अलिबाग : मे महिन्यात तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात आरोग्य सेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविका असतील, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी व्यक्त केले.
वाढत्या तापमानामुळे मतदानावेळी ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. मतदारांना उष्माघात तसेच अन्य त्रास झाल्यास त्वरित प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी मतदान केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच मतदान दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी गावागावात मतदान केंद्र आहेत. मतदान मे महिन्यात घेण्यात येणार असल्याने या कालावधीत तापमान अधिक असणार आहे. यामुळे मतदानासाठी येणाऱ्या काही नागरिकांना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून आरोग्य विभागवार सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य सेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या आरोग्य पथकाकडे एखाद्या नागरिकाला उष्म्याचा त्रास झाल्यास त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य उपलब्ध असणार आहे. तसेच मतदान दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी दिली.
