मुंबई : लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेचे माजी क्रीडा शिक्षक, बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किसन सखाराम कदम यांचे १ मे रोजी सकाळी चेंबूर येथील कोळेकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे.
चेंबूर हायस्कूल या चेंबूर च्या पहिल्या शाळेत काम करत असताना भ. मा. पंत यांच्या तालमीत कदमसर तयार झाले. बास्केटबॉल, खोखो, ॲथलेटिक्स अश्या विविध खेळांच्या स्पर्धांत राज्य व राष्ट्रीयस्तरावर कदमसर सहभागी झाले होते. त्यांनी या विविध खेळात अनेक खेळाडू तयार केले. त्यानंतर पंत सरांबरोबर जवाहर विद्याभवन व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळा स्थापन करून गरीब मुलांना शिक्षण देण्यात सरांचा मोठा वाटा होता.
कदम सरांच्या १ खेळाडूला अर्जुन पुरस्कार, १४ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, २२ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत देखील भरघोस पदकांची कमाई केलेली आहे. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कदम सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.