तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात सोमवारी तीन विधानसभा मतदारसंघांची क्लस्टर बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकारी, बूथ प्रमुख व सुपर वॉरियर्सबरोबर थेट संवाद साधून लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण जागेवर महायुतीच्या विजयासाठी रणनीती आखली जात आहे. त्यानुसार भाजपाकडून नियोजन केले जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मिरा भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बूथप्रमुख व सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाच्या संघटनात्मक स्थितीबरोबरच बूथनिहाय परिस्थितीची माहिती घेण्यात आली. भाजपाच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयात भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे लोकसभा मतदारसंघ प्रमुख व माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नरेंद्र मेहता, विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सुभाष काळे व मनोहर डुंबरे, मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघरी संपर्क साधावा. आयुष्मान योजनेत ७० वर्षांवरील नागरिकांच्या सहभागासाठी फॉर्म भरून घेणे, ८५ वर्षांवरील मतदार व दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करावी, लाभार्थींबरोबर संपर्क साधावा,आदी सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केल्या.