एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
बेळगाव : आम्ही कर्नाटकच्या अन्यायाविरोधात, मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढत असताना महाराष्ट्रातील नेते मात्र या ठिकाणी येऊन एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करतात म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावात येऊ नये असं आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केलं आहे.
गुरुवारी, 2 मे रोजी एकनाथ शिंदे हे खानापुरात भाजपच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. एकीकडे बेळगावचा सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना, महाराष्ट्राने सीमाभागातील 865 गावांवर दावा केला असताना दुसरीकडे याच भागात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत. 2 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र एकीकरण समिचीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचारासाठी खानापूरमध्ये जाणार आहेत. त्याला आता एकीकरण समितीने विरोध केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीमालढ्याची माहिती आहे. त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन तुरुंगवासदेखील भोगला आहे. सीमाभागातील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाची त्यांना संपूर्ण माहिती आहे. असे असताना शिंदे यांनी सीमाभागात समितीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समितीच्या नेत्यांनी केली आहे.
सीमाभागातील जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी कधीही आले नाहीत
सीमाभागातील जनतेचा अन्याय दूर करण्यासाठी, कन्नड सक्ती दूर करण्यासाठी किंवा जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री कधीही सीमाभागात आले नाहीत. जर फक्त राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्री सीमाभागात येणार असतील तर नाईलाजाने त्यांचा निषेध नोंदवावा लागेल असे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रिंगणात होते. त्यावेळीही भाजपचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी बेळगावात अनेक सभा घेतल्या होत्या. तसेच इतरही पक्षांच्या नेत्यांनी सभा घेतल्या होता. त्यावेळी फडणवीसांनी बेळगावात येऊ नये अशी विनंती एकीकरण समितीने केली होती.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्व ठिकाणी एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यावेळी फडणवीसांनी भाजपचा प्रचार केल्याने समितीच्या पाच जागांवर पराभव झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.