Month: April 2024

पाणी टंचाईबाबतच्या नियोजनासाठी आतापासूनच तयारीला लागा

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे  कठोर निर्देश ठाणे : येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठा विषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा, असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावासंबंधी  बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप,  शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,  ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड तसेच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता, उप अभियंता, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्चपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91 गाव-पाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्य:स्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्यानुषंगाने आवश्यक उपाययोजना आतापासूनच सुरू करण्यास निक्षून सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. शहापूर येथील भाऊली धरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की, त्यांनी रोजच्या रोज धरणाचे काम किती झाले याबाबत प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना रोजच्या रोज सादर करावा. या धरणाचे काम उत्कृष्ट प्रतीचे आणि वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी  तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असे एकही गाव नसावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पाणीटंचाईबाबत काटेकोर नियोजन करावे, गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. पाण्याचे टँकर व इतर आवश्यक उपाययोजनांचे आतापासूनच व्यवस्थित नियोजन करावे,  असेही ते शेवटी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे.‌ कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतरचे व उचलण्याआधीचे असे फोटो काढून फोटो संकलन करावे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्या संबंधितावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शिसोदे यांनी जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांना आश्वस्त केले की, ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी, पाणी टंचाईविषयी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा यंत्रणा काटेकोरपणे नियोजन करेल. ००००

ठाणे स्थानकात प्रवाशांची घुसमट थांबणार!

ठाणे : मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. या स्थानकावर लाखोंच्या संख्येने प्रवासी उतरतात. त्यांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेने सहा पुलांची निर्मिती केली आहे. आता या संख्येत आणखी एका पुलाची भर पडली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांच्या वापरासाठी खुलाही केला जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा पूल बांधला आहे. या पुलामुळे प्रवाशांची घुसमट कमी होणार आहे. दादरच्या मागोमाग गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाचा क्रमांक येतो. दर दिवशी या स्थानकावरून मुख्य आणि उपनगरीय रेल्वेने सुमारे ८० लाख प्रवासी ये- जा करतात. कर्जतपासून अगदी नवी मुंबई, पनवेलपर्यंत आणि कसारा, खोपोलीपासून मुंबईपर्यंत जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. हे स्थानक रेल्वेला मोठा आर्थिक हातभार लावणारे आहे. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळायला हव्यात, असा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर आणखी एक नवा प्रवासी पूल बांधला आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असून तो या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना थेट सॅटीसच्या पुलावर नेऊन सोडणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सॅटीस पुलावर जाऊन ठाणे, घोडबंदर, काशिमीरा, भाईंदर, बोरिवली आदी ठिकाणी जाण्यासाठी बस पकडणे सोपे जाणार आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १० कडून मुख्य पुलावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगाचा ठरणार आहे. हा नवा पूल मुख्य पुलाला जोडला आहे. त्यामुळे मुख्य पुलावरून ठाणे पश्चिमेकडे जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा वापर करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुलाचे बांधकाम सुरू होते. आता ते पूर्णत्वास आले आहे. आता त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्यासाठी जाण्यासाठी एकूण सहा पुलांचा वापर सुरू आहे. आता त्यात सातव्या पुलाची भर पडली आहे. पैकी सहाही पूल थेट सॅटीस पुलाशी जोडले गेले आहेत. स्थानकावर एकूण दहा प्लॅटफॉर्म असून हे सहाही पूल त्यांच्याशी जोडले जाणार आहेत. तर एक पूल सार्वजनिक आहे. त्यामुळे एकाच वेळी स्थानकावर अनेक गाड्या उभ्या राहिल्या तरी त्यातून उतरणाऱ्या गर्दीला या पुलाच्या माध्यमांतून स्थानकाबाहेर पडणे सुलभ होते. शिड्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. आता काँक्रीटीकरण केलेल्या शिड्या आणि पुलावरील फ्लोअरवर मार्बल ग्रॅनाईटच्या लाद्या बसवण्याचे काम सुरू होणार आहे. येत्या आठ- दहा दिवसांत हा पूल प्रवाशांना वापरण्यायोग्य होईल.

श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाची अद्वितीय कामगिरी

प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा पनवेल : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट यांच्यामार्फत प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाने अद्वितीय अशी कामगिरी बजावली. यामध्ये एकूण 157 किलोग्रॅमवेस्ट प्लास्टिक जमा करून शाळेने एक उच्चांक प्रस्थापित केला आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत, मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांचा मंगळवारी सत्कार केला. ही स्पर्धा इंडियन ऑइल एस पी एल ओ पी एल गेल इंडिया लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे रायगड जिल्हा आणि नवी मुंबई शाळांसाठी प्रायोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल 26 फेब्रुवारी 2024 ला जाहीर करण्यात आला होता. त्यानिमित्ताने 1 एप्रिल 2024 सोमवार रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अद्वितीय कामगिरी बजावल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचा पालक वर्ग शिक्षक वर्ग शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, इनचार्ज टीचर निकिता मॅडम आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांनी उत्स्फूर्तपणे प्लास्टिक रिसायकलिंग चे महत्व पालकांना पटवून देत घराघरातून रिसायकलेबल प्लास्टिक जमा करून शाळेत आणले तसेच ठिकठिकाणी फेकून दिल्या जाणाऱ्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत विद्यार्थ्यांनी सर्वांना समजून सांगितली.

मतदार जनजागृती गीतांच्या सिडीचे प्रकाशन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते अशोक गायकवाड रायगड : मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, तहसिलदार म्हसळा, समीर घारे आदि उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा यासाठी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर घारे यांनी या गीतांची निर्मिती केली आहे. एकूण ६ गीते असून पारंपरिक चालीवर असलेल्या या गीतांचे लेखन, गायन भिमराव सूर्यतळ यांनी केले असून संगीत सचिन धोंडगे यांनी दिले आहे. सहकलाकार म्हणून प्रतिक निकम, आदेश डेरवणकर आणि किरण शिंदे यांनी काम केले आहे. या गीतमाला सिडीची निर्मिती नायब तहसिलदार धर्मराज पाटील, तहसिलदार समीर घारे यांनी केली आहे. ही संपूर्ण निर्मिती शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आहे. या उत्कृष्ट निर्मितीसाठी संपूर्ण यंत्रणेचे जिल्हाधिकारी जावळे यांनी कौतुक करून अभिनंदन केले. रायगड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढा – न्या. ए.एस. राजंदेकर

अशोक गायकवाड रायगड : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे. विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून रायगड जिल्ह्यामध्ये ५ मेला  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे.

मतदान करण्याचे विद्यार्थ्यांकडून पालकांना आवाहन- चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांच्यामार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका निलम जाधव यांच्या उपस्थितीत पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.१५ दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली. पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. येत्या लोकसभा मतदानात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले, मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांच्यामार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले असून, हे संकल्प पत्र पालकांनी भरुन द्यावे. मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली, मॅरेथॉन याबरोबरच बोट रॅलीचे आयोजनही करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आलेल्या संकल्पपत्रामध्ये, मी शपथ घेतो, मी भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करेन. मततदान करुन आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकारी नसून, ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी अशीही शपथ घेतो, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करु शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करेन. मी अशीही शपथ घेतो, मी धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही प्रलोभास बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडेन, असा मजकूर आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका निलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेषत: उपविभागीय अधिकारी, तहसील कार्याल, नगरपरिषद, जिल्हा परिषद यंत्रणा यांच्या माध्यमातून विविध विधानसभा मतदार संघात फ्लेक्स, सेल्फी पॉईंट यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ‘मत आपले द्यायचे, कर्तव्य आपले बजावायचे’, ‘मतदान अधिकार पण, कर्तव्य पण’, ‘मतदान मतदात्याची शान’, ‘मतदानाचे कर्तव्य बजावून महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवू या’, असे संदेश देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.

मोनोरेल, मेट्रो प्रकल्पात आता अदानीची वीज

टाटाच्या वीजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रीसिटीकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. सध्या मोनोरेल, मेट्रोसाठी टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जात आहे. पण टाटा पॉवरने वीजदरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने वीजपुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका आणि मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) सह मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेसाठी सध्या टाटा पॉवर वीजपुरवठादार आहे. टाटा पॉवरकडून मोनोरेल आणि मेट्रोसाठी सध्या, २०२३-२४ साठी ४.९२ रुपये प्रति युनिट असे दर आकारले जातात. परंतु, टाटाच्या वीज दरात सोमवारपासून वाढ झाल्यामुळे २०२४-२५ साठी मोनोरेल आणि मेट्रोसाठी ७.३७ रुपये प्रति युनिट असे दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने टाटा पॉवरऐवजी अदानीची वीज घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केल्याचे समजते. अदानीकडून वीज घेतल्यास एमएमआरडीएला ६.१५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागेल. एकूणच, अदानीची वीज काहीशी स्वस्तात उपलब्ध होणार असल्याने एमएमआरडीएने वीज पुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो २ अ आणि ८ मार्गिकेसाठी दररोज १२ ते १५ मेगावॉट वीज लागते. तर मोनोरेलसाठी प्रतिदिन २ ते ३ मेगावॉट इतक्या विजेचा वापर केला जातो. दरम्यान, मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून मेट्रोतुनही एमएमआरडीएला अपेक्षित महसूल मिळत नाही. अशावेळी वीज दराचा भार वाढल्यास तोटा आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे, टाटाऐवजी अदानीकडून वीज घेण्यात येणार आहे.

