रमेश औताडे
मुंबई : आज एक रुपया कोणी कुणाला सोडत नसल्याच्या कलियुगात एका रुग्णाची १२ हजार रुपयाची बॅग त्याला शोधून परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा कामगार दिनी सत्कार झाल्याने अजूनही माणुसकी जिवंत आहे असेच म्हणावे लागेल. १ मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनचे औचित्य साधून बंधुत्व फाऊंडेशनतर्फे वडाळा येथील मुंबई पोर्ट ॲथॉरिटीच्या हॉस्पीटलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान सागर जाधव यांचा फेटा व शाल घालून सत्कार करण्यात आला.
१५ एप्रिलला वडाळा येथील सर्जिकल ओपीडी जवळ एक बॅग मिळाली. त्यात १२ हजार रुपये व इतर सामान होते. तसेच १६ एप्रिलला गेट नंबर १ जवळ बॅग मिळाली. त्यात ७७० रुपये होते. या दोनही बॅगा त्याच्या मालकाला शोधून परत करणारे सागर जाधव यांच्या प्रामाणिक पणाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, सुरेश मुरुडकर, प्रदीप खोत, शरद पठाडे, महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे विजय कानवडे, अक्षय सुर्वे, करण सिंग गिरासे, सुप्रिया शिंदे व हॉस्पीटलचे कर्मचारी उपस्थित होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जेष्ठ कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी मोलाचे सहकार्य केले.
