पैशाचे राजकारण देखील पडले मतदारांसमोर फिके; ठाकूर चिंताग्रस्त

राज भंडारी

पनवेल : ३३ मावळ लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यातच गेली १० वर्षे खासदार असलेल्या श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी केवळ कार्यक्रमांना हजेरी लावण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही. त्यातच मूळ शिवसेना पक्षाशी गद्दारी केल्याच्या भावनेतून मतदारांनी त्यांना आता डोक्यात ठेवले आहे. पनवेल आणि उरणमधील मतदारांनी आता ओळखीच्या उमेदवाराच्या निष्क्रियतेची पावतीच जणू या निवडणुकीत बारणे यांना देण्याचे ठरविले असल्याचे समोर आले आहे. यातच मागील निवडणुकांचा विचार करता महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवीत होते, मात्र आता महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे मतांच्या आकडेवारीमध्ये मोठा फरक पडत आहे. त्यामुळे पनवेलमध्ये गेली १५ वर्षे आमदारकी भोगलेल्या प्रशांत ठाकूर यांना लोकसभेच्या उमेदवाराला अधिक मते मिळवून देण्याची कसरत करावी लागत असली तरी या निवडणुकीत त्यांचा घाम निघाला असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.

नेहमीच राजकारण म्हणजे पैशाचे भांडवल असल्याचे बोलले जाते. सर्वत्र याचीच चर्चा रंगलेली असते. मात्र सध्या पनवेल आणि उरणमधील नागरिक स्थानिक आमदारांवर संतापले आहेत. आम्ही पैसे घेणार पण यांना अपटणार, अशी भावना नागरिक रस्त्यारस्त्यावर बोलताना दिसत आहेत. विकास कामांच्या बाबतीत अकार्यक्षम आमदार म्हणून यांची ख्याती झाली असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. हेतू पुरस्सर राजकारण करून एखाद्याला कशा पद्धतीने आडवा करायचा हाच धंदा गेली १५ वर्षे पनवेलमध्ये तर गेली ५ वर्षे उरणमध्ये सुरू आहे. अनेक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हे खेळ खेळण्यात आले आहेत. सत्तेचा दुरुपयोग करण्याचा एकही मार्ग या दोन्ही आमदारांनी सोडला नाही. तसेच गेली १० वर्षे खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांनीही जनतेच्या कोणत्याही समस्यांना हात घातला नाही. पर्यायाने याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना बसणार असल्याचे आता समोर आले आहे.

३३ मावळ लोकसभा मतदार संघात सध्या ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातच महत्वाची लढत ही शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात होणार आहे. या निवडणुकीत महायुतीमार्फत रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. संजोग वाघेरे पाटील यांची मते खाण्यासाठी तुतारी चिन्ह घेवून कांबळे आणि संजोग पाटील नावाचे सामर्थ्य घेवून उमेदवार रिंगणात उतरविले गेले आहेत. मात्र महायुती मार्फत कितीही आटापिटा केला गेला तरी पनवेल आणि उरणमध्ये हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील असे अनेक डाव भाजपतर्फे आखले गेले. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात बाळाराम पाटील हे निवडणूक लढले, त्यावेळीही असे रडीचा डाव खेळले गेले असल्याने आता जनता हुशार झाली आहे. त्यामुळे अशा रडीच्या डावांना आता खतपाणी घातले जाणार नाही, हे देखील महायुतीतील नेत्यांनी म्हणजेच पनवेल आणि उरणमधील भाजपने लक्षात घेतले पाहिजे.

श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक लागेल की नाही हे ६ विधानसभा मतदार संघातील मतदार ठरविणार आहेत. यातच पनवेल आणि चिंचवड येथील सर्वाधिक मतदार असल्यामुळे या मतदारांवर बारणे यांच्यासह पनवेलमधील मतदानावर प्रशांत ठाकूर यांचे नशीब अवलंबून राहणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जर चुकून पनवेलमध्ये खासदारकीसाठी थोडी बहुत अधिक मते मिळविली, तरी आमदारकीचा त्यांचा प्रयत्न म्हणजे काटे की टक्कर होणार आहे. कारण उमेदवार तगडा असो वा नसो, पण जनतेची गेल्या १५ वर्षातील निराशा त्यांना मोठा फटका देणार, एवढे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *