घाटकोपरच्या शिबिरात ५४३ रक्तदात्यांचे रक्तदान
मुंबई- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून घाटकोपर पूर्वेतील शिवराज क्रीडा मंडळ, पंतनगर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५४३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिवराज क्रीडा मंडळाचे यंदाचे रक्तदान शिबिराचे ३८ वे वर्ष आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबिर भरवून मंडळाच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते. दरवर्षी तरुण-तरुणींचा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, असे मंडळाचे अध्यक्ष सुरेश गोलतकर यांनी सांगितले.
पूर्वेतील टेक्निकल हायस्कूल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. शिबिरासाठी राजावाडी रुग्णालय, पल्लवी रक्तपेढी, समर्पण ब्लड बँक आणि शताब्दी ब्लड बँक गोवंडी यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराला मंडळाचे संस्थापक कैलास गोसावी, अध्यक्ष सुरेश गोलतकर, विभागप्रमुख सुरेश पाटील, शाखाप्रमुख संजय कदम, माजी शाखा प्रमुख विजय चपटे, माजी उप विभाग प्रमुख प्रकाश वाणी, समाजसेवक रमेश जाधव, काँग्रेसच्या मनीषा सूर्यवंशी, भाजप वार्ड अध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि चटई उपस्थितांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.