लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये आता महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार घोषित झाले आहेत. त्यामुळे आता लढती कशा असतील ते स्पष्ट दिसते आहे. या सर्वच लढतींमधील सांगली लोकसभा क्षेत्रातील निवडणूक ही महाविकास आघाडीतील वादविवाद चव्हाट्यावर आणणारी ठरली आहे. सांगलीची जागा शिवसेनेने काँग्रेसकडून खेचून आणली असली तरी तेथे दिल,दोस्ती आणि दृष्मनीचा प्रयोग अजूनही सुरुच आहे.

सांगलीत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना, भाजप, आणि काँग्रेसचा बंडखोर अशी तिरंगी लढत होताना दिसते आहे. या लढतीत आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुरते उघडे पडले असल्याचे दिसून येते आहे. या संदर्भात आम्ही आमच्या १७ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित केलेल्या ‘उद्धवपंत आता दादागिरी थांबवा’ या शीर्षकाच्या संपादकीयाकडे वाचकांचे लक्ष वेधत आहोत. मुद्दा अधिक विस्ताराने सांगायचा तर भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर

ठेवण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी गठीत केली होती. या तिघांनी एकत्र येऊन २०१९ मध्ये महाराष्ट्रात सरकार बनवले. पुढे शिवसेनेतच फूट पडल्याने ते सरकार कोसळले, आणि त्यानंतर महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ झाले आहे. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि त्यांच्यातील ही एक गट महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाला आहे.
तरीही शिल्लक शिवसेना, शिल्लक राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनीही एकत्रित प्रयत्न करत भाजपला महाराष्ट्रातून तडीपार करण्याचा चंग  बांधला आणि प्रत्येक ठिकाणी एकास एक असा उमेदवार उभा करून लढायचा निर्णय घेतला. मात्र कोणती जागा कोणी लढायची यावर एकमत न झाल्याने मारामाऱ्या सुरू झाल्या. त्यातही उद्धव ठाकरे गट हा दादागिरी करण्यात माहीर आहे. त्यांनी आपल्या सवयीनुसार जास्तीत जास्त जागा आपल्या झोळीत कशा पडतील याच दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांनी कोणाशीही म्हणजे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन सहकाऱ्यांशी सल्लामसलत न करता परस्पर सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी जाहीर करून दिला. अगदी शरद पवारांनीही याची परवा जाहीर कबुली दिली.

सांगली हा परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय राजारामबापू पाटील अशा दिग्गजांचे दीर्घकाळ वर्चस्व चालत राहिलेले आहे. आजही तिथे वसंतदादा पाटील घराण्यातील प्रतीक पाटील, विशाल पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत. तसेच राजारामबापूंच्या परिवारातील जयंत पाटील हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून ओळखले गेले आहेत. याच मतदारसंघातील आणखी एक वजनदार नाव म्हणजे पतंगराव कदम, आज त्यांचे चिरंजीव विश्वजीत कदम हे देखील जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वजनदार नाव म्हणून ओळखले जाते.
उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये येऊन काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा न करता सांगलीतून आपल्या पक्षाचे चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा करून  टाकली. त्यामुळे सहाजिकच काँग्रेस पक्षात आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. या दोन्ही पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना समजावण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र उद्धव ठाकरे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते नानाभाऊ पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात प्रवृत्ती मंडळींनी विश्वजीत कदम आणि इतरांची समजूत काढली. तरीही व्हायचं ते झालेच. वसंतदादा पाटील परिवारातील विशाल पाटील यांनी सरळ बंडाचा झेंडा उभारला. काँग्रेस मधले सर्वच त्यांच्या बाजूने उभे झाले आणि विशाल पाटील यांनी वाजत गाजत जाऊन अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणूनही अर्ज दाखल केला होता. मात्र काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्यामुळे तो रद्दबातल ठरला. उद्धव ठाकरे काँग्रेसवर दबाव टाकत होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना अर्ज मागे घेण्यासाठी आग्रह धरत होते. मात्र विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता ते मैदानात उतरले आहेत. आणि पूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता भाजपाचे संजयकाका पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होते आहे.

सांगलीमध्ये काल महाविकास आघाडीचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे दिग्गजही उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरेंचे सरळ सरळ वस्त्रहरणच केले. तुम्ही महाराष्ट्राचे वाघ असाल पण आम्ही सांगली जिल्ह्याचे वाघ आहोत, आणि आम्ही ठरवले तर काहीही करू शकतो असा इशाराच त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.
याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी सरळ उद्धव ठाकरेंना पुरते उघडे पाडले. चंद्रहार पाटील यांना सांगली मधून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित केल्याची बातमी आम्हाला टीव्हीच्या बातम्यातूनच कळली असे त्यांनी स्पष्ट सांगितले. आधी याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती हा खुलासाही त्यांनी केला.
कालच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनीही आपल्याला याबाबत काहीच माहित नव्हते असा खुलासा केला. इतकेच काय तर माझा काहीही संबंध नसताना इथे मलाच दोषी ठरवले जाते आहे असे दुःखही त्यांनी व्यक्त केले. म्हणजेच त्यांनीही शरद पवार जे