Month: April 2024

मतदान टककेवारी वाढ होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे-डॉ .महेंद्र कल्याणकर

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ .महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रेवती गायकर, जोस्ना पाडियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कामकाजाचा आढावा घेताना विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर मार्गदर्शन करताना म्हणाले, जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच आदिवासीक्षेत्रातील मतदारांचे मतदान देखील महत्त्वाचे आहे याकडे लक्ष दिले जावे. मोठी गावे, शहरांमधील गर्दीची प्रभाग येथे मतदारांची संख्या मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, ८५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची ( होम वोटिंग)सुविधा दिली आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी. दिव्यांग मतदारांचे १००% मतदान होईल या दृष्टीने काम केले जावे. दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात. विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पोस्टल व होम वोटिंग द्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक केले जावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सन नियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखण्यात यावी.अशा सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक उन्हाळ्यात होत असल्याने मतदान दिवशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मतदारांच्या रांगांसाठी सावली असलेल्या जागा, वरंडा अथवा मंडप, शेड याद्वारे निर्माण करण्यात याव्यात, दिव्यांग मतदारांचे मतदान सहज होण्यासाठी समाजसेवी संस्था ची मदत घेतली जावी. होम वोटिंग साठी जाणाऱ्या पथकांनी मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान गोपनीय राहील या दृष्टीने दक्षता घेतली जावी. मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघात ६२% मतदान झाले होते यावर्षी त्यात वाढ अपेक्षित असून देण्यात आलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी असे जावळे म्हणाले. यावेळी निवडणूक विषयक विविध समितीनिहाय कामकाजाची माहिती सादर करण्यात आली. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष, मतदार जागृकता व सहभागिता कार्यक्रम (स्वीप), सी व्हिजील ॲप, सक्षम ॲप, ईव्हीएम, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचे मतदान, पोस्टल मतदान व होम वोटिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक प्रशिक्षण यासह विविध बाबींची माहिती देण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विभाग विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक मतदान पूर्वतयारी बाबत माहिती सादर केली. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चौकट रायगड लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापूर्वी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमची सुरक्षा, पायाभूत सुविधा, पॉवर बॅकअप आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर सुविधांच्या आढावा कल्याणकर यांनी यावेळी घेतला. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

वेल्फेअर साठी…

मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव रमेश औताडे मुंबई : मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून  न्यायमूर्ती शमकरंद कर्णिक,  न्यायमूर्ती  सारंग कोतवाल , न्यायाधीश श्अभय आहूजा ,  न्यायमूर्ती शशर्मिला देशमुख , उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या समितीचे अध्यक्ष शरद साळवे,  कार्याध्यक्ष रवी पवार,  सचिव संजय शेलार सल्लागार चंद्रकांत बनकर खजिनदार किरण कांबळे तसेच कार्यकर्ते निलेश तायडे प्रशांत दाभाडे व इतर  कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. अशाप्रकारे जयंतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित झाले पाहिजे असे  न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी  केले. याप्रसंगी न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला देशमुख  म्हणाल्या ‘आज मी जी  न्यायमूर्ती आहे ती केवळ या महामानवामुळे आहे. तसेच  मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अभय आहूजा यांनी या तिन्ही महापुरुषाबद्दल गौरवउद्गार काढले आणि  आपल्या सर्वांवर यांचे कसे उपकार आहेत त्याची जाणीव करून दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेलार यांनी तर प्रास्ताविक  शरद साळवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन  चंद्रकांत बनकर यांनी केले.

परळ येथे राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

मुंबई : येत्या २९ आणि ३० एप्रिल रोजी परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य ज्युनियर, सब ज्युनियर, क्लासिक पुरुष आणि महिला गटाच्या पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल. तर ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचा बक्षिस समारंभ होईल. या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येतील.  स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुर्यकांत गद्रे, मोबाईल : ९८६९७३६७११ अथवा प्रशांत सरदेसाई, मोबाईल : ९८२०३७०४९७ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत २०० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरकार्यवाह संजय सरदेसाई आणि त्यांचे सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत.

‘सूर्या’चा पाणीपुरवठा जुलैपर्यंत?

भाईंदर : सूर्या धरण पाणी योजनेतून मिरा-भाईंदर शहराला येत्या जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. वीजपुरवठ्याअभावी हा पुरवठा नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाणार होता. यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते, मात्र आता वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढून जुलैपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन ‘एमएमआरडीए’कडून मिरा-भाईंदर महापालिकेला देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिरा-भाईंदरसह वसई-विरार शहरासाठी एमएमआरडीए ‘सूर्या धरण पाणी योजना’ राबवत आहे. पहिल्या टप्प्यात वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे व दुसऱ्या टप्प्यात मेपर्यंत मिरा-भाईंदर शहराला २१८ दशलक्ष लिटर पाणी देण्यात येणार होते; परंतु मिरा-भाईंदर शहराला पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या स्रोताच्या जागी १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होणे आवश्यक आहे व त्यासाठी स्वतंत्र केबल टाकावी लागत आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीकडून हे काम सुरू करण्यात आले आहे; परंतु प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. परिणामी, मिरा-भाईंदरचा पाणीपुरवठा मेऐवजी नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाणार होता. यासंदर्भातील सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने १२ एप्रिल रोजी ‘मिरा-भाईंदरला ‘सूर्या’चे पाणी लांबणीवर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर आणि शहर अभियंता दीपक खांबित यांनी ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुग्दल यांची गुरुवारी (ता. २५) भेट घेतली व मिरा-भाईंदर शहराला लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्याबाबत विनंती केली. त्यावर ‘एमएमआरडीए’कडून सुरू असलेली सर्व कामे जूनपर्यंत पूर्ण होतील व वीजपुरवठ्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्येवर मार्ग काढून जुलैपर्यंत मिरा-भाईंदरच्या हद्दीवर पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन मुग्दल यांनी दिले. या दरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेने चेणा ते हटकेश या दरम्यानच्या जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली. त्यामुळे आगामी जुलैपर्यंत मिरा-भाईंदरच्या नागरिकांना पाणीटंचाईतून कायमची सुटका मिळण्याची अपेक्षा आहे. धरणात ४५ टक्के पाणीसाठा मिरा-भाईंदरला बारवी आणि आंद्रे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही धरणातील पाणी उल्हास नदीत येते व तेथून स्टेम प्राधिकरण व ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून मिरा-भाईंदरला पुरवठा केला जातो. सध्या या दोन्ही धरणांत सुमारे ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी दोन महिने म्हणजेच जूनपर्यंत मिरा-भाईंदरच्या नागरिकांना पाण्याच्या बाबतीत दिलासा मिळाला आहे. शटडाऊन घेतल्यासच पाणीटंचाई स्टेम अथवा एमआयडीसी या दोघांपैकी एकाने देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेतला, तरच शहरात दोन दिवस पाणीटंचाई निर्माण होते. एरवी मात्र नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.   सूर्याचे पाणी शहरात वितरित करण्यासाठी चेणा ते हटकेश जलवाहिनी अंथरण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांतच वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे. – दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका

संघपाल वाठोरे लिखित ‘अन देव निरुत्तर झाला’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे आयोजन

माथेरान : शिक्षकी पेशा असताना सुध्दा आपल्या अंगातील एका कवीची जाणीव करून देत त्याचप्रमाणे निसर्गावर भरभरून प्रेम करणारे माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेचे शिक्षक संघपाल वाठोरे यांनी आजवरच्या कार्यकाळात अनेक कविता लिहिल्या आहेत तर निसर्गाच्या सानिध्यात वावरताना प्रत्यक्ष निसर्गाशी हितगुज करत निसर्गाचे प्रत्येक ऋतूनुसार लेखन केले आहे. नुकताच त्यांनी ” अन देव निरुत्तर झाला” हा सुंदर काव्यसंग्रह तयार केला असून या काव्यसंग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा छोटेखानी कार्यक्रम दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह बोपेले, नेरळ या ठिकाणी संपन्न होत आहे. साहित्य रसिकांना कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्वतः संघपाल वाठोरे यांनी केले आहे. पीपल्स पब्लिकेशन प्रकाशित आणि संघपाल वाठोरे लिखित ‘अन‌् देव निरुत्तर झाला…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्रा. दामोदर मोरे ज्येष्ठ साहित्यिक, मा. मराठी विभागप्रमुख, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे तसेच ज्येष्ठ कवी व गीतकार अरुणजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे यासाठी प्रसिद्ध साहित्यिक गिरीश कंटे,मल्हार संतोष पवार, संपादक, महाराष्ट्र न्यूज-24 यांची प्रमुख उपस्थितीलाभणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक पीपल्स पब्लिकेशन्स, मुंबई. आणि पौर्णिमा मित्र मंडळ, बोपेले – नेरळ हे आहेत. सर्व काव्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघपाल वाठोरे यांनी केले आहे.

जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश

नवी मुंबई : नाटक हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. समाज जागृतीचा संदेश हसत खेळत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत लोकांपर्यंत पोहचवणारी पथनाट्ये नेहमीच जनजागृतीचे लोकप्रिय माध्यम राहिलेली आहेत. याचाच उपयोग मतदान विषयक जनजागृती करण्याकरिता करण्यात येत असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जागरूकता वाढविणारी पथनाट्ये बसविली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणेच अनेक खाजगी शाळांमधूनही शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करणारी पथनाट्ये आपापल्या शाळा परिसरात सादर केली. विशेष म्हणजे ही पथनाट्ये शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळूनच लिहिलेली होती व शिक्षकांनी पथनाट्य स्वरुपात बसवून घेतली होती. ही पथनाट्ये शाळेच्या परिसरात सादर होत असताना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहायला मिळाले. या पथनाट्यांच्या माध्यमातून भारतीय संविधान, लोकशाहीच्या सबलीकरणात मतदानाचे महत्व, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार, कर्तव्य म्हणून मतदान करण्याची नागरिकांची जबाबदारी अशा आशयास अनुसरुन मतदान करण्याचे संदेश प्रसारण पथनाट्यांतून करण्यात आले. 25 ठाणे लोकसभा निवडणूक 20 मे रोजी होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने मतदार जनजागृतीकरिता नवी मुंबई महापलिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही या कामी पुढाकार घेतला असून स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या सूचनांनुसार रांगोळी, चित्रकला, प्रभातफे-या, निबंध, पोस्टकार्ड लेखन असे अभिनव उपक्रम शाळांतून राबविलेले आहेत. शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री.योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी श्रीम.अरुणा यादव, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.सुलभा बारघरे व श्रीम. कल्पना गोसावी यांच्या नियंत्रणाखाली केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांनाही मतदान विषयक जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडे मतदान करण्याचा संदेश प्रभावी रितीने पोहचविला जात आहे. शाळांनी आपापल्या क्षेत्रात सादर केलेली पथनाट्ये ही मतदान विषयक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली.

लाल फितीत रखडल्या २२०० लाल परी

मुंबई : सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ह्या म्हणीचा सामान्य जनतेला नेहमीच अनुभव येतो. तसाच प्रकार एस. टी. महामंडळालाही आला आहे. महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या २२०० गाड्‌या रखडल्या आहेत. साहजिकच त्याचा फटका एसटी कर्मचारी व प्रवासी यांना बसत आहे फाईल वेळेवर पाठऊन सुद्धा सही न होण्यामागील कारण काय ? असा सवाल  महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. गाड्या खरेदी संदर्भात बरगे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप जगताप हे सुद्धा हजर होते. एसटीच्या जवळपास १० हजार बस ह्या मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे दुरुस्तीचे काम करुन यांत्रिकी कर्मचारी हैराण झाले आहेत. याशिवाय ह्या गाड्या रस्त्यावर चालवताना चालकांना खूप त्रास होत आहे. एसटी महामंडळाने अशोक लेलैंड कंपनीकडून बॉडी बांधणीसह तयार २२०० बसेसची निविदा मंजूर केलेली आहे. पण त्यासाठी लागणारा निधी मात्र सरकारकडून आलेला नाही. वर्कऑर्डर दिल्याशिवाय गाड्या ताब्यात येऊ शकणार नाहीत आणि निधी प्राप्त झाल्याशिवाय महामंडळ वर्कऑर्डर देऊ शकत नाही. कारण सरकारकडून बजेट मध्ये तरतूद करण्यात आलेला निधी कधीच वेळेवर मिळत नाही. व त्यामुळे विनाकारण पुरवठादार व महामंडळ यांच्यात संघर्ष उभा राहतो. असे बरगे म्हणाले. या पूर्वीचा अनुभव पाहता कधी कधी अशी प्रकरणे न्यायालयात जातात व साहजिकच त्याचा परिणाम महामंडळाच्या एकंदर आर्थिक स्थितीवर तसेच कामकाजावर होतो. अश्या वेळी सरकारी अधिकारी मात्र हात झटकून मोकळे होतात.असे बरगे म्हणाले.

