मतदान जनजागृतीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेचा
पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम स्लग- मतदान ओळखपत्र असणाऱ्यांना पुस्तकांवर २० टक्के सवलत उल्हासनगर : यंदाचा १ मे हा महाराष्ट्र दिन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या १ मेला उल्हासनगर येथील ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करुया’ या संकल्पनेवर आधारीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. हे पुस्तक प्रदर्शन १ ते ३ मे २०२४ रोजी असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपायुक्त किशोर गवस आणि सुभाष जाधव तसेच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपस्थिथ राहणार आहेत. यंदाचे वर्ष हे निवडणुकाचे वर्ष असल्यामुळे मतदारांमध्ये मतदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी नाविन्यपूर्ण अशा या उपक्रमाचे आयोजन या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे या पुस्तक प्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचकांना १० टक्के सवलत् मिळणारच आहे पण ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असेल अशा वाचकांना अतिरिक्त १० टक्के म्हणजे एकूण वीस टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे, अशी माहिती उल्हासनगर महानगर पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांनी दिली. इतकेच नाही तर ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष या पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. या कक्षात मतदान ओळखपत्राची प्रक्रीया सुरु केल्यास त्या वाचकाला देखील अतिरिक्त दहा टक्के सवलतीचा लाभ पुस्तक खरेदीवर घेता येणार आहे. त्यासोबतच या पुस्तक प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून लिहून घेतली जाणार आहे आणि त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत. मतदार जनजागृती करीत असतानाच उल्हासनगर महानगरपालिकेतील बालकांचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही विशेष उपक्रम या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केला जाणार आहेत असेही आयुक्त शेख यांनी सांगितले. या पुस्तक प्रदर्शनात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तर सत्कार करण्यात येणारच आहे पण त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या या नैपुण्याला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचा, त्यांच्या शिक्षकांचा आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळू शकेल अशी यामागील कल्पना आहे त्यासोबत उल्हासनगरमधील रहिवासी असणारे अभिषेक ताले हे नुकतीच प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचाही विशेष सत्कार यावेळी आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तक प्रदर्शनात येणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण व्हावा हा त्यामागील उद्देश. या तीन दिवसीय पुस्तक प्रदर्शनास आपण भेट देऊन पुस्तकांशी दोस्ती करण्याचे आवाहन आयुक्त शेख यांनी केले आहे.
