नवी मुंबई : बदलत्या काळात आता निवृत्ती शब्दाचा अर्थही बदललेला असून आज निवृत्ती म्हणजे केवळ एका टप्प्यातून आपले दुस-या टप्प्यात स्थलांतर आहे. त्यामुळे जीवनाच्या या पुढच्या टप्प्यातही आपण कृतीशील राहून अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एप्रिल महिना अखेरीस नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त होणा-या 10 अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानीत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती समारंभाप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे व श्री. चंद्रकांत तायडे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आपले कष्ट व सचोटी ही मूल्ये महत्वाची असून आयुष्यातील सर्वात कृतीशील काळ आपण ज्या कार्यालयात व्यतित करतो त्याच्याशी आपलेले जुळलेले नाते जरी निवृत्तीमुळे संपुष्टात येणार असले तरी शहराविषयीच्या प्रेमातून आपण विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होऊन आपले सक्रिय योगदान देऊ शकतो असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. आपण आपल्या क्षेत्रात सतत अद्ययावत असले पाहिजे, विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, त्याचा फायदा व्यक्तीगत विकासाप्रमाणेच संस्थेला व सर्वांनाच होते असेही मत त्यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकात येथील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाचा मोठा वाटा असल्याचेही ते म्हणाले.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त होणारे अति. शहर अभियंता श्री. मनोज पाटील, लेखा अधिकारी श्री. हरिभाऊ खोसे, मुख्याध्यापक श्रीम. कल्पना गोसावी व श्रीम. जयश्री विधाटे, प्रशासकीय अधिकारी श्रीम. अंजली केणी, सहा. लेखा अधिकारी श्री. महेंद्रकुमार सोनावणे, आँक्झिलरी नर्स / मिडवाईफ श्रीम. पौर्णिमा परांजपे व श्रीम. गौरी केणी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीम. अनुसया खराडे, शिपाई श्री. विजय पाटील या अधिकारी, कर्मचारीवृंदाचा सन्मान करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनीही सेवानिवृत्तीप्रसंगी शुभेच्छा देताना कामाप्रती बांधिलकी जपत सेवाभावी वृत्तीने आपण करीत असलेल्या कामाची नोंद निश्चितच घेतली जाते असे सांगत सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांना त्यांचे देय्य असलेले लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशीच देण्याचे निर्देश आयुक्त महोदयांनी दिले असल्याची माहिती दिली व त्यादृष्टीने लगेच कार्यवाही सुरू झाली असल्याचे सांगितले.
शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी सेवानिवृत्त होणा-या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या स्वभावाची व कार्यशैलीची वैशिष्टयपूर्ण माहिती देत शुभेच्छा दिल्या. महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अति, शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे यांनीही याप्रसंगी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. अति.शहर अभियंता श्री.मनोज पाटील व लेखाधिकारी श्री.हरिभाऊ खोसे यांनी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच सेवानिवृ्त्त होणा-या कर्मचा-यांचे कुटुंबियही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *