Month: April 2024

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या

मुदतपूर्व सुटकेचा मार्ग मोकळा मुंबई: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा मार्ग उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोकळा केला असतानाच भाजपने गवळीच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना बहीण संबोधून महापौर बनवण्यासाठी मदत करण्याचे दिलेले आश्वासन त्याचेच निदर्शक मानले जाते. नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपावरून अरुण गवळीसह इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती. २००६ च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची ६५वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. २०१५च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र २००६च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते. याप्रश्नी सरकारला येत्या दोन आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. लोकसभेच्या धामधुमीत ही घटना घडत असल्यामुळे तिचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढीची शक्यता होती. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातले. “मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच (अरुण गवळी) अ.भा.सेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील”, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. एकेकाळी अरुण गवळीचे शिवसेनेशी चांगले संबंध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीरपणे तुमचा दाऊद तर आमचा गवळी असे म्हटले होते. शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर गवळीने स्वतःचा अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला. अरुण गवळी आमदार झाला. कन्या गीता गवळीसह त्याची वहिनी वंदना गवळी आणि कार्यकर्ता सुनील घाटे महापालिका निवडणुकीत विजयी झाले. गीता गवळीची महापालिकेत शिवसेनेशी जवळीक होती, परंतु अलीकडच्या काळात भाजपशी जवळीक वाढली होती. न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे. राजकीय वाटचाल २००४ च्या लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अरुण गवळी ‘अभासे’कडून उभा होता, त्यावेळी ९२ हजार २१० मते मिळाली. चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून २००४ रोजी अरुण गवळीने विजय मिळवला होता. त्याला ३१ हजार ९६४ मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत गवळीचा काँग्रेसच्या मधू चव्हाण यांच्याकडून पराभव झाला. अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांनी २०१४ आणि २०१९ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना अनुक्रमे २० हजार ८९५ आणि दहा हजार ४९३ अशी मते मिळाली होती.

भाजपच्या दबावाला शिंदेंचा ‘खो’

ठाण्याची जागा शिवसेनाच लढवणार? ठाणे : आली लग्न घटीका समीप… तरीही नवऱ्या मुलाचा पत्ता नाही, अशी काहीशी अवस्था ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीची झाली आहे. आधी जागा वाटपासाठी चर्चांचे गुर्‍हाळ व त्यानंतर पसंत- नापसंतीचा रंगलेला खेळ यामुळे गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघात बिनचेहऱ्याचा नुसताच प्रचार सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्यास अवघे चार दिवस उरले आहेत, तरी नावाची घोषणा झाली नाही. शिंदे गटाकडे ही जागा येणार हे निश्चित झाले आहे; पण भाजपप्रणित नावावर फुली मारत शतप्रतिशत शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात पाठवण्यावर शिंदे गट ठाम आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असला तरी खरी लढत ही शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे विभागलेले दोन मावळे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत या मतदारसंघासाठी तडजोड न करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळेच सुरुवातीपासून दावा करणाऱ्या भाजपला जागावाटपात एक पाऊल मागे टाकण्यास भाग पडले. चिन्ह तुमचे उमेदवार आमचा हा फॉर्म्युला देत सुरुवातीला संजीव नाईक यांचे नाव भाजपने पुढे केले. त्यांना तयारीला लागा, असे संकेत देताच नाईक थेट प्रचारालाही लागले; मात्र या नावाला शिंदे गटातून नापसंती मिळाल्याने नवीन उमेदवार देण्यात आला; पण या नवीन चेहऱ्याला जनाधार नसल्याचे सांगत मोठी फुली मारण्यात आल्याचे समजते. शिंदे गटात सुरुवातीपासूनच माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांची नावे आघाडीवर आहेत. असे असताना भाजपकडून उमेदवार आयात केला असता मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. महविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यात त्यांच्या मेळावे आणि सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये होणारी गर्दी शिंदे गटाला आव्हान आहे. अशा घट्ट पाय रोवलेल्या मूळ ठाणेकर चेहऱ्याला टक्कर द्यायची असेल, तर महायुतीतील उमेदवारही तितकाच ताकदीचा पाहिजे. नुसता लोकप्रिय किंवा विचारवंत उमेदवार देऊन भागणार नाही. यावर शिंदे गटाचे एकमत झाले आहे. तसा संदेशही भाजपपर्यंत पोहोचल्याचे समजते. त्यामुळे नवीन ‘चेहऱ्या’पेक्षा चर्चेतल्याच नावाचा विचार होऊन तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी मिळणार कमी वेळ २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर १८ मेपर्यंत प्रचार करता येणार आहे. विद्यमान खासदारांनी जोरदार प्रचार सुरू केला असताना महायुतीच्या उमेदवाराचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. उद्या नाव जरी जाहीर केले तरी महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी अवघे २० ते २५ दिवस मिळणार आहे. नवी मुंबई ते मिरा- भाईंदरपर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात प्रचाराचे आव्हान उमेदवाराला पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान, उमेदवार कोणताही असला तरी आमचा प्रचार सुरू आहे. यावेळी महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणणे हे ध्येय असल्याने तशी अडचण भासणार नसल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका!

इगतपुरी यार्डमध्ये रेल्वेची मॉकड्रील ठाणे : रेल्वे दुर्घटना, आगीच्या घटना, पूल कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा विभागाने कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देत असते. सोमवारी मध्य रेल्वेने,इगतपुरी अप यार्डमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल केली. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल घेण्यात आली आहे. सर्वप्रथमक सकाळी ११.१० वाजता मॉकड्रिलची सुरुवात झाली. इगतपुरी अप यार्डमध्ये एक डब्या रेल्वे रुळावरून घसरून अचानक आग लागली. या अपघातांची माहिती मुंबई विभागाच्या नियंत्रण कक्षाला निरोप देण्यात आला. नियंत्रण कक्षाने तातडीने कार्यवाही करत एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वे अपघात मदत वाहन (एआरटी) आणि सर्व संबंधितांना संदेश पाठविला. सकाळी सव्वा अकरा वाजता रेल्वेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच एनडीआरएफची एक तुकडी सकाळी ११.१९ वाजता घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तत्काळ संरक्षण दलाच्या व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. रेल्वेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांकडून अग्निशामक यंत्रांचा वापर करून त्यांनी ११.२४ वाजता आग नियंत्रणात आणली.एनडीआरएफच्या पथकाने सकाळी ११.२५ ते १२.०६ या वेळेत एकूण १८ जखमींना वाचवले. त्याचवेळी एनडीआरएफ आणि एआरटी च्या पथकांनी सदर डब्याचे छत दोन्ही बाजूंनी कापून प्रत्येकी एक जीव वाचवला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी, एनडीआरएफला प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.या पथकात ‘फेरो’ नावाचा आठ वर्षांचा कुत्रा देखील आपली भूमिका बजावत होता.संकटकाळातील तयारी आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेची वचनबद्धता या सरावातून दिसून आली. अपघाताची पूर्वतयारी आणि त्याच्या जलद प्रतिसादासाठी रेल्वेकडून संयुक्तपणे असे सराव सुरू राहतील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या सुरक्षा विभागाने या सरावाचे संयोजन केले होते.

६७ दशलक्ष मुले लसींपासून वंचित

रमेश औताडे मुंबई : कोविड महामारी दरम्यान पाळण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत नियमित लसीकरणामध्ये घट झाली असून जवळपास 67 दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित आहेत. असे युनिसेफने सादर केलेल्या “द स्टेट ऑफ द वर्ल्डस चिल्ड्रन ” या अहवालात दिसून आले आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत जागतिक लसीकरण तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे प्रमुख  डॉ.जीनेंद्र जैन यांनी दिली. देशात गोवरच्या प्रकरणांमध्येही चिंताजनक वाढ होत आहे. 2022 मध्ये, अंदाजे 11 लाख मुलांनी भारतातील गोवर लसीचा पहिला डोस चुकवला, ज्यामुळे गोवर लसीकरणात सर्वात जास्त अंतर असलेल्या दहा राष्ट्रांमध्ये भारताची समावेश झाला आहे असे जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस केंद्रांचा अहवाल रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) अहवालात आढळून आले असे लहान मुलांचे तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले. 2022 मध्ये 40,967 प्रकरणांची नोंद झाली असून 37 देशांपैकी भारत हा एक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. रोगप्रतिकारशक्ती विषयी बोलताना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे की , लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतात 26 रोगांसाठी लस आहेत परंतु सामान्यतः फक्त 10-12 रोगांवर लसीकरण केले जाते. पौगंडावस्था, गर्भवती महिला आणि 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्धांसह सर्वच वयोगटातील लोकांसाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे आणि इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया आणि हिपॅटायटीस यांसारख्या विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यात मदत करते असे बालरोग तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ बादशाह खान यांनी सांगितले. डिप्थीरिया, टिटॅनस आणि डांग्या खोकला (पेयुसिस) विरुद्ध लढण्यासाठी DTaP लस महत्त्वपूर्ण आहे, तर एमएमआर लस गोवर, गालगुंड आणि रुबेला विरुद्ध प्रभावी आहे. मेनिंजायटीस मेनिन्गोकोकल लसीने, व्हेरिसेला लसीमुळे कांजण्या, आयपीव्ही लसीने पोलिओ आणि न्यूमोकोकल लसीद्वारे न्यूमोनिया टाळता येतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकार एचपीव्ही लस देखील पुरवते असे डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले. लसीकरणाचे दर देशभरात कमी होत आहेत मात्र  लसीकरणाबाबत जागरुकता नसल्यामुळे लहान मुले आणि प्रौढावर लसीकरणाचा परिणाम होत आहे. गालगुंड आणि एमएमआर लस वगळल्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. न्यूमोनियाची लस न घेतल्याने होणारी गुंतागुंतीची प्रकरणे वाढत आहेत. सरकार मोफत लस देत असूनही, अनेक लोक अजूनही लसीकरण करत नाहीत आणि त्यामुळे आरोग्यासंबंधी गुंतागुंत वाढते . कोविड-19 साथीच्या आजारापूर्वी किंवा त्यादरम्यान जन्माला आलेली लसीकरण न झालेली मुले आता विविध लस-प्रतिबंधात्मक आजारांनी ग्रस्त आहेत. असे डॉ बादशाह खान यांनी सांगितले. पर्यायी लस जसे की न्यूमोकोकल लस, फ्लू लस, कांजिण्यांसाठी व्हॅरिसेला लस, हिपॅटायटीस ए लस प्रौढांना द्यावी. फ्लू किंवा इन्फ्लूएंझा लस दरवर्षी सर्व वयोगटातील लोकांनी विशेषतः मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांनी घ्यावी. न्यूमोकोकल लस देखील उच्च-जोखीम असलेल्या लोकसंख्येस किडनी, आणि हृदयरोग, केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांकरिका फायदेशीर ठरते. इम्युनोसप्रेसेंट असलेल्या लोकांमध्ये न्यूमोनिया घातक ठरू शकतो म्हणून एखाद्या समुदायात एखाद्‌या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिमांचं आयोजन केले आहे. असे  डॉ जिनेंद्र जैन यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेतर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा

तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन ठाणे : रायलादेवी तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिक कचऱ्याचे संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेतर्फे सोमवार, २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. परिसर भगिनी विकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रायलादेवी तलाव परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत भीम नगर येथील अभ्यास वर्गातील विद्यार्थी, कचरा वेचक महिला, महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला. त्यांनी या अभियानात परिसरातून २५ किलो प्लास्टिक कचरा संकलित केला. याप्रसंगी, विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर, या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी नागरिकांना पर्यवरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात, २२ एप्रिल रोजी डॉ. संजय जोशी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी पर्यावरण चळवळ, त्याची सुरूवात, वसुंधरा दिनाचा इतिहास याची माहिती दिली. यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ग्रह वि. प्लास्टिक अशी आहे. त्याअनुषंगाने, डॉ. जोशी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर, त्याच्या विविध प्रकारांमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला परिणाम याची माहिती उदाहरणांसह दिली. तसेच, दैनंदिन जीवनशेलीमध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली. आतापर्यंत या कार्यशाळेची १० सत्रे झाली आहेत. ती आपलेपर्यावरण या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत. ही सत्रे दर शुक्रवारी दु. ४ ते. सायं. ६ या वेळात ऑनलाईन होतात. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले आहे. जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती, वृक्ष लागवड, संवर्धन, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर यावरही भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचेही मनिषा प्रधान यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले

२४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा मुंबई : उन्हाळी सुट्टीदरम्यान महानगरपालिकेच्या दहा जलतरण तलावांत पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. येत्या २ मे पासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार असून त्यासाठीची नावनोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्याची लिंक २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यान्वित केली जाईल. तसेच, प्रशिक्षणाचे दुसरे सत्र २३ मे पासून सुरु होईल. जलतरण हा क्रीडा प्रकार असण्यासोबतच एक उत्तम व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकरांना जलतरण या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे १० तरण तलाव कार्यान्वित आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने इच्छुकांना या क्रीडा प्रकारापासून लांब राहावे लागते. पोहण्याची कला शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात महानगरपालिकेने प्रशिक्षण वर्गांची संधी उपलब्ध करून दिली आहे. हे प्रशिक्षणवर्ग महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आले आहेत. या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी ठेवण्यात आली असून पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी २ हजार १०० रूपये, तर १६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. जलतरण प्रशिक्षण दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये दिले जाणार आहे. या विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्द्तीने २४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू होणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठीच्या जलतरण तलावांची यादी महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम) जनरल अरूणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व) सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा,दहिसर (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदान,मालाड (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व) बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी बृहन्मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा

ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा

पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा ठाणे : येथील कोलशेत भागातील २०.५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. यानिमित्ताने सेंट्रल पार्कला भेटी देण्याचा नागरिकांचा ओढा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या (कन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ हे उद्यान विकसित करून घेतले आहे. या उद्यानाला विविध प्रकारची ३ हजार ५०० हून अधिक रोपे, फुल झाडे आहेत. मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. मुलांसाठी खेळायला जागा, ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्यानाचे ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले असून याठिकाणी ठाणे शहरासह मुंबई महानगरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजार ६२ अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये ३ लाख ८२ हजार ४२२ प्रौढांचा, २२ हजार ८७१ ज्येष्ठ नागरिकांचा तर, ७९ हजार ७६९ लहान मुलांचा समावेश आहे. या उद्यानातून पालिकेला आतापर्यंत १ कोटी १६ लाख ९७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणीदर आकारणी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना जुन्या दरानेच पाणी दर आकारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला शासनाने मंजुरी दिल्याने प्रशासनाने १ एप्रिलपासून जुनेच पाणी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी पाणी पुरवठा विभागाकडून पालिकेचा महसूल वाढ करण्याच्या दृष्टीने पाणी दर वाढीचे प्रस्ताव आयुक्तांंकडे दाखल केले जातात. नवीन वाढीव दर लागू केले तर नागरिकांकडून ओरड सुरू होते. आणि त्याचा परिणाम मग राजकीय मंडळींकडून दबाव येण्याकडे होतो. आगामी पालिका निवडणुकींचा विचार करून या राजकीय दबावापोटीच प्रशासनाने नागरिकांवर पाणी दर वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या नवीन दर प्रणालीप्रमाणे गेल्या वर्षी ज्या दराने नागरिकांनी पाणी दराची देयके भरली त्याच दराने आगामी आर्थिक वर्षात नागरिकांंना पाणी दराची देयके भरावी लागणार आहेत. ही दरवाढ न केल्याने पालिकेला मिळणाऱ्या वाढीव महसुलावर पाणी सोडावे लागते. पालिकेला दरवर्षी पाणी देयक वसुलीतून सुमारे ८० कोटी महसूल मिळणे अपेक्षित असते. या पाणी दर वसुलीतील सुमारे २० ते ३० कोटी वसुलीवर पालिकेला पाणी सोडावे लागले. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशाप्रमाणे मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांंनी १ एप्रिलपासून प्रशासकीय ठरावाप्रमाणे जुने पाणी दर लागू करण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारीमध्ये जुने पाणी दर लागू करण्याचा ठराव प्रशासनाने केला होता. आगामी आर्थिक वर्षासाठी पालिकेने पाणी देयकाच्या माध्यमातून ९० कोटी ६० लाख रुपये वसुलीचा लक्ष्यांंक पालिका अर्थसंकल्पात निश्चित केला आहे. पाणी दर आकारणी सर्व प्रकारच्या घरगुती पाणी वापरासाठी प्रति घनमीटर ७ रुपये आकारणी. धार्मिक स्थळे, शिक्षण संस्था प्रति घनमीटर १५ रुपये. सर्व प्रकारची व्यापारी दुकाने प्रति घनमीटर ३० रुपये. १५ खाटांच्या रुग्णालयांना प्रति घनमीटर ३० रुपये. १५ हून अधिक खाटांच्या रुग्णालयांसाठी प्रति घनमीटर ५० रुपये. उपहारगृहे, मंगल कार्यालये, व्यापारी निवासी संकुल प्रति घनमीटर ६० रुपये. कारखाने, तबेले, गॅरेज प्रति घनमीटर ६० रुपये.

‘आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्या’

महापालिका आयुक्त  डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता पालन केली जात असल्याबद्दल विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतच्या आढावा बैठकीत दिले. आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचार फलक यांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डींग, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खाजगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घेण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वत: पाहणी करून गांभीर्याने लक्ष द्यावे असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटी बसेस व बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसार माध्यमांचा अधिक चांगला उपयोग करून व्यापक जनजागृती करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये, विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा व या कक्षाव्दारे नागरिकांना मतदानाविषयी, त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्र आदी बाबींविषयी माहिती द्यावी, मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योगसमुह याठिकाणी भेटी देऊन मतदान करणेविषयी जनजागृती करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. लोकसभा निवडणूकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्ट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, रूग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध  माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप अशा समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करावा तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून व बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करून जनजागृती करण्याचे सूचित करण्यात आले. प्रचार, प्रसिध्दीप्रमाणेच मतदान केंद्रांची सर्व आवश्यक सुविधांसह सिध्दता करून ठेवण्याचेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. ही केंद्रे मा.निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे तळमजल्यावर असावीत असे सूचित करीत या केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुव्यवस्थित रितीने पार पडणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच या निवडणूकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांचे विभागप्रमुख व सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना आढावा बैठकीत दिले.

‘राजगती’ नाटकाची ५ मेला शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रस्तुती !

अनिल ठाणेकर ठाणे : देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानाच्या राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, मंजुल भारद्वाज रचित ‘राजगती’ हे नाटक, रविवारी ५ मेला सकाळी ११ वाजता शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे. लोकशाही आणि संविधान कायम ठेवायचे असेल तर जनतेचा विवेक जागृत करणे आवश्यक आहे. लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विकारी प्रवृत्तींनी संविधान उद्ध्वस्त करण्याची घोषणा केली आहे. आम्ही संविधान बदलू असे उघडपणे जाहीर केले आहे. अशा विनाशाच्या काळात ही निवडणूक केवळ सरकार निवडण्यासाठी नाही तर संविधानाची  मूल्य जपणारे लोकशाहीचे शिलेदार निवडण्यासाठी आहे. लक्षात ठेवा २६ जानेवारी १९५० रोजी भारतात प्रथमच सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला. समतेने वर्णव्यवस्थेतून मुक्तीचा बिगुल फुंकला आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला व महिलांना समानतेचा अधिकार मिळाला. विचार करा, आपल्याकडून या समानता आणि मतदानाचा हक्क काढून घेतला तर आपल्याला कसे वाटेल? मणिपूरप्रमाणे भारतभर महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर आपल्याला काय वाटेल ? अस्मिता आणि प्रतिष्ठा या शब्दांनी भ्रमाचे जाळे पसरवले जात आहे. पण त्याऐवजी ‘सत्य, अहिंसा आणि संविधान’ हा भारताचा वैचारिक आणि तर्कशुद्ध कणा म्हणजे भारतीयता आहे. हे भारताच्या लोकांनो, जागे होऊया आणि संविधान जपुया. राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणे, निवडणुका घेणे किंवा संसदेत वाद-विवाद करणे नव्हे, तर मानवतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची चेतना जागृत करण्याची प्रक्रिया आहे. ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स शुभचिंतक आणि अभ्यासक’ रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित नाटक  ‘राजगती’ रविवारी ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर येथे प्रस्तुत करणार आहेत. राजकारण म्हणजे घाणेरडे, राजकारण हे केवळ राजकीय पक्षांपुर्ते मर्यादित आहे, याचा भ्रम मोडीत काढून देशाच्या जनतेला नागरिक करण्याची प्रक्रिया आहे हे नाटक. देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानानुसार राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, ‘राजगती’ हे नाटक ! संविधानाने आपल्याला मालक होण्याचा हक्क दिला आहे आणि तो हक्क म्हणजे मताधिकार. आपण आपला मताधिकार निभवत नाही आणि मग दरवेळी राजनीतीला नावं ठेवतो.आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती ‘वाईट’ आहे,चिखल आहे. राजनीतिशी आमचं काहीही घेणं देणं नाही. आपले आयुष्य  दर क्षणी ‘राजनीती’ ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक ‘सभ्य’ नागरिक होऊन आपण केवळ आपल्या ‘मताचे दान’ करतो किंवा आपले मत मोफत धान्य,पैसा, दारू किंवा साडीसाठी विकतो. जेव्हा तुम्ही तुमचे मत विकता, तेव्हा लक्षात घ्या तुम्ही तुमचा देश ही विकता. ही आपल्या राजनैतिक भूमिकेपासूनची पळवाट आहे. एक क्षण विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत ? आणि जेव्हा देशाचे नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि आज तेच घडतं आहे. नाटक राजगति जनतेला आपल्या राजनैतिक मुक्तिसाठी चार सूत्र देते सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति. सत्ता नेहमीच भ्रष्ट राहणार, मग ती कोणतीही असो किंवा कोणाचीही असो, व्यवस्था आपल्या जडत्वातून कोणत्याही परिवर्तनाला प्रभावहीन बनवते, राजनैतिक चरित्र घडवल्याशिवाय संपूर्ण राजनैतिक प्रक्रिया पाखंडाची शिकार होते. म्हणूनच सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति या चारही आयामांना एकत्र समजणे अनिवार्य आहे. नाटक राजगति ‘राजनीति’ ला पवित्र नीती मानते. जनतेकडून राजनीति मध्ये विवेकपूर्ण सहभागितेची अपेक्षा करते. राजनीति सत्ता, व्यवस्था आणि राजनैतिक चरित्राला स्वच्छ करणारी पवित्र नीती आहे. प्रत्येक भारतवासीयांत राजनीतिची विवेकी मशाल पेटवून आपल्या स्वतंत्रता सेनानींनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण काही  सत्तालोलुपांनी, सत्तेच्या दलालांनी‘राजनीति घाण आहे या कलंकाला सुनियोजित षडयंत्राने १४२ करोड देशवासियांच्या मेंदूत रुजवले. ज्याच्या मूळे जनता राजनैतिक प्रक्रियेत सहभागी नाही होत. कोणी सहभागी होत आहे तर ते फक्त सत्तालोलुप जे भांडवलदारांच्या बळावर वोट विकत घेऊन प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचे हनन करत आहेत. नाटक ‘राजगती’! हुकूमशाही सत्ता आणि राजकीय परिदृश्याला बदलण्याचे राजकीय सूत्र आहे.