Month: April 2024

‘निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे’

निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांचे आवाहन मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात, समन्वय अधिकारी तुषार मठकर, वरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानी, उपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना श्री.पानसरे म्हणाले, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत असून 26 एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी श्री. पानसरे यांनी मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. नामनिर्देशन पत्रे भरण्यापासून प्रचार विषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.थोरात यांनी टपाल मतपत्रिकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. श्रीमती खातू यांनी उमेदवारांनी निवडणूक खर्चाविषयी ठेवण्याच्या नोंदी आणि त्याबाबतच्या नियमांविषयी माहिती दिली.

उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी

कल्याण : कल्याण, डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी उमेदवार, पदाधिकाऱ्यांकडून अधिक संख्येने वाहने वापरली जात आहेत. ही वाहने कार्यक्रम स्थळी, प्रचार कार्यासाठी शहरात वाट्टेल तशी उभी करण्यात येत असल्याने कल्याण, डोंबिवलीत काही दिवसांपासून राजकीय कोंडी सुरू आहे. या राजकीय वाहनांच्या कोंडीने वाहतूक पोलीसही हैराण आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाग आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्यामागे प्रचारासाठी ३० ते ४० वाहने असा ताफा दररोज शहराच्या विविध भागातून मतदार, ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या भेटीगाठीसाठी फिरत आहेत. ही वाहने उमेदवार, नेता ज्या ठिकाणी थांंबेल तेथे रस्त्याच्या कडेला थांंबवली जातात. उमेदवार, नेता तेथून पुढे जात नाही तोपर्यंत वाहनेही जागीच खोळंंबून राहतात. या कोंडीत मग मुख्य रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीची रिक्षा, बस, खासगी वाहने अडकून पडतात. मागील काही दिवसांपासून कल्याण, भिवंडी, डोंबिवली शहरांमध्ये हे राजकीय वाहन कोंडीचे प्रकार सुरू असल्याने मतदान करू पण तुमचा वाहनांमधील प्रचार आवरा, असे नागरिक संतप्त होऊन बोलत आहेत. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकावेळी ३० हून अधिक वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. ही वाहने प्रवाशांची मोठी डोकेदुखी झाली आहे. डोंबिवलीत सोमवारी एक उमेदवार प्रचार कार्यासाठी फिरत होता. पाठीमागे २५ हून अधिक वाहने होती. ही वाहने डोंबिवली पश्चिमेत भावे सभागृहाजवळ एका ज्येष्ठ व्यक्तीला भेटण्यासाठी थांबली, त्याचवेळी पाठीमागच्या सर्व गाड्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आल्या. यावेळी याभागात अर्धा तास वाहन कोंडी झाली होती. उमेदवारांनी किमान संंध्याकाळच्या वेळेत प्रचारासाठी शहरात वाहने घेऊन फिरू नये अशी प्रवाशांंची मागणी आहे. नोकरदार वर्ग या वेळेत कामावरून घरी परतत असतो. त्याचवेळी प्रचाराची वाहने रस्त्यावर आली की अर्धा ते एक तास वाहने कोंडीत अडकतात, अशा तक्रारी आहेत. आम्ही या परिस्थितीला काही करू शकत नाही. आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारी निवारणासाठी नियंत्रण कक्ष-डॉ. संदिपान सानप

अशोक गायकवाड रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी काँग्रेसच्या न्यायपत्राच्या एक हजार प्रती पोस्टाने पाठवणार’!

रमेश औताडे मुंबई :मोदी सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात काँग्रेसने रान पेटवले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर सत्तेत  आली तर सामान्य जनतेसाठी काय करणार आहे याची माहिती असलेली 50 पानाच्या एक हजार पुस्तिका मुंबई काँगेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष कचरू यादव यांनी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्यावर पोस्टाने पाठवणार असल्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी मुंबई विभागीय कार्यालयासमोर मागासवर्गीय सेल चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोदी सरकाने केलेल्या मनमानी कारभारविरोधात निदर्शने करत या 50 पानी न्यायपत्राच्या  प्रती दाखवत राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे..काचरू यादव संघर्ष करो हम तूम्हारे साथ हे.. अशा घोषणा दिल्या. वाढलेली महागाई , शिक्षणाचा विभागाचा झालेला फज्जा , शेतकरी आत्महत्या , बेरोजगारी , महिलांची असुरक्षितता ,धर्माच्या नावाने सुरू असलेला मनमानी प्रकार , पत्रकारांची मुस्कटदाबी, कामगार आंदोलने, डबघाईस आलेले उद्योग व काही मोजकेच भांडवलदार यांना दिलेली साथ, पर्यावरणाकडे होत असलेले दुर्लक्ष या व इतर महत्वाच्या मुद्यावर मोदी सरकारने देश कसा मागे नेऊन ठेवला आहे व काँग्रेस च्या न्याय पत्रात जनतेसाठी काय असेल याचा सर्व लेखा जोखा या 50 पानी पुस्तिकेत दिला आहे. असे कचरू यादव यांनी यावेळी सांगितले. सामान्य माणसाला न्याय देत असताना त्यांच्यावर अन्याय  कसा होईल यासाठी भाजपा सरकारने काम केले आहे. पर्यावरण बिघडले असताना उन्हाचे चटके बसत आहेत आणि त्यात महागाईचे चटके बसू लागल्याने जनता होरपळून निघत आहे. राहुल गांधी यांनी देशभर पायी यात्रा काढत जनतेची मते जाणून घेतली जनता त्रस्त झाली आहे. आगामी निवडणुकीत जनता भाजपला पाडल्याशिवाय राहणार नाही असे काचरू यादव यांनी यावेळी सांगितले.

शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी स. ९ ते शनिवार, २७ एप्रिल रोजी स. ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. या शट डाऊनच्या काळात, शुक्रवार, २६ एप्रिलला सकाळी ९ ते शुक्रवार रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईप लाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार रात्री ९ ते शनिवार, २७ एप्रिलला सकाळी ९ या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील. या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पत्रलेखनासारख्या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पालकांना केले मतदानाचे आवाहन

नवी मुंबई : संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने 20 मे रोजी होत असलेल्या ठाणे लोकसभा निवडणूकीत हक्काने बजावावा याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून मतदानविषयक प्रचार, प्रसाराच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत असून मुलांनी मागणी केलेल्या एखाद्या गोष्टीला पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेत पत्रलेखन हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याव्दारे विद्यार्थ्यांनी आपले आई-बाबा यांना पत्र लिहून त्यांनी येत्या लोकसभा निवडणूकीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिका शाळांप्रमाणेच  खाजगी शाळांतून हा उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला. अनेक शाळांनी त्याकरिता आपल्या विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र उपलब्ध करून दिली होती. ‘माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी नक्की मतदान करा’ असा आईबाबांना आग्रह करणारे हे पत्रलेखन मुलांकडून आपल्या पालकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव करून देणारे होते. या पत्रलेखनातून मुलांमार्फत मतदार पालकांना आवाहन तर करण्यात आलेच शिवाय सध्याच्या समाज माध्यमांतून संदेश आदानप्रदानाच्या तंत्रस्नेही युगात पत्रलेखनासारख्या दुर्मीळ होत चाललेल्या माध्यमाचा आनंदही याव्दारे विद्यार्थ्यांना घेता आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने पालकांनी मतदान करावे असे आवाहनपत्र लिहिले व पालकांनीही या पत्रलेखन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उमेदवारांनी निवडणुक प्रक्रिया व प्रचारादरम्यान आयोगाच्या सूचनांचे पालन करा-किशन जावळे

रायगड : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुक कालावधीत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीने काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. या सर्व नियमानुसार प्रचार, त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या परवानग्या, तसेच प्रचार खर्चा बाबत कार्यवाही करावी. तसेच प्रचारा दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार व खर्च प्रतिनिधींचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह मध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम, आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार यांच्यासह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी सहकार्याच्या भूमिकेतून काम करतील. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून आयोगाच्या नियम पालनास प्राधान्य द्यावे. निवडणूक विषयक विविध शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच खर्च पथक कार्यरत आहेत, प्रत्येक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च पथक नेमण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी पुढे म्हणाले, निवडणुक प्रचारासाठी वाहने, मिरवणूक, सभा आदी परवानगी अर्ज प्राप्त झाले नंतर ” प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रचार दि. ६ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबणार आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचार करता येणार नाही परंतू वृत्तपत्रातून मतदान दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी जाहिरात जिल्हा माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करून प्रसिद्ध करता येईल,असे जावळे यांनी म्हणाले. यावेळी आदर्श आचारसंहिता, होम व्होटिंग, माँक पोल, ई व्हो एम सरमिसळ, प्रचार खर्चासाठी विविध दरसुची, निवडणूक प्रचार कार्यालय, मतदानसाठी ओळखपत्र अथवा ओळखपत्राचे पर्यायी १२ पुरावे, मतदानाच्या दिवशी उभा करावयाची बूथ, मतदान केंद्र राजकीय प्रतिनिधी याबाबतची माहीती दिली. तसेच निवडणूक प्रचार कामासाठी बालकामगार ठेवू नये, प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी निवडणूक खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम यांनी सादरीकरण करून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, खर्च संनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचे तपशील आयोगाच्या नियमानुसार तपासण्याचे काम खर्च पटकन द्वारे होत असून यासाठी दैनंदिन खर्च नोंदवही देण्यात आली आहे. यातील नोंदी हिशोब व बँक व्यवहाराची माहिती उमेदवारांना त्याच दिवशी नोंदवणे गरजेचे आहे. उमेदवारांसाठी येथील खर्च मर्यादा ९५ लक्ष रुपये असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवसापासून निकालाच्या दिवसापर्यंत सर्व प्रचार नोंदवला जाणे गरजेचे आहे. निवडणुकीचा निकाल नंतर तीस दिवसाच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे, असे कदम म्हणाले. आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी जावळे यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या असणाऱ्या शंकांबाबत प्रश्नोत्तर घेवून शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रसंगी विविध पोलीस व शासकीय अधिकारी, जिल्हा खर्च नियंत्रण समितीतील अधिकारी उपस्थित होते.

भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत जप्त रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती

अशोक गायकवाड रायगड : मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती स्थापन करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य यांचा समावेश आहे. जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांची भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य. ही समिती उमेदरावांच्या जप्त केलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवाराशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही निवडणूक प्रचार, इत्यादीशी संबंध नाही असे दिसून आल्यास अशी रोख रक्कम ज्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती, अशा व्यक्तींना देण्याबाबतचे वस्तूनिष्ठ मौखिक आदेश दिल्यानंतर ही रक्कम उमेदवारास परत करण्याची कार्यवाही करेल.

 जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड

 प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विले पार्लेचा मुंबई:मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांनी १९९७ साली प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न होते. त्यांना जागतिक दर्जाच्या आणि सर्वांसाठी खुल्या अशा पायाभूत सुविधा निर्माण करायच्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने खेळाडूंसाठी जागतिक दर्जाचे इक्विपमेंटस् प्रदान केली आहे. यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपल्या खेळात ठसा उमटवला आहे. संकुलात खालील निरनिराळ्या क्रिडा प्रकारच्या  खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांडून दिले जात आहे. जलतरण, पिकलबॉल, मल्लखांब, बुद्धिबळ, ज्युडो, जिम्नॅस्टिक्स, कराटे, तायकोंडो, व्यायामशाळा, रोलर स्केटिंग, टेबल टेनिस, झुंबा, रायफल शुटिंग ईत्यादी. प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या ७ हून अधिक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये सर्वात प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार जिंकला आहे. मल्लखांब खेळातील अतुलनीय कामगिरीबद्दल श्री गणेश देवरूखकर यांना यावर्षी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी अलीकडेच, जिम्नॅस्टिक्स ॲथलीट आध्यान देसाईची आगामी ज्युनियर एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२४ साठी हाँगकाँग, चीन येथे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा मे महिन्यात होणार असून १० ते १२ मे २०२४ या कालावधीत होणार आहे. आध्यान हा माजी अंडर-१२ राष्ट्रीय चॅम्पियन देखील आहे आणि त्याने कोलकाता येथे नुकत्याच संपलेल्या सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेत अनेक पदकेही जिंकली आहेत. हरियाणा येथील खेलो इंडियन युथ गेम्स २०२२ मध्येही त्याने भाग घेतला होता आणि सरकारी मंजूर योजनेअंतर्गत तो एक खेलो इंडिया ॲथलीट आहे. आध्यान गेल्या १० वर्षांपासून प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुल मध्ये सराव करत आहे. त्यांचे प्रशिक्षक श्री शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव श्री मोहन अ. राणे यांच्या पाठिंब्याने ही अतुलनीय कामगिरी केली आहे. अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव मोहन अ. राणे यांनी ही बातमी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आणि आशियाई स्पर्धेसाठी आध्यानला शुभेच्छा दिल्या.

मुंबई वाय.एम. सी.ए.ची  मोफत उन्हाळी शिबिरे  २ मे पासून

मुंबई :  क्रीडा आणि सेवा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मुंबई वाय.एम.सी.ए.च्या वतीने २ मेपासून विविध खेळांच्या मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिरांना २ मे पासून प्रारंभ होणार आहे. यंदा १५० वर्षे पूर्ण करणारी वाय.एम. सी.ए. ही भारतातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) असून त्याचेच निमित्त साधून त्यांच्या मुंबईतील सर्व शाखा आणि केंद्रांमधून संपूर्ण वर्षभर विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुंबई वाय.एम.सी.ए.चे सरचिटणीस लेओनार्ड सॅलिन्स यांनी म्हटले आहे. सध्याच्या युवा पिढीला मोबाईल आणि सोशिअल मीडिया पासून दूर नेवून त्यांच्यात क्रीडा प्रेम रुजविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यांच्या मुंबईतील विविध केंद्रांमध्ये २ मे पासून बास्केटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, लॉन टेनिस, रोलर स्केटिंग, कराटे, किक बॉक्सिंग,मिश्र  मार्शल आर्ट, बुद्धिबळ, बॅडमिंटन, धनुर्विद्या, रिदमिक जिम्नॅस्टिकस, जलतरण, फुटबॉल, कुस्ती, अॅथलेटिक्स  अशा विविध खेळांच्या शिबिरांसाठी मोफत तर काही खेळांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.  या शिबिरासाठीचे प्रवेश अर्ज ३० एप्रिल पर्यंत स्वीकारण्यात येणार असून मुंबईतील वाय.एम.सी.ए. च्या कुठल्याही केंद्रात प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येतील.  या सर्व शिबिरांसाठीच्या अधिक माहिती साठी www . ymcabombay .org  या संकेत स्थळावर अथवा वाय.एम.सी.ए. हेल्पलाईन ७२०८९२८८५३  किंवा मुंबई वाय.एम.सी.ए.चे सरचिटणीस लेओनार्ड सॅलिन्स यांच्याशी ९८९२४०२९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  या शिबिरांसह ८ ते १८ या वयोगटातील खेळाडूंना स्वयंपूर्ण आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई बाहेरील शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.