बहुतेक सोशल मीडियावर हवामान अंदाजाची अफवा असते – आय एम डी प्रमुख सुनील कांबळे

रमेश औताडे मुंबई : बहुतेक सोशल मीडियावर हवामान संदर्भातील हवामान अंदाजाची माहिती देत असतात. मात्र ही माहिती अचूक नसते व त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये असे मत प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लब व प्रादेशिक हवामान विभाग तसेच असर या संस्थेने यांच्या संयुक्त विद्यमाने उष्णतेच्या लाटा व हवामान बदल याबाबत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कांबळे बोलत होते. वातावरण बदल व पर्यावरणाचा समतोल याबाबत जनतेत म्हणावी तेवढी जनजागृती नाही. आता एवढे उष्ण वातावरण आहे तरीही लोक पर्यावरणाबाबत गंभीर नाहीत. वातावरणातील बदलामुळे हवामान खात्याचे अंदाज काही वेळेस मागे पुढे होतात. मात्र समाज माध्यमावर ब्रेकिंग व टी आर पी च्या गोंधळात अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो. आय एम डी या संकेतस्थळावर अचूक माहिती अपडेट होत असते. मात्र वातावरण बदलामुळे काही अंशी माहिती बदलू शकते. शेतकरी व हवामान खाते यांचा अतूट संबंध असतो. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचे संकेतस्थळ महत्वाची भूमिका बजावत आहे.

अखिल भारतीय कोळी समाजाची कार्ल्यात विशेष सभा

ठाणे : अखिल भारतीय कोळी समाज – दिल्ली, महाराष्ट्र शाखेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार २८ एप्रिल रोजी श्री क्षेत्र  एकविरा देवी संस्थान कार्ला येथे होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने संस्थेच्या वाटचालीसंदर्भात चर्चा होणार आहे. याशिवाय संघटनेच्या राज्य आणि जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आलेल्या विविध समस्या, मुद्दे यावर यावेळी चर्चा होणार असल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  केदार लखेपुरिया यांनी सांगितले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केदार लखेपुरिया म्हणाले भारतीय राज्यघटनेने कोळी समाजाला दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्याबाबतीत राज्यशासनाने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. या अन्यायाच्या विरोधात संघटनेने नेहमीच लढा दिला आहे. राज्यातील अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेश सरकारप्रमाणे नोकरीत संरक्षण द्यावे. केंद्र सरकारने पारंपरिक मासेमारीला कृषी दर्जा दिला आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी करावी. मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड विनाविलंब वितरित करण्यात यावे. स्थानिक स्वराज संस्थांनी कोळी महिलांनाच मासे विक्री परवाना  द्यावा , त्यांना गटई (चर्मकार) कामगाराप्रमाणे स्टॉल उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे केलेल्या प्रयत्नाचा या बैठकीत आढावा घेला जाईल.

‘संवेदना’ उद्यानाबाबत महापालिका ‘असंवेदनशील’

नवी मुंबई : कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या सानपाडा सेक्टर १० येथील ‘संवेदना’ उद्यानाची दुरवस्था झाल्यामुळे दिव्यांगांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी निवेदन दिले. उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सानपाडा सेक्टर १० येथे ‘संवेदना’ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर संवेदना उद्यान विकसित करण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. उद्यानांमध्ये दिव्यांग मुलांसाठी खेळणी, व्हीलचेअरचा झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, लेस बांधण्यासाठी बूट, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, दगड, लाकूड, लादी, गोटे बसविलेला मार्ग, सापशिडीचा खेळ, स्पिकिंग ट्यूब, बेल ट्री, फुली गोळ्याचा खेळ, सेल्फी फ्रेम, बुद्धिबळ चौकटी, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक इत्यादी सुविधांचा समावेश असून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा व लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली असून विशेष सुविधेसह दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत. सौंदर्याला बाधा उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. उद्यानातील लोखंडी फलक, लहान मुलांची तुटलेली खेळणी उद्यानात पडलेली दिसत आहेत. तसेच कारंजे बंद पडले असून पाण्याचे हौद पाण्याअभावी ओस पडले असून झाडेही सुकून गेली आहेत. विद्युत दिवेसुद्धा तुटले असून त्यांचा खच एका कोपऱ्यात पडलेला आहे. स्वच्छतागृहातील नळ खराब झाले असून शौचास बसण्यासाठी असलेले भांडेसुद्धा तुटून पडले आहे. पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे उद्यानाचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उद्यानात सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सानपाडा येथील संवेदना उद्यानातील दुरुस्ती करण्याबाबत शहर अभियंता यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जी काही कामे आहेत ती अभियांत्रिकी विभागाकडून केली जातील. – दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग