Month: April 2024

महाकाय तुळई समुद्रात स्थापन,

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी मुंबई : किनारी रस्ता आणि वांद्रे – वरळी सागरी सेतूला सांधणाली पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत आज शुक्रवार, २६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी ही तुळई जोडण्यात आली. मध्यरात्री सुरू केलेल्या या कामाच्या वेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते. खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा अंदाज घेऊन तुळईद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचे नियोजनमहानगरपालिकेने हाती घेतले होते. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्याने महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पहाटे २ वाजल्यापासून सुरू झालेले हे काम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडले. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प पथकाचे अभिनंदन केले. एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूची सांधणी. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध योजना तयार केली. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) गुरुवारी २५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतू जवळ आणली होती. संयम आणि कौशल्य पणाला लावणारी १ तास २५ मिनिटे प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून पहाटे २ वाजेपासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने तुळई मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या मधोमध आणली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत तळईला स्थिर केले. मुंबई किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटींग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले. चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी ‘हिप हिप हुर्रे’ म्हणत आणि टाळ्यांचा गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तुळई खाली असलेला रिकामा तराफा बाजूला करण्यात आला. तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास ही महाकाय तुळई वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली आहे. तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणली. तुळईवर होणार सिमेंट क्राँक्रिटीकरण मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.

सेवानिवृत्त सनदी अधिकारी अरविंद रेड्डी यांचे दुःखद निधन

पुणे : पुण्याचे निवृत्त साखर आयुक्त श्री. अरविंद रेड्डी यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे आनंद आणि अमर ही दोन  मुले आहेत. त्यांनी ठाणे आणि धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. पुण्यातील भव्य साखर आयुक्तालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते उत्तम खेळाडू होते. सेवानिवृत्तीनंतर ‘मुंबई मॅरेथॉन’च्या आयोजनाचे काम त्यांनी दोन दशके केले. उद्या त्यांच्यावर कोरेगाव पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांच्या मागणीला आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर -गोरखपूर, एलटीटी – गोरखपूर आणि सीएसएमटी – दानापूरदरम्यान १२ अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०१५ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१६ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी गोरखपूर येथून २९ एप्रिल, ३ मे आणि ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२७ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २६ एप्रिल, १ मे रोजी रात्री ११.५० वाजता एलटीटीवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२८ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल, ३ मे रोजी गोरखपूरवरून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५१ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल रोजी सीएसएमटी येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५२ अनारक्षित विशेष गाडी रेल्वेगाडी ३० एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

 डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली

इंडिकेटर यंत्रणेतील गोंधळामुळे डोंबिवली:-  डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची चुकीची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकातील दर्शक फलकावर (इंडिकेटर) देण्यात येत होती. या चुकीमुळे…

मतदान करा, जागरूक नागरिक व्हा!

ठाणे शहरात सोसायट्यांमध्ये मतदान जनजागृती मोहीम ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ठाणे शहरात २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात ठाणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी,यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. स्वीप पथकामार्फत गृहनिर्माण संकुलात,  इमारती तसेच झोपडपट्टी परिसरात मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नुकतीच लोढा स्टर्लिंग सोसायटी,कोलशेत रोड णे येथे मतदान जनजागृती करण्यात आली. सदर मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वा मध्ये पार पडला. स्वाभिमानी मतदार या संकल्पने मधून मतदारांना मतदानाचे महत्व व स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्त्रिया,पुरुष,ज्येष्ठ नागरिक व युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. मतदान जनजागृती राबविण्याचा उद्देश यावेळी नागरिकांना पटवून देण्यात आला  देशात सर्वत्र  लोकसभा उत्सव सुरू आहे. या राष्ट्रीय उत्सवात नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी प्रशासनामार्फत  विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देतांना त्यांच्या प्रश्नाचे व शंकाचे निरसनही करण्यात आले. यावेळी नवमतदारांना मतदान यादीत नाव कसे नोंदवावे, ऑनलाईन अर्ज कसे भरायचे यांचे प्रशिक्षण स्वीप पथकाकडून देण्यात आले. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करा, निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करा.  योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते अशी जनजागृती नागरिकांमध्ये करण्यात आले. नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. निवडणुकीच्या निमित्ताने देशाची शान, मतदान हा तुमचा हक्क आणि तुमची जबाबदारी, नैतिकतेने मतदान करा, माझे मत हा माझा हक्क आहे, तुमचे मत तुमचे भविष्य आहे, असे विविध जनजागृती करणारे फलक लावून मतदारांना माहिती देण्यात आली.    लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

विविध उपक्रमांतून नवी मुंबईत मतदानविषयक व्यापक जनजागृती

नवी मुंबई : प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने स्वीप उपक्रमांतर्गत मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून त्याकरिता विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये ज्या ठिकाणी लोक जास्त संख्येने एकत्र येतात अशा समारंभ, उत्सव या कार्यक्रमांठिकाणी जाऊन मतदान करण्याचे महत्व पटवून दिले जात आहे तसेच मतदान शपथ घेऊन मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे येथील स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यालयात परिसर सखी विकास संस्थेच्या वतीने आयोजित कचरा वेचक महिलांच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी तथा नमुंमपा क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे व सहा. नोडल अधिकारी श्रीम. विभा सिंग यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत कचरा वेचक महिलांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. याप्रसंगी उपस्थित महिलांनी आपण स्वत: तर मतदान करुच आणि इतरांनाही मतदान करण्यास सांगू अशी सामुहिक शपथ ग्रहण केली. अशाच प्रकारे वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित ऐरोलीच्या डीएव्ही स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी स्वीप जनजागृती अंतर्गत शिक्षक, पालक व विदयार्थ्यांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याविषयी आवाहन करण्यात आले. उपस्थितांमधील मतदारांनी सामुहिकरित्या बोट उंचावून आपण मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. पटनी रोड येथील वेस्ट साइड व क्रोमा या मोठ्या व्यावसायिक दुकानांमध्येही मतदान विषयक जनजागृती करण्यात आली. अशा स्वरूपाच्या सर्व मोठया आस्थापनांना व संस्था कार्यालयांना भेटी देऊन मतदानाचे आवाहन केले जात आहे. ऐरोली येथील मध्यवर्ती पोस्ट ऑफिस मध्येही जाऊन तेथील अधिकारी-कर्मचारी व पोस्टमन यांचे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. तसेच ऐरोलीगावातील उत्सवाप्रसंगीही मतदानाचे आवाहन करण्यात आले. दिघा विभाग कार्यालयाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत मतदान करण्याची शपथ घेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याविषयीचे आवाहन पोहोचविण्यासाठी प्रत्येक अधिकारी – कर्मचारी यांनी आपले योगदान दयावे असे सूचित केले. दि.20 मे रोजी 25 ठाणे लोकसभा मतदार संघाची निवडणुक होत असून यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या सबलीकरणाला हातभार लावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यापूर्वीच आढावा बैठकीत दिले असून त्या अनुषंगाने महानगरपालिका स्तरावरूनही मतदार जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

कल्याणमधील २ तर भिवंडीतून ५४ अर्ज दाखल

कल्याण : ठाणे, लोकसभा निवडणूकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन तर भिवंडीतून एकदम ५४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी…

खर्च विषयक बाबींसाठी आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

  ठाणे:-  ठाणे,भारत निवडणूक आयोगाने ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक बाबींसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून चित्तरंजन धनगडा माझी (आयआरएस), २४ कल्याण मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि २५  ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमती चंद्रा प्रकाश मीना (आयआरएस) व राहिल गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने कळविली आहे.

निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडले सापाच्या विळख्यातील भंगारजमा ईव्हीएम !

ठाणे जिल्ह्यातून २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार असताना २७ भंगारजमा ईव्हीएम सापडले ! अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणूक सुरु असतानाच आणि देशभर ईव्हीएमबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच निवडणूक आयोगाच्या ताब्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गाळ्यात सापाच्या विळख्यातील भंगारजमा ईव्हीएम सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महत्वाचे म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार असताना २७ भंगारजमा ईव्हीएम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या मालकीचे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील प्रेक्षक गॅलरी (स्टॅण्ड)च्या खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. यातील  खोलीत निवडणूक आयोगाकडून निवडणूकीशी संबंधित काही गोष्टींचा साठा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यातील खोलीत २०१४ च्या निवडणुकीनंतर निवडणुकीशी संबंधित काही वस्तु ठेवल्या असल्याची आठवण १० वर्षानंतर निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांना झाली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील पोलीस, तलाठी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासह येथे धाव घेत सदर खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाचे कुलुप चावीने उघडण्याचा प्रयत्न केला असता ते उघडले जात नसल्याने दगडाने कुलुप तोडून दरवाजा उघडण्यात आला. सदर खोलीत प्रवेश केला असता खोलीत वीजेची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. मोबाईल टाॅर्चच्या उजेडात खोलीत पहाण्याचा प्रयत्न केल्यावर गंज लागलेल्या अवस्थेतील अनेक पेट्या आढळून आल्या. या पेट्या उघडल्यावर निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडले. सापाच्या विळख्यातील पेटीमध्ये शेकडो तयार मतदान ओळखपत्रे, बंद लिफाफे व २७ भंगारजमा झालेले ईव्हीएम आढळून आले. महत्वाचे म्हणजे या खोलीत सापांचे अस्तित्व आढळून आले. गंज लागलेल्या पेटींवर साप फिरताना दिसत होते. ठाणे महापालिकेकडून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खोली २०१४ साली गोदाम म्हणून वापरण्यासाठी निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. ही खोली जवळपास १० वर्षे उघडण्यातच आली नव्हती आता लोकसभा निवडणूका सुरु असताना २०२४ साली ही खोली उघडण्यात आली. यात सापडलेले शेकडो तयार मतदान ओळखपत्रांचे वाटपच झाले नसल्याचे दिसून येते आहे. २०१४ साली ठाणे जिल्ह्यातील २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार करण्यात आली होती. येथे तर प्रत्यक्षात भंगारजमा झालेले २७ ईव्हीएम सापडले असल्याने गायब झालेले ईव्हीएम हेच आहेत का याची चौकशी करण्याची मागणी विरोधी राजकीय पक्षांनी केली आहे. अशावेळी याची शहानिशा न करताच सापडलेले या सर्व वस्तू चक्क भंगारात विकण्याचे आदेश संबंधित यंत्रणेकडून देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. याविषयी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. चौकट निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडलेल्या ईव्हीएमबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ही घटना म्हणजे काय निर्लज्जपणा चाललेला आहे ते पहा. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.