Month: April 2024

१०० टक्के मतदान करण्याचा ठाणे शहरातील चर्चच्या सदस्यांचा निर्धार

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 148 ठाणे मतदारसंघ निवडणूक कार्यालयाच्या वतीने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती मोहिम सुरू आहे. याअंतर्गत काल रविवारी ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च व लेडी फातिमा चर्चमध्ये जमलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच चर्चच्या फादरनी सुद्धा चर्चच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. 148 ठाणे मतदार संघ निवडणूक कार्यालयाच्यातर्फे आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत ठाण्यातील विविध ठिकाणी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. याअंतर्गत काल माजीवाडा येथील अवर लेडी फातिमा चर्च तसेच पोखरण रोड येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चमध्ये जमलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन स्विपच्या टीमने तसेच चर्चच्या फादरनी केले. पोखरण रोड क्रमांक दोन येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चचे फादर जॉन आल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच हजार सदस्यांनी निवडणूकीत मतदान करण्याची शपथ चर्चमध्ये घेतली. तसेच येत्या काही दिवसांत चर्चचे सदस्य मतदान वाढविण्यासाठी जनजागृती करणार आहेत. माजिवडा परिसरातील अवर लेडी ऑफ फातिमा चर्च येथे व चर्चच्या आवारात प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. या नागरिकांनी मतदान जनजागृतीचा कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यामध्ये युवावर्ग, स्त्रिया, पुरुष, दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. या सर्वांना स्विप टिमच्या वतीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. अवर लेडी ऑफ फातिमा चर्चमध्ये मतदान करा असे आम्हाला सांगण्यासाठी स्वतः प्रशासन आले आहे. मतदान जनजागृती ही खूप महत्वाची आहे. आमच्या समाजातील काही सदस्य परदेशात राहत असल्याने आणि येथे राहणारे बरेच लोक मतदानासाठी येत नसल्यामुळे मतदान टक्केवारी कमी आहे. यावर्षी सर्व सदस्यांनी मतदान करावे, यासाठी विशेष प्रयत्न करणार असून आम्ही पूर्ण उत्साहाने मतदान करणार आहोत आणि आमच्या सर्व बांधवाना मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहोत, असे चर्चच्या फादर यांनी यावेळी सांगितले. 148 ठाणे मतदार संघ निवडणूक कार्यालयाच्यातर्फे ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी जनजागृतीविषयक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील, स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्यासह यांच्यासह स्विपचे सदस्य यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

मतदार जनजागृती अभियानास बचत गटातील महिलांचा उदंड प्रतिसाद

ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयामार्फत स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात ठाणे शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत असून चिखलवाडी, भास्कर कॉलनी येथे मतदान जनजागृतीसाठी श्री स्वामी समर्थ व हिरकणी महिला बचतगटांच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन आवाहन करण्यात आले. महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृती उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. बचतगटातील महिलांना मतदानाचे महत्व समजावे आणि त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी ‘मतदान अमूल्य दान’ या संकल्पनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या परिसरातील महिलांना ‘मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार’ अशी सामूहिक शपथ देण्यात आली. बचतगटांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी, कशी वाढवता येईल या विषयावर चर्चासत्र आयोजित करून मतदान जनजागृती करण्यात आली. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहनही बचत गटातील महिला सदस्यांना करण्यात आले. या मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नेतृत्वाखाली स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्यासह टीम उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत.

‘मी बजावणार मतदानाचा हक्क!’ म्हणत पोतराज करत आहे जनजागृती

ठाणे : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय व 148 ठाणे विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता या उपक्रमामध्ये पोतराजही सहभागी झाला असून आपल्या कलेद्वारे नागरिकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. कोणताच घटक मतदानापासून वंचित नाही राहिला पाहिजे या संकल्पनेअंतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे तेथे पोतराजचे आगमन झाले. त्यांनी मतदान जनजागृतीचे फलक पाहिले, घोषणा ऐकल्या. पोतराजाने स्वतःहून स्वीप पथकास म्हणला, की आपण सर्व हे लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदान टक्का वाढण्यासाठी कार्यक्रम करत आहात. मी पण एक पोतराज आहे आणि पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक असतो. पोटासाठी मी आसूड घेऊन नाचतो, पण मी आपल्या देशासाठी मतदान करणार, मतदान माझा अधिकार आहे. यावेळी पोतराज यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व सांगितले. पोटाचे खळगे भरण्यासाठी तो पोतराज स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके ओढत होता आणि एकीकडे मतदान माझा अधिकार आहे, असे म्हणत तो गाण्यातून सर्वाना मतदान करण्याचे आवाहन करत होता. हा मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.

गुरुकुल शाळेत जागतिक वसुंधरा दिन साजरा

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेतर्फे सोमवारी (ता. २२) आनंद विश्व गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी वसुंधरा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची ‘प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक’ ही थीम होती. यावेळी विद्यार्थ्यांना मित्तल पार्क आणि प्रकृती सोसायटीच्या आवारात असणाऱ्या हेरिटेज ट्रीबाबत माहिती देण्यात आली. परिसरात जांभूळ, आंबा, वड, निलगिरी यांसारख्या हेरिटेज वनस्पती आहेत. तसेच आसाणा, आपटा, काटेसावर, पारिजातक, आंबा अशा अनेक वनस्पतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आमराईतल्या आंब्याचे महत्त्व सांगण्यात आले. आमराईच्या परिसरातील अनेक झाडांच्या बिया खाली पडल्या होत्या. त्या बिया विद्यार्थ्यांना गोळा करण्यास सांगितले. तसेच या बियांचे रोपण कसे करावे, याबाबत हरियाली संस्थेचे ओम प्रकाश यांनी माहिती दिली. प्रकृती सोसायटीच्या सभासद वीणा जोशी यांनी सोसायटीच्या आवारात असलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाला विद्यार्थ्यांसोबत भेट दिली. आपल्या वसुंधरेला हरित ठेवायचे असेल, तर सर्वांना कचरा व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वसुंधरेचे संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. तर ‘माझी वसुंधरा माझी जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य सर्वांनी अंगीकारले पाहिजे. माझी वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे पौर्णिमा शिरगावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मित्तल पार्कचे कार्यकारिणी सभासद करमरकर तसेच उल्हास प्रधान, पूनम शाह, स्मिता खराडे, संजय बाबर आदी उपस्थित होते.

म्हात्रे यांच्या मेळाव्यास काँग्रेस कार्यकर्त्यांची दांडी

मुरबाड : महाविकास आघाडी घटकपक्ष तर्फे मुरबाड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याने आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे मुरबाड तालुका संपर्कप्रमुख संतोष जाधव यांनी वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर टाकले नसल्याने शिवसैनिकही संभ्रमात पडले आहेत. भिवंडी मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाची जिल्हापातळीवर चर्चा सुरू आहे. भिवंडी लोकसभा निवडणुकीत बाळ्या मामा म्हात्रे यांना पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर आम्ही प्रचारात उतरणार असल्याचे मुरबाड तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष चेतन पवार यांनी सांगितले. दरम्यान, भाजप नेते व मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे हे म्हात्रे यांचे कट्टर समर्थक आहेत. मुरबाड तालुक्यातील प्रचाराची धुरा त्यांच्यावर आहे; पण मेळाव्यात ते शेवटपर्यंत व्यासपीठावर राहिले नाहीत.

ताडगोळे, करवंद, जाम आणि चिंचेचा दरवळ

ठाणे : लांबूनच पाहून तोंडाला पाणी सुटेल, असा चविष्ट असणारा रानमेवा बाजारात दाखल होऊ लागला आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. अशातच बाजारात रसरशीत अशी जांभूळ, ताडगोळे, करवंद आणि जाम ही फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या बाजारात जांभूळ, ताडगोळे, करवंद आणि जाम, चिंच, आवळा, छोटा आवळा, तोतापुरी कैरीचा दरवळ सुटला आहे. ग्राहक वर्ग आवडीने या फळांची खरेदी करत आहेत. कर्जत, पालघर, तारापूर आणि भाईंदर येथून ही फळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. रसरशीत जांभूळ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जांभळामधील काही गुणधर्मामुळे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. तसेच वाढत्या गर्मीमुळे पाणीदार, आंबट, तुरट आणि गोड चवीच्या फळाची मागणी वाढू लागली आहे. भरपूर प्रमाणात जीवनसत्व देणारा आवळा हा ८० रुपये किलोने विक्री होत आहे. आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा पेठा तयार करण्याकरिता महिला वर्गांची अधिक पसंती दिली आहे. सफरचंद, केळी, डाळिंब, कलिंगडावर सुखावणारे ग्राहक आता रानफळे खरेदी करताना दिसत आहेत. फळांचे दर न परवडणारे इतर फळांच्या तुलनेत रानफळांच्या किमती जास्त आहेत; मात्र वाढत्या गरमीमध्ये शरीरास आरोग्यदायक फळे असल्याने ग्राहकांची मागणी आहे. ताडगोळे १५० ते १६० रुपये डझन, जांभूळ ८० ते १०० रुपये पाव किलो तर जाम ५० रुपये किलो अशा किमतीत सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ग्राहक वर्ग आवडीने या सर्व फळांची खरेदी करत आहेत. रानफळे आम्ही वसईवरून घेऊन आलो आहोत. सध्या उन्हाळा चालू असल्याने यामध्ये विशेषतः कैरी व आवळ्याची खरेदी अधिक केली जात आहे. यापासून कोणी लोणचे तयार करत आहे तर कोणी मुरांबा तयार करण्यासाठी घेऊन जातात.

राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक

प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही मुंबई : महारेराकडे जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेल्या २१२ प्रकल्पांबाबत महारेराच साशंक आहे. हे प्रकल्प सुरु झाले आहेत का? या प्रकल्पांची सद्यस्थिती काय याबाबतची कोणतीही माहिती या प्रकल्पांतील विकासकांनी महारेराकडे सादर केलेली नाही. प्रकल्प महारेराकडे नोंदविल्यानंतर दर तीन महिन्याला महारेराकडे त्रैमासिक प्रगती अहवाल विहित प्रपत्रात सादर करून तो संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. असे असताना विकासकांनी माहितीच दिली नसल्याचे उघड झाले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान महारेराकडे नोंदविलेल्या २३६९ प्रकल्पांपैकी ८८६ प्रकल्पांनी त्रैमासिक प्रगती अहवाल सादर केले नव्हते. त्यामुळे हे प्रकल्प स्थगित करून त्याचे बँक खाते गोठवणारी, प्रकल्पाच्या सर्व व्यवहारांवर बंदी आणण्यासाठीची कलम ७ अंतर्गत ३० दिवसांची नोटीस दिली होती. शिवाय वेळोवेळी दूरध्वनीवरून आवाहनही केले होते. त्यानंतर यापैकी ६७२ प्रकल्पांनी दंडाची रक्कम भरली. त्यातील २४४ प्रकल्पांनी रक्कम भरूनही त्रैमासिक प्रगती अहवालाची पूर्तता केलेली नाही. त्यांच्याकडून हे अहवाल अद्ययावत करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी जानेवारीतील ६०, फेब्रुवारीतील ५८, मार्चमधील ४० आणि एप्रिलमधील ५६ अशा एकूण २१२ प्रकल्पांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. हे प्रकल्प सुरू झाले आहेत की नाही, त्यांची सद्यस्थिती काय याचीही माहिती नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांची यादी महारेराने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे घर खरेदी करताना ही यादी तपासावी असे आवाहन महारेराने केले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांचं स्वप्न धोक्यात

शिवमंदिराच्या भिंतीला लागूनच अनधिकृत बांधकाम उल्हासनगर : उल्हासनगर आणि अंबरनाथच्या सीमेवर असलेल्या प्राचीन शिव मंदिराच्या भिंतीला लागूनच अनधिकृत रित्या आरसीसी बांधकाम केले जात आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपरिषद मूग गळून गप्प बसल्याने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे शिव मंदिर परिसराचा विकास करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे का अशी चर्चा शहरात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोध्याचे महंत गोविंद गिरी महाराज, पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते १५०  कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन आर्ट फेस्टिव्हलच्या वेळी करण्यात आले. ९६५ वर्ष अति प्राचीन असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनामार्फत १५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे, आणि या दीडशे कोटींच्या माध्यमातून शिवमंदिर परिसरात विविध  विकास कामे होणार आहेत. ज्याप्रमाणे भाविक काशीला जातात महाकालला जातात. त्याचप्रमाणे अंबरनाथ शिव मंदिराचा कॉरिडोर ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस फक्त अंबरनाथ मधील नाही तर देशा विदेशातील लोक या अंबरनाथ शिव मंदिराला भेट देण्यासाठी येतील असे खासदार डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगर विकास मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेतील मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण हो इच्छित नाहीत. प्राचीन शिव मंदिराच्या भिंतीला लागूनच आरसीसी बांधकाम जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम दिसू नये म्हणून काळा कपडा लावून लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे बांधकाम इतरांच्या नजरेने लपत असले तरी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे, शिवमंदीर परिसरातील बीट मुकादम यांच्या नजरेतून आर्थिक देवाण-घेवाण करून लपविले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या संदर्भात अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

तर लोकसभा निवडणुकीत मतदानच करणार नाही

आदिवासी क्रांती सेनेचा इशारा गेल्या दहा वर्षात आदिवासींवरील अत्याचारात वाढ वनवासी शब्दाला आक्षेप ठाणे : भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८ ते ९ टक्के लोकसंख्या ही आदिवासींची आहे. या देशातील मूळ निवासी असलेल्या आम्हा आदिवासींना आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येत आहे. आदिवासींना ‘वनवासी’ असे गोंडस नाव देऊन नैसर्गिक संसाधनांपासून दूर केले जात आहे. आदिवासींच्या जमिनी लाटण्यासाठी नवीन कायदे करण्याचे धोरण आखले जात आहे. गेल्या दहा वर्षात आसाम, ओडिशा, मिझोराम आदी ठिकाणी आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे प्रयत्न केले आहेत.  त्याविरोधात आदिवासी क्रांती सेना ‘उलगुलान’ आंदोलन छेडणार असून भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना धडा शिकवणार आहे. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील; त्यानंच मतदान केले जाईल अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू , असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी पत्रकार परिषदेत दिला. अनिल भांगले यांनी सांगितले की , सन २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत आदिवासी समाजाने भाजपला पाठबळ दिले होते. भाजपच्या जुमलेबाजीला भुलून आदिवासींनी भाजपाला मते दिली असली तरी त्यानंतर आदिवासींवरील अत्याचारात वाढच झालेली आहे.  भारताच्या स्वातंत्र्याला ७५  वर्षे उलटूनही आदिवासी समाजाला आजही भारतभर प्रचंड हिंसाचार सहन करावा लागत आहे.  गेल्या दहा वर्षांत  आदिवासींचे खून, आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे 76,899 गुन्हे घडले आहेत.   विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली प्रकरणे  असून त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेच नोंद झालेले नाहीत. आदिवासींवरील  वाढत्या गुन्ह्यांपैकी एक मोठा भाग भारतीय जनता पक्ष शासित केंद्र सरकारच्या काळात घडला आहे.  मध्य प्रदेश ,  छत्तीसगड ,  राजस्थान  आणि  महाराष्ट्र या राज्यांमध्ये   आदिवासी महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या नोंदी  मोठ्या संख्येने  आहेत.  आदिवासींवरील हा  अन्याय – अत्याचार रोखण्यासाठी  केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. उलटपक्षी आदिवासींच्या जमिनी लाटण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्याची सुरुवात ओडिशामधून झालेली आहे. आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांना खरेदी करता याव्यात, यासाठी कायद्यात बदल करून आदिवासी समाजाला त्यांच्या जंगलांपासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी क्रांतिनायक बिरसा मुंडा यांनी सुरु केलेली उलगुलान ही  चळवळ आम्ही राज्यभर सुरु करणार आहोत. आताचे केंद्र सरकार हे आदिवासींच्या मुलावर उठलेले असल्याने आता आम्ही या  सरकारला घराचा रास्ता दाखवण्यासाठी लढा उभारणार आहोत. भाजपाला मत देऊ नये, असे आवाहन आम्ही समाजबांधवांना करणार आहोतच; पण, जर आम्हाला योग्य  महाराष्ट्रातील सर्व भागात जनजागृती करून आदिवासींना स्वतः;चे हित कष्ट आहे, हे समजावून सांगणार आहोत. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील; त्यानंच मतदान केले जाईल अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू, असेही भांगले यांनी सांगितले. वनवासी नव्हे,आदिवासीच ! जे पूर्वापार जंगलांमध्ये रहात आले आहेत. ते इथले मूळ निवासी आहेत. आदिवासींनी कधीच जंगलांवर अतिक्रमण केलेले नाही. उलट भांडवलदार जंगलांमध्ये घुसखोरी करीत आहेत. जंगल हे आमचे घर आहे. जे लोक काही कलासासाठी वनात राहतात. ते वनवासी होतात. पण आमचा जन्मच वनात झालेला आहे. त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नये; आम्ही या देशातील आदिम रहिवासी आहोत, असे सांगत भांगले यांनी वनवासी या शब्दास विरोध केला.

तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील कल्याण : कल्याण मधील विठ्ठलवाडी, शहाड भागातून वाहत असलेल्या वालधुनी नदी पात्रात मागील दोन महिन्यांपासून मातीचे भराव टाकून बांधकामे उभी केली जात आहेत. या बांधकामांमुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडून वालधुनी नदीचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरून रहिवाशांची दैना होणार आहे. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, महसूल विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ वालधुनी नदी काठ भागातील तीन हजार कुटुंबीयांंनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीने हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला की वालधुनी नदीचे पाणी विठ्ठलवाडी, शहाड भागातील नदी काठच्या झोपड्या, गृहसंकुलांमध्ये शिरते. दरवर्षी कल्याण डोंबिवली पालिकेला या भागातील पाण्याचा निचरा करताना कसरत करावी लागते. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिकेने विठ्ठलवाडी पूर्व भागात वालधुनी नदी काठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्वावर एक बांधकाम प्रकल्प एका विकासकाला विकसित करण्यासाठी दिला आहे. या बांधकामासाठी नदीमधील अर्धा भाग मातीचा भराव टाकून बुजविण्यात आला आहे. या भरावामुळे नदीचा प्रवाह अरूंद झाल्याने पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती नसताना नदीचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये घुसून रहिवाशांना बेघर होण्याची वेळ येणार आहे, असे वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंंदर्भात पालिका आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांना सांगुनही कोणीही संघर्ष समितीच्या तक्रारींची दखल घेत नाही. या भागातील रहिवाशांना जलमय करण्याचा आणि बेघर करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्याचा निषेध म्हणून या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे, असे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. फलका्व्दारे इशारा वालधुनी नदी पात्रातील बांधकाम कल्याण डोंबिवली पालिकेकडून थांबविली जात नाही तोपर्यंत आताच्या लोकसभा निवडणुकीपासून ते येणाऱ्या विधानसभा, पालिका निवडणुकीवरही वालधुनी नदी परिसरातील साईनगर भागातील रहिवासी बहिष्कार टाकतील, असा इशारा वालधुनी नदी बचाव रहिवासी संघर्ष समितीने वालधुनी नदी भागात साईनगर भागाच्या प्रवेशद्वारावर एका फलकाव्दारे दिला आहे. कल्याण परिसरात मतदान टक्का वाढविण्यासाठी शासन यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना या बहिष्काराच्या अस्त्रावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.