ट्स असोसिएशन मुंबईच्या वतीने खार जिमखाना येथे मुंबई हिरोस, मुंबई राइनोज आणि मराठवाडा टायगर्स यांच्यात मुंबई व्हीलचेअर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 चे आयोजन करण्यात आले होते. व्हीलचेअर क्रिकेट खेळाडू 70% ते 90% शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत, ते व्हीलचेअर वर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतात. या संघात पोलिओ, अँप्युटी, पाठीच्या कण्याला दुखापत आणि सेरेब्रल पाल्सी यासारख्या विविध अपंगत्व असलेल्या सर्व खेळाडूंचा समावेश आहे.  मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघातील काही खेळाडू भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाकडूनही खेळले आहेत. भारतीय महिला संघाच्या माजी क्रिकेटपटू आणि BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्या मिस सुलक्षणा नाईक या लीगसाठी प्रमुख पाहुण्या होत्या तसेच अभिनेत्री करीना कपूर खान देखील उपस्थित होती . अंतिम सामना मराठवाडा टायगर्सने मुंबई राइनोजवर ११ धावांनी जिंकला.  मराठवाडा टायगर्सच्या अंतिम सामन्यात विश्वनाथ गुरव सामनावीर ठरला. साहिल सय्यदला सर्वोत्कृष्ट फलंदाज, राहुल कारचे याला सर्वोत्कृष्ट ब्लोअर आणि संतोष रांजगणे याला लीगचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. दिव्यांग व्यक्तींना अधिकाधिक क्रिकेट सामने खेळण्याची संधी देण्यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि नजीकच्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनने व्हीलचेअर क्रिकेटपटूंसाठी अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा आयोजित करावी अशी आमची इच्छा आहे. असे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल रामुगडे यांनी सांगितले.

वैशाली दरेकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म

मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा फॉर्म देण्यात आला असून येत्या मंगळवारी 30 एप्रिलला दरेकर या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना पक्षाकडून शुक्रवारी एबी फॉर्म देण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून हा एबी फॉर्म देण्यात आला आहे. यावेळी मातोश्रीवर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 30 एप्रिलला वैशाली दरेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली, तसेच त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी आपल्या प्रचारास देखील सुरवात केली आहे. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा कधी होते याची सर्वच वाट पाहत आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी येथे देखील उमेदवारांचे अर्ज दाखल करताना महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून त्याची आखणी पक्षाकडून केली जात आहे. आता महाविकास आघाडी येत्या 30 तारखेला कशा प्रकारे शक्तिप्रदर्शन करते हे पहावे लागेल.

देशाच्या अमृतकालमध्ये प्रत्येक महिलेला उच्च शिक्षण देता यावे- कुलगुरु उज्वला चक्रदेव

मुंबई : देशात येत्या 25 वर्षात अमृतकाल साजरा करू, त्यावेळी आपल्या देशातील एकही महिला अशिक्षित राहणार नाही, प्रत्येक महिलेला हवे ते उच्च शिक्षण देता यावे, यासाठी आपली आणि एसएनडीटी विद्यापीठाचीही क्षमता वाढावी असे आपण स्वप्न पाहू या, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले. विद्यापीठातील डॉ. बाबाासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. संजय शेडमाके, विद्यापीठ कर्मचारी परिषदेचे पदाधिकारी, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. चक्रदेव पुढे म्हणाल्या, महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां महापुरूषांनीसमाज बदलायला हवा हे जाणले, यासाठी प्रत्येकानी विविध मार्ग स्वीकारले त्यात महिला ही एक केंद्रबिंदू आहे. शिक्षणाचे महत्व केवळ समाज बदलदंड होणे या पलीकडे माणूस बदलणे हा एक आहे. मी कोण आहे, माझे काय अधिकार आहेत, हे यातून कळते, यातून शिकता येते. भगवतगीतेतील दहाव्या अध्यायातील ३४व्या श्लोकातील तिसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्णाने महिलांसाठी सात गुण सांगितलेले आहेत. हे सात गुण आपण जाणलो नाही तर आपण आपले अधिकार जाणू शकत नाही, यामुळे आपले महत्व जाणून घेणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. महिलांच्या सबलीकरणासंदर्भात कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या, सबलीकरण हे आतून येते ते शिक्षणातून घडते. आपल्या विद्यापीठात शिक्षणातून महिलांचे सबलीकरण तोच विद्यापीठाचा उद्देश आहे. मात्र, यासाठी सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडून सहकार्य करावे, ज्यावेळी संधी मिळते, त्यावेळी तिचा पूर्ण लाभ, काळाचा उपयोग करून घ्यावा, महिलांच्या मनामध्ये तू सबल आहेस, तुझ्यासारख्या अनेक महिला भारताममध्ये आहेत, त्यांना तुझी गरज आहे, असे सांगणे आवश्यक असून हाच आपल्या विद्यापीठाचाही उद्देश असल्याचेही त्या म्हणाल्या.

 शेअर रिक्षांच्या भाडेवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी

ठाणे : दिवा शहरातील जवळपास 90% वाहतूक व्यवस्था ही रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर पध्द्तीनुसार रिक्षा भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले. ज्याची अंमलबजावणी दिनांक २१ एप्रिल २०२४ पासून करण्यात आलेली आहे. रिक्षा युनियनकडून करण्यात आलेल्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला विरोध, भाडेवाढीवर नाराजी ही व्हॉट्स ॲप आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवरून दिसून येत आहे. तर रिक्षा युनियनला ही फोन करून व प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी ही रिक्षा भाडेवाढीला विरोध दाखवला आहे. वास्तविक पाहता दिवा शहरातील मुख्य लोकवस्ती ही साधारणपणे दिवा रेल्वे स्थानकापासून एक ते साडे तीन किलोमीटरच्या पट्यात पसरलेली आहे. उदा. दिवा स्टेशन ते आगासन फाटक (3 किमी), दिवा स्टेशन ते बेडेकर नगर (2.1 किमी), दिवा स्टेशन ते गणेश नगर (1.9 किमी), दिवा स्टेशन ते ग्लोबल शाळा (1.6 किमी), दिवा स्टेशन ते दातिवली फाटक (1.7 किमी), दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिर- दातिवली (1.5 किमी), दिवा स्टेशन ते साबे जीवदानी मंदिर (1.5 किमी) प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) ने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मीटर नुसार रिक्षा वाहतुकीचे भाडे पहिल्या दिड किलोमीटर साठी 23 रुपये आकारले जाते. त्यानुसार जर साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळे पर्यंतचे अंतर हे अनुक्रमे 1 किमी आणि 1.6 किमी आहे. नवीन दरानुसार साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंत 15 रुपये दर करण्यात आला आहे. तीन सीट प्रमाणे त्याचे मूल्यमापन केल्यास रिक्षाचालकला साधारणपणे 45 रु. मिळतात. मार्च 2020 लॉकडाऊन पूर्वी ग्लोबल शाळेकडून दिवा स्टेशनसाठी सीटमागे प्रत्येकी 10 रुपये आकारले जात होते. पण शासनाने त्यावेळी परिस्थिती अनुरूप रिक्षा मध्ये फक्त दोन प्रवासी बसवण्याची सक्ती केली होती म्हणून रिक्षा चालकांकडून 10 रुपयांच्या ऐवजी 15 रुपये आकारण्यास सुरवात करण्यात आली. नागरिकांनीही त्यास विरोध केला नाही, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. पण काळानुरूप जेव्हा परिस्थिती सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे रिक्षा प्रवासी संख्या सुरू करण्यात आली; तेव्हा मात्र रिक्षाचे वाढवण्यात आलेले भाडे तसेच ठेवण्यात आले, असे नागरिकांचे म्हणणे आहे. डोंबिवली स्टेशन पासून रिजेन्सी अनंतम गेट पर्यंत साधारण 20 रुपये शेअर ऑटोचे भाडे आकारले जाते. किलोमीटनुसार पाहायला गेल्यास हे अंतर अंदाजे 3 किलोमीटर आहे. त्या हिशोबाने दिव्यात नक्कीच रिक्षा भाडेवाढ जास्तच असल्याने नागरिक उघडपणे विरोध दाखवत आहेत. तर डोंबिवली सारखे दिव्यातील शेअर ऑटोचे दर देखील आकारले गेल्यास दिव्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच इतर शहारांप्रमाणे दिव्यातही मीटरनुसार रिक्षा सेवा वाहतूक विभागाने सुरू केल्यास त्याचा फायदा रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांनाही होऊ शकेल, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. ज्यांना शेअर भाडे जास्त वाटत असेल ते मीटर प्रमाणे रिक्षा वापरू शकतील. तर प्रादेशिक परिवहन विभागाने दिव्यातील दोन्ही रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमत असा मार्ग काढण्याची मागणी दिव्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

ठाण्याची हवा समाधानकारक

हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असून त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. हवा प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन पालिकांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार ठाणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांना नोटीसा बजावून धुळ प्रदुषण रोखण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली होती. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून त्याद्वारे प्रदुषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते पाण्याने धुण्यात येत होते. याशिवाय, सर्वंकष स्वच्छता मोहिम शहरात राबविण्यात येत होती. यामध्ये रस्ते आणि गल्लीबोळात साफसफाई केली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसांपुर्वी दिसून आले होते. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १३० पर्यंत आले होते. यामुळे हवेची नोंद मध्यम गटात झाली होती. त्यापाठोपाठ आता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे.

आम्ही आमचा झेंडा घेऊन लढणार – जमशेद अमीर खान

मुंबई :सर्व राजकीय पक्षांची ७० वर्षांची गुलामगिरी संपवून आता आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन ” अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) ची लोकसभा लढाई लढणार आहोत. हिंदू , मुस्लिम, शीख, इसाई इतर सर्व धर्माचे पंथाचे सामान्य लोक एकत्र येऊन या लिग ची स्थापना केली आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी दिली. मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्या जोगव्यासाठी वापर केला जात आहे. आमचा आवाज संसद मधे कोण उठवणार ? हा प्रश्न आम्हाला वेळोवेळी सतावत होता. त्यामुळे आता आम्ही अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) या पक्षाच्या माध्यमातून आमचाच पक्ष, आमचाच झेंडा, आमचाच उमेदवार अशी आम्ही लढाई सुरू केली आहे असे खान यांनी सांगितले. हायातुल्ला अब्दुल्ला शेख, मनान अब्दुल हक, निजाम खान, इमतियाझ, अली रहीम शेख असे पाच उमेदवार लोकसभेसाठी मुंबईतून उभे केले आहेत अशी माहिती लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी यावेळी दिली.

‘कोटपा’ कारवाईत  ई- चलनानेच व्यसनमुक्ती

रमेश औताडे मुंबई : तंबाखूच्या सेवनाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम, तंबाखू कंपन्याकडून तरुण वर्ग आणि शालेय विद्यार्थ्याना ग्राहक म्हणून लक्ष्य करणे सुरु आहे. त्यामुळे सार्वजनिक धूम्रपान विरोधात ” कोटपा ” कारवाईची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच शासनाने कोटपा कारवाईत ई- चलन अंतर्भूत करावे, अशी आग्रही मागणी राज्यभरात तंबाखूच्या दुष्परिणामावर कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थाच्या समन्वय बैठकीत शासनाकडे करण्यात आली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद, विटाल स्ट्रॅटेजिस्ट, टाटा मेमोरिअल सेंटर, राज्य राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोटपा कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी राज्यभरातील अशासकीय संस्थांची समन्वय बैठक मंगळवारी टाटा मेमोरिअल सेंटर खारघर येथे संपन्न झाली. या बैठकीत आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ.दिनेश सुतार, डॉ. प्रकाश गुप्ता, नगरपरिषद प्रशासन उपायुक्त सुवर्णा शिंदे, डॉ. राणा सिंग, डॉ. अर्जुन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन भाषणात राज्यात सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी तसेच कोटपा २००३ कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अशासकीय संस्थानी सहकार्य करावे. कोटपाची कारवाई करताना चलनाचा प्रश्न निर्माण होतो. त्याबाबत शासन स्तरावर ई चलन कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ. दिनेश सुतार यांनी सांगितले. या बैठकीत राज्यभरातील तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाच्या जनजागृतीसाठी कार्यरत संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी तंबाखू कंपन्यांकडून सुरु असलेल्या छुप्या जाहिराती विरोधात जनहित याचिका दाखल करण्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच तंबाखूमुक्त शाळा, शैक्षणिक संस्था, परिसर करण्यासाठी कृती आरखडा तयार करण्यात आला. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत.  सार्वजनिक धूम्रपान गुन्हा आहे. तसेच कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना चलनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी ई चलन प्रक्रिया शासनाने सुरु करावी अशी मागणी करण्यात आल्याचे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था  प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांनी सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ पूर्ण

रत्नागिरी : अशोक गायकवाड रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार असून, यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण राहुल यादव…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या सोयगांव शाखेत पैशांचा ठणठणाट

सोयगांव : शेतकऱ्यांची हक्काची बॅक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ची ओळख असून हीच बॅक आता शेतकरीवर्ग ला शाप ठरत आहे.सोयगांव शहरातील बॅके च्या शाखेत आपले हक्काचे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरीवर्ग ला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गा ला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य सरकार ने सोयगांव तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने एक कोटी ७३ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळग्रस्त अनुदान जमा केले तसेच श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या निराधारांच्या बॅक खात्यात एक कोटी ८० लाख रुपये अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँके च्या सोयगांव शाखेत गेल्या पंधरा दिवसांपासून शासनाने जमा केले आहेत. परंतु बॅकेत पैशांचा ठणठणाट असल्यामुळे पंच्याहत्तर टक्के शेतकरी , निराधार लाभार्थी ना दिवसभर बॅकेत पैशे काढण्या साठी नंबर लावून घरी रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्या मुळे शेतकरी , निराधाराना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बॅके च्या वतीने शेतकरी , निराधारांसाठी व्यवस्था नाही — सोयगांव शहराचे तापमान सध्या  , ४२ डिग्री सेल्सिअस तापमान आहे.  दुष्काळग्रस्त शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिक शासनाकडून आलेले अनुदान काढण्या साठी सकाळ पासूनच सोयगांव जिल्हा बॅक शाखेत नंबर लावून दिवसभर बसत आहे. बॅके च्या वतीने कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे उच्च तापमानात शाखे च्या बाहेर बसावे लागत आहे. त्यामुळे चक्कर येऊन पडणे अशा घटना घडत आहे. व त्यातच चार ते पाच दिवस बॅकेत पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी व निराधार जेष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.एकंदरीतच शेतकऱ्यांची बॅक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आता शेतकरीवर्गाला शाप ठरत आहे. मुख्यालया कडूनच पैशांचा पुरवठा कमी सोयगांव  शाखे साठी आम्ही दररोज संभाजीनगर मुख्यालया कडे एक कोटी रुपयांची मागणी करतो. जेणेकरून शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिकांना वेळेवर अनुदान वाटप होईल. परंतु मुख्यालया कडून कमी प्रमाणात कॅश उपलब्ध होत असल्यामुळेच बॅकेत व ए.टी.एम मशीन वर पैशांची टंचाई जाणवत आहे. असे जिल्हा बॅक सोयगांव शाखेचे व्यवस्थापक  अनिल पाटील सोयगाव