सिद्धार्थ म्हात्रेचा अष्टपैलू खेळ
विशाल मोरेकर
ठाणे : सिद्धार्थ म्हात्रेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एसआरएस ग्रुपने महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीचा सहा फलंदाज राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रिमीयर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी वाटचाल केली. सिद्धार्थने ९ धावांत ४ बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना ११४ धावांवर रोखल्यावर नाबाद ५४ धावांची खेळी करत ११५ धावांसह संघाला विजयी केले.
प्रथम फलंदाजी करताना मनोज यादवने नाबाद ३२, ह्रितिक पाटीलने २२ आणि संकेत यशवंतेने १५ धावा करत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला मर्यादित धावसंख्येवर रोखताना सिद्धार्थसह साईराज पाटील आणि शशांक अत्तरडेने प्रत्येकी दोन, प्रथमेश डाकेने एक बळी मिळवला. उत्तरादाखल यंदा मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुशीर खानने अवघ्या १७ धावांत ३ बळी मिळवत महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीला अडचणीत आणले. संघ नाजूक स्थितीत असताना गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीत छाप पाडणाऱ्या सिद्धार्थने दोन छोट्या भागीदारी रचत संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. संघाची अवस्था ३ बाद १७ धावा अशी असताना सिद्धार्थने साईराज पाटीलला हाताशी घेत चौथ्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले, त्यानंतर सिद्धार्थने आकाशसह पाचव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. सिद्धार्थला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी : २० षटकांत ९ बाद ११४ ( मनोज यादव नाबाद ३२, ह्रितिक पाटील २२, संकेत यशवंते १५, सिद्धार्थ म्हात्रे ४-०-९-४ , साईराज पाटील ४-१४-२, शशांक अत्तरडे ४-१७-२, प्रथमेश डाके ४-२८-१ ) पराभूत विरुद्ध एसआरएस ग्रुप : १६.४ षटकात ४बाद ११५ (सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ५४, आकाश पारकर नाबाद २३,साईराज पाटील २१, मुशीर खान ४-१७-३) सामनावीर : सिद्धार्थ म्हात्रे.