सर्वत्र सुरु असलेल्या कामांमुळे ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नवी मुंबईचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे. त्‍यातच सर्वात जास्त वाहतुकीची वर्दळ असलेल्या ठाणे- बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्‍यामुळे ऐन उकाड्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या मार्गावरून बेलापूरहून ठाण्याकडे जाताना नेरूळ पार केल्‍यानंतर शिरवण्यात गावाकडे जाणाऱ्या आणि पुलावर चढणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यापासून दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तिथून पुढे सानपाडाजवळ वाशीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, त्याच्याच बाजूला एक नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुलावरून वाशीकडे जाता येते. मात्र, तुर्भे रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. येथे पूल उभारण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे रेल्वे स्थानकासमोर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाशी मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेल्वे स्थानकाच्या आतील रस्त्याचा पर्यायही खुला करून देण्यात आलेला आहे. शिवाय वाहतूक पोलिसही भर उन्हात उभे असतात. मात्र, तरीदेखील येथील मार्गावरील वाहतूक कोंडी काही कमी होत नसल्‍याचे चित्र आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक पार केल्यावर पुढे असलेल्या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. येथील मार्गावरील महापे जंक्शनवरही मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे अर्धा मार्ग रस्त्याच्या कामामध्ये बंद आहे. महापे जंक्शनवरून अनेकांना शिळफाटा गाठायचे असते. मात्र, येथील वाहतूक कोंडीमुळे जंक्शनवर बराच वेळ वाया जात आहे. एकीकडे आग ओकणाऱ्या सूर्याच्या गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत असताना ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा जीव नकोसा होत आहे.

डोंबिवलीत गोदामे, बेकायदा चाळी भुईसपाट

डोंबिवली : गोदामांचे आगर म्हणून ओळखले जाणाऱ्या, तसेच जिन्सच्या बेकायदा कारखान्यांसाठी प्रसिध्द असलेल्या गोळवली, भाल, वसार भागातील बेकायदा चाळी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. या बेकायदा चाळी निवास, काही चाळी भंगार गोदामांसाठी भूमाफियांनी सरकारी, खासगी जमिनींवर बांधल्या होत्या. गोळवली भागात मोठ्या प्रमाणात भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. पावसाळ्यात भंगार ठेवण्यासाठी भंगार विक्रेते निवासी चाळींचा भाग वापरतात. तर काही भागात भूमाफिया गोदामे उभारून ते भाड्याने भंगार विक्रेत्यांना देतात. भंगार विक्रेत्यांना भाड्याने चाळीतील खोली, गोदाम बांधून दिले की दरमहा आठ ते दहा हजार रूपये भाडे भूमाफियाला मिळते. गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत माळरानांवर गोदामे, चाळी उभारण्यात येत आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यावेळी आठहून अधिक बेकायदा चाळी, भंगारांसाठी गोदामे उभारली जात असल्याचे मुंबरकर यांच्या निदर्शनास आले. या बेकायदा चाळी चौबे नावाचा भूमाफिया बांधत असल्याचे स्थानिकांंनी मुंबरकर यांना सांगितले. चौबे हे कारवाईच्यावेळी प्रत्यक्ष हजर राहिले नाहीत. विहित प्रक्रियेचा अवलंंब करून लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथक घेऊन गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत चौेबे भूमाफियाने उभारलेल्या सर्व बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. गोळवली परिसरात गोदाम किंवा निवासासाठी कोणीही बेकायदा बांधकाम करीत असेल तर त्या जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. या भागातील भंगार विक्रेत्यांची बांधकामे, त्याची अधिकृतता तपासून या भागात तळ ठोकून असलेल्या भंगार विक्रेत्यांवर लवकरच आचारसंहितेचा भंग होणार नाही या चौकटीतून कारवाई केली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांंगितले. आय प्रभागात बेकायदा इमारती,चाळी तोडण्याची मोहीम सतत सुरू असल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा

ठाणे : गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही  त्यांच्यासाठी  ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने कळवा येथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ७ एप्रिल  दुपारी ४.०० वाजता  कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात येणार आहे.  या पालखी उत्सवानिमित्त   पालखी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून, रत्नागिरी व रायगड  या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघाना  प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्याशी +91 98190 95047; अरूण नागवेकर (वांद्री,ता. संगमेश्वर)  ९४०५०८००८५; प्रमोद चोचे ९१५२०९१७८०, ९८२०७६९९५९  या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.