गत ४५ वर्षांपासून महाराष्ट्रावर एक अतृप्त आत्मा फिरत असून हा आत्मा कायम महाराष्ट्र सरकार अस्थिर करत असतो अशा आशयाचा आरोप करणारे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका प्रचारासभेत बोलताना केले आहे. या विधानामुळे खळबळ माजणे सहाजिकच होते. मोदींचा रोख कोणावर होता हे उभ्या महाराष्ट्राने ओळखलेहीआणि ज्यांच्यावर होता त्यांनीही लगेच ओळखले.  जरी मोदींनी नाव घेतले नसले तरी हे आपल्याला उद्देशूनच केलेले विधान आहे हे ताडून महाराष्ट्रातील स्वयंघोषित जाणता राजा असलेले शरद पवार यांनी “होय मी अतृप्त आत्मा आहे” असे जाहीर करून टाकले. मी महाराष्ट्रात शेतकरी कामकरी यांची दुर्गती झाली आणि महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली की मी अस्वस्थ होतोअशा आशयाचे विधान शरद पवार यांनी मोदींना उत्तर देताना  केल्याचे वृत्त आहे.
वस्तुतः नरेंद्र मोदी यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. तरीही पवार समर्थकांनी लगेचच खाई त्याला खवखवे या न्यायाने शरद पवारांवरच हे विधान केले हे गृहीत धरून लगेच खुलासे करायला आणि मोदींवर टीका करायला सुरुवात केली. इतकेच काय पण शरद पवारांनीही आपली बाजू मांडायला सुरुवात केली. या सर्व पवार समर्थकांनी त्यांची बाजू मांडली असली तरी महाराष्ट्रातील जनतेला वास्तव काय ते नेमके माहित आहे. त्यामुळे पवारांचा आत्मा कशामुळे अतृप्त आहे ते उभा महाराष्ट्र जाणतो. शरद पवार हे एक महत्त्वकांक्षी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात . १९६७ च्या दरम्यान ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले. अवघ्या दहा वर्षात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते मुख्यमंत्री कसे बनले आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी काय खटाटोप केलाकुणाच्या पाठीत खंजीर खुपसला हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे.
१९७८ ते १९८० या काळात सुमारे १८ महिने मुख्यमंत्रीपद उपभोगल्यावर दीर्घकाळ त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही उपभोगले. नंतर पुन्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यासाठी देखील त्यांनी काय उठाठेवी केल्या ते महाराष्ट्राला माहीत आहे. २१ मे १९९१ ला मध्यावधी निवडणुकांच्या दरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे आता देशाचा पंतप्रधान कोण हा प्रश्न पुढे आला. त्यावेळी पवारांना ती रिकामी खुर्ची खुणावू लागली. पंतप्रधान बनण्यासाठी त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते पी व्ही नरसिंहराव यांच्याशीही पंगा घेतला. मात्र त्यावेळी  पंतप्रधानपदाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली. अर्थात शरद पवार दिल्लीत राहणे नरसिंहरावंच्या दृष्टीनेही अडचणीचे होते. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी शरद पवारांना पुन्हा महाराष्ट्रात पाठविले. पवार जरी महाराष्ट्रात आले तरी त्यांचे चित्त मात्र दिल्लीतच होते. १९९६ मध्ये तेवढ्यासाठी पवारांनी लोकसभा लढवली. बारामतीचे खासदार म्हणून ते दिल्लीत गेले. मात्र त्यांच्या नशिबाने काँग्रेसकडे पंतप्रधान पद आलेच नाही. त्यांना बाहेरूनच पाठिंबा द्यावा लागला. काँग्रेसच्या पाठिंब्यावर देवेगौडा आणि गुजराल  हे दोघेही पंतप्रधान बनलेपण काँग्रेसचे पक्ष नेते असूनही पवारांना पंतप्रधान बनता आले नाही.
राजीव गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सोनिया गांधी या राजकारणापासून दूर होत्या .मात्र १९९८ ला त्या सक्रिय झाल्या. त्यामुळे आता आपल्याला पंतप्रधानपद काँग्रेसमध्ये राहून मिळणार नाहीहे पवारांनी ताडलेआणि १९९९ च्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस सोडून ते बाहेर निघाले. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रतिष्ठित करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र ते त्यांना कधीच साधले नाही. नंतर त्यांनी काँग्रेसशी पुन्हा हात मिळवणी केली आणि महाराष्ट्रात सत्तेत वाटा मिळवला. त्याच्याच जोरावर २००४ मध्ये केंद्रात सत्तेतही वाटा मिळाला. ते स्वतः केंद्रीय कृषिमंत्री बनले. अटल बिहारी वाजपेयींशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र आपत्ती व्यवस्थापन परिषदेच्या अध्यक्षपदाखेरीस त्यांना काहीच मिळाले नाही. शेवटी ते पुन्हा काँग्रेसच्या गोठ्यात आले आणि तिथल्याच दावणीला स्वतःला बांधून घेतले.
२००४ ते २०१४ या दहा वर्षात काँग्रेस देशात सत्तेवर होती. मात्र ती स्वबळावर नव्हती. त्यांनी देखील संयुक्त पुरोगामी आघाडी गठीत करूनच सत्ता मिळवली होती. यातही पवार सक्रिय होते. इथेही आपल्याला एखादवेळी पंतप्रधानपद मिळून गेलेच तर हरकत नाहीम्हणून त्यांचे दंड बैठका मारणे सुरूच होते. तरीही त्यांची ही इच्छा अतृप्तच राहिली.
पंतप्रधानपद नाही मिळततर किमान राष्ट्रपतीपद तरी मिळावे अशी त्यांची मनोमन इच्छा असावी. त्यामुळे २००२ ते अगदी काल-परवापर्यंत त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून तरी आपला राष्ट्रपतीपदासाठी नंबर लागावा असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तिथेही त्यांना नशिबाने हुलकावणीच दिली .त्यामुळे जसे कोणाच्यातरी पाठीत खंजीर खुपसून का होईना पण वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्रीपद मिळवलेतसेच उशिरा का होईना पण वयाच्या ८३ व्या वर्षी तरी आपल्याला अल्पकाळ का होईना पण पंतप्रधानपदनाहीच जमले तर गेला बाजार राष्ट्रपतीपदकिंवा उपराष्ट्रपती पद तरी मिळावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा देखील अतृप्तच राहिली आहे. आणि आजच्या परिस्थितीत जर काही चमत्कार झाला तरच ती इच्छा पूर्ण होईल नाहीतर ती अतृप्तच राहणार आहे.
अशा स्थितीत नाही आपले जमले तर किमान मुलीला तरी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवावेकिंवा मग तिला केंद्रात तरी चांगल्या मंत्रीपदावर बसवावे अशी त्यांची इच्छा होती. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेहे बघून विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाला महाराष्ट्रात थोड्या जागा कमी पडत आहेत हे लक्षात येताच त्यांनी लगेच न मागता भाजपाला पाठिंबा देऊन टाकला होता. त्यामागे देखील त्यांच्या या सुप्त इच्छा कारणीभूत होत्या. २०१९ मध्ये एका बाजूला त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर केलेआणि स्वतःच्या पक्षाला सत्ता मिळवून दिलीत्यावेळी देखील जर भाजपने त्यांच्या अटी मान्य केल्या असत्या आणि २०२२ मध्ये त्यांचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदासाठी विचार करण्याचे मान्य केले असतेतर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री बनू शकले नसतेआणि आज शरद पवार कदाचित भारताचे उपराष्ट्रपती म्हणून आपण बघितले असतेआणि सुप्रिया सुळे या केंद्रात एखाद्या खात्याच्या किमान राज्यमंत्री तरी झालेल्या दिसल्या असत्या.
हे देखील साधले नाही म्हणून पवारांनी पुन्हा एकदा विरोधकांची आघाडी बनवण्यासाठी दंड थोपटले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग केला. तसाच केंद्रात इंडिया आघाडीचा प्रयोगही त्यांनी केला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनण्याची आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर अंकुश ठेवण्याची पवारांची इच्छा त्यांनी पूर्ण करून घेतली. स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कायम महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल ठेवण्याचा पवार प्रयत्न करत असतात. १९७८ पासून त्यांचा हा प्रयत्न सुरूच आहे. बरेचदा ते यशस्वी होतात. मात्र २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या उचापतींना बऱ्यापैकी पायबंद घातला आहे. तरीही जमेल तेव्हा जमेल तसे महाराष्ट्रातील सरकार आणि राजकारण अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच.
म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना जाहीररीत्या टोमणा दिला आहे. त्यावर पवारांनी मी महाराष्ट्रासाठी अस्वस्थ कसा होतो हे सांगून स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खरा. मात्र जनता आता सुज्ञ झाली आहे. पवारांनी कितीही सांगितलेतरी ते अतृप्त आहेत का आणि असल्यास कशासाठी अतृप्त आहेत हे महाराष्ट्रातील जनता चांगली जाणते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *