१० वर्षात बरणेंना जे जमले नाही ते करून दाखविणार-संजोग वाघेरे-पाटील
राज भंडारी
पनवेल : ३३ मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे – पाटील निवडणूक लढवीत आहेत. मावळ लोकसभेसाठी एकूण ३३ उमेदवार रिंगणात असून यामध्ये संजोग वाघेरे नावाचे २ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. असे असले तरी प्रामुख्याने ही लढत दोन्ही शिवसेनेत रंगत आहे. एका बाजूला शिंदे गटाच्या शिवसेनेचा धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हे चिन्ह आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पनवेल येथे मंगळवारी महाविकास आघडीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पत्रकार परिषदेला शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदींसह अन्य मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ३३ मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी विरोधातील उमेदवाराचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, १० वर्षात त्यांना जे जमलं नाही ते आम्ही करून दाखविणार, आम्ही समाजासाठी काहीतरी करु पाहतोय, आणि त्यासाठी परिवर्तनाची गरज आपल्या मतदार राजाच्या हातात आहे. यावेळी पुढे बोलताना त्यांनी आपले व्हिजन देखील समोर आणताना सांगितले की, मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये पनवेल, उरण आणि कर्जत – खालापूर हे तीन विधानसभा क्षेत्र येतात. आणि महत्वाची बाब म्हणजे हे तीनही मतदार संघ हे निसर्गरम्य आहेत. मात्र दुर्दैव हेच आहे की, सत्ता भोगणाऱ्यांना येथे पर्यटनाचा विकास करण्यावर लक्ष देता आले नाही. येथील पर्यटन वाढविण्यासाठी अनेक धबधबे, तलाव आहेत. यातून होणाऱ्या पर्यटन वाढीमुळे येथील स्थानिक रोजगार देखील वाढणार आहेत. मात्र त्यांनी काही केलं नसलं तरीही आम्ही संकल्प केला आहे, या तीनही मतदार संघातील निसर्गरम्य वातावरणाला पर्यटनवाढीसाठी कसा प्रयत्न करता येईल.
यावेळी श्रीरंग बारणे यांचा खरपूस समाचार घेताना देखील त्यांनी सांगितले की, आम्ही गावोगावी, वाडी वस्त्यांवर जनतेच्या गाठीभेटी घेत असताना प्रामुख्याने समोर आली ती बाब म्हणजे गद्दारांनी केलेली गद्दारी. ही गद्दारी जनतेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे ही चिडलेली जनताच आता या गद्दारांना धडा शिकविणार आहे. सध्या जनतेला बदल हवा आहे, आणि त्यासाठीच आमची सर्व मित्र पक्षांची महाविकास आघाडी झाली आहे. यावेळी वाघेरे पाटील यांनी बदल घडविण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने मशाल या चीन्हासमोर मतदान करावे, असे आवाहन देखील यावेळी केले.
