मुंबई : कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री ११.३० वाजता महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांनी रुग्ण कक्षातील परिचारिकेला शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित अटक करावी आणि परिचारिकांच्या सुरक्षेसाठी रुग्ण कक्षात सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी करत जोरदार आंदोलन केले. परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला.

कुर्ला येथील भाभा रुग्णालयात महिला रुग्ण कक्षात रात्रपाळीला असलेल्या परिचारिका मोहिनी मातेरे यांनी रात्री रुग्णांना औषध देण्याच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी अल्पवयीन रुग्ण असलेल्या मुलीने तिच्या सोबतच्या मित्र व नातेवाईकांना बाहेर पाठविण्यास नकार दिला. मात्र रुग्णांना औषध देण्याबरोबरच कक्षाची सफाई करायची आहे, तसेच हा महिला कक्ष असल्याने रात्री उशिरा पुरुष थांबू शकत नसल्याचे त्यांनी रुग्ण व तिच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र ती रुग्ण ऐकण्यास तयार नव्हती. तिने मला रुग्णालयात राहायचे नाही असे सांगत रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) घेतली. त्यानंतर थोड्या वेळाने ती आपल्या काही नातेवाईकांसोबत पुन्हा रुग्णालयात आली आणि तिने मोहिनी मातेरे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. हा प्रकार मातेरे यांनी परिचारिका प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक यांना सांगितला आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी कामावर रुजू न होता आंदोलन केले. सबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना अटक करवी. तसेच प्रत्येक कक्षामध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी परिचारिकांकडून करण्यात आली.

दरम्यान या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद्मश्री आहिरे यांच्यासोबत परिचारिकांच्या झालेल्या बैठकीत सुरक्षा रक्षक प्रमुखांनी पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याचा मुद्दा निदर्शनास आणला. यावर आहिरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, असे आश्वासन परिचारिकांना दिले.

रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला मारहाण केल्यामुळे सर्व परिचारिकांनी आंदोलन केले. या घटनेमुळे परिचारिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित अटक करून परिचारिकांना संरक्षण देण्याची व्यवस्था करावी. – ॲड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *