Month: April 2024

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

कल्याण : पावसाळ्यापूर्वीची जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (ता.२ मे) सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अभियंता रमेश गोरे यांनी सांगितले. पालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उदंचन केंद्रातील पाणी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात सोडून ते डोंबिवली पूर्व, पश्चिम शहरांना पुरवले जाते. १०० दशलक्ष लीटर मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी कल्याण शहराच्या काही भागांना वितरित केले जाते. या जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रांना महावितरणच्या टाटा पाॅवर कांबा येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठा केंद्राच्या कांबा येथील उपकेंद्रात दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेला होणारा वीज पुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. नऊ तास हे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांना, ग्रामीण भागातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, मोहने, शहाड परिसराला होणारा पाणी पुरवठ बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर-राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी डोंबिवली : कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला. यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, प्रवक्ते महेश तपासे, उपजिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे, युवा नेते वरूण सरदेसाई, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील उपस्थित होते. रखरखीत उन असूनही कार्यकर्ते हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन घामाघून होऊनही या फेरीत सहभागी झाले होते. उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी सकाळी डोंबिवलीचे ग्रामदैवत फडके रस्त्यावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्या इंदिरा चौकात उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीत दाखल झाल्या. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत वैशाली दरेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांचा जयघोष केला जातो. राष्ट्रवादी, काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा जयघोष करत होते. त्यामुळे वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले होते. ढोलताशांच्या दणदणाटाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मध्यवर्ती शिवसेना शाखेजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीला सुरूवात झाली. एका सजविलेल्या वाहनावर उमेदवार वैशाली दरेकर, युवा नेते आदित्य ठाकरे, डॉ. जितेंद्र आव्हाड, महेश तपासे, वरूण सरदेसाई, सदानंद थरवळ विराजमान झाले होते. नागरिकांना अभिवादन करत वाजतगाजत फेरी घरडा सर्कल येथील निवडणूक कार्यालयाकडे निघाली होती. यावेळी रस्तोरस्ती वाहनकोंडीचे दृश्य होते. अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा-मुंब्रा भागातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत जनता आपल्या पाठीशी आहे हे ठामपणे दिसले. विकासाच्या नावाने बोंबा ठोकल्या जात असल्या तरी विकास कोणाचा झालाय हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे या भागातील सर्व जनता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे हे आजच्या गर्दीतून, प्रचारातून दिसून आले आहे.– वैशाली दरेकर उमेदवार, महाविकास आघाडी

कल्याण लोकसभेत महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे २ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज

अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतून निघणार भव्य मिरवणूक डोंबिवलीः कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे २ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जातील. श्री गणेश मंदिरापासून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील १० वर्षात त्यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या कामांचा स्मार्ट रूपातील कार्य अहवाल नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या १० वर्षातील कामांचे सादरीकरण करत उभारलेल्या प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. सध्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर गुरूवार, २ मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, राष्ट्रीय समाज पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून डॉ. श्रीकांत शिंदे मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ विविध मान्यवर मंडळींशी भेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद यासह अनेक सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहात आहेत. तसेच विविध समाज संघटनांकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठींबा देखील जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर २ मे रोजी निघणाऱ्या मिरवणुकीला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच विविध समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. असा असेल मिरवणुकीचा मार्ग – डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी निघतील. गणेश मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक बाजीप्रभू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चार रस्ता नाका, लोकमान्य टिळक चौकामार्गे जिमखाना रस्त्यावरून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत जाईल आणि डॉ. श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ईटीसी केंद्रातील विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी रॅलीव्दारे केली मतदान जनजागृती

नवी मुंबई : सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुका होत असून भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे याकरिता ठिकठिकाणी जनजागृती मोहीमा राबवल्या जात आहेत. याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून विविध माध्यमांतून अनेक लोकप्रिय व्यक्तीही प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन करीत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रानेही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या मतदार जनजागृती मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला असून विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्ती आणि शिक्षक यांनी जनजागृतीपर रॅलीत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त श्री. शिरीष आरदवाड तसेच ईटीसी केंद्र संचालक तथा उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्र इमारतीपासून वाशी रेल्वे स्टेशन परिसरात मतदानाचे आवाहन करणारी रॅली काढण्यात आली. यामध्ये ईटीसी केंद्रातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विशेष विद्यार्थी व त्यांचे पालक आणि प्रौढ विशेष विद्यार्थी व व्यक्ती सहभागी झाले होते. यावेळी ईटीसी केंद्रातील सहशालेय शिक्षकांनी तयार केलेले मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याकरिता घोषणा देण्यात आल्या आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत त्यांना 20 मे रोजीच्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. ईटीसी केंद्राचे शैक्षणिक व्यवस्थापक व अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली या रॅलीचे सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. विशेष विद्यार्थी व व्यक्तींनी आपल्या पालकांसह रॅलीव्दारे केलेल्या मतदानाविषयक जनजागृती उपक्रमाची नागरिकांकडून प्रशंसा करण्यात आली.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी. यावेळी महापालिकेतील कर्मचारी देखील उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण केला. कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बच्छाव, नितीन राणे  आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी

सहा उमेदवारांचे अर्ज दाखल ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी   विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर…

मुंबई, ठाणे, कल्याण, भाईंदर महानगरपालिकांना ७ मे रोजी अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे : मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना आणि महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. सीवर डेथ प्रकरणी श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ गमध्ये   मुंबई उच्च न्यायालयाने  पुन्हा १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायदाच्या तंतोतंत अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.सीवर डेथ घडतात – संडासाच्या मैला टाक्या साफ करतांना सफाई कर्मचाऱ्यांना मरण येते  –  म्हणजे अजूनही The Prohibition of Employment as Manual Scavengers and Their Rehabilitation Act 2013 चे उल्लंघन होत आहे. सदर कायद्याच्या तरतुदीनुसार मानवी मैला सफाईच्या कामावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. परंतु वारंवार सीवर डेथच्या घटना घडत आहेत. ही अमानुष प्रथा बंद होण्यासाठी न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना आणि मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. महाराष्ट्र शासनाने राज्य निगराणी समिती (Monitoring Committee), दक्षता समिती (Vigilance Committee), राज्य स्तरीय सर्वेक्षण समिती, जिल्हा सर्वेक्षण समिती, उपविभागीय समित्या गठीत केलेल्या आहेत का? तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? मैला सफाई कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांनी पुनर्वसन करण्यासाठी केलेले अर्ज आणि त्यावर झालेली अंमलबजावणी बाबतीतही रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना या निकालात देण्यात आलेले आहेत. मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत वारंवार मलटाकी सफाई करतांना विषारी दुर्गंधीने गुदमरून मृत्यू कांड घडत आहेत. परंतु आजपर्यंत कुणाचेही पुनर्वसन करण्यासाठी शासनाने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला नसल्याचा आरोप ही प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा सर्वेक्षण समिती नेमून वर्ष उलटून गेले आहे परंतु समिती सदस्यांनी मागणी करूनही बैठका घेतल्या जात नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत जून २०२३ मध्ये बंद दुषित गटार सफाई करतांना २२ वर्षीय आदिवासी तरुण ऋतिक कुरकुटे मरण पावला. परंतु त्यांच्या आश्रितांनी मागणी करून ही अजून नुकसान भरपाई अदा केलेली नाही. ठाणे जिल्हा सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या कडे प्रत्यक्ष घटनेची चौकशी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरूनही पथक पाठवून सर्वेक्षण करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या अमानुषरित्या मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी आणि कायद्यानुसार त्यांचे  न्याय्य पुनर्वसन व्हावे या उद्देशाने श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महासचिव जगदीश खैरालिया, म्युज फाऊंडेशनचे श्रेयस, निशांत बंगेरा, राकेश घोलप आदी कार्यकर्ते यांनी या प्रकरणी परिश्रम घेतले.

आयुक्त बदलले तरी, ठाण्यात अनधिकृत बांधकामे सुरूच !

आमदार संजय केळकर यांची संतप्त प्रतिक्रिया अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार्स, नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला. त्यावेळी आ. संजय केळकर यांनी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेले नाही. केवळ एका सहायक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फार्स केला. याबद्दलची खंत आ. संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले. पण कारवाई शून्य ! ७२ माणसं या शहरात एका इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडली, तरी सुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. ठाणे पश्चिमेकडील उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे शेरू कुरेशी या हॉटेल मालकाने आपल्या सागर हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात राबोडीतील एका तक्रारदाराने दाखल केलेल्या रिट पीटीशनवर उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्याचे बजावले. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी ढिम्म असल्याचे जावेद शेख यांनी निदर्शनास आणले आहे. ही बाबही आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. अशीच परिस्थिती बाळकुम, ढोकाळी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोपरी आदी भागात असून येथे कारवाईचा केवळ फार्स न करता प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सध्या आचारसंहिता सुरू असून आयुक्तांनी ही बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, मात्र तरीही या प्रभागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे  आमदार संजय केळकर यांनी आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून कठोर कारवाईची मागणी केली आहे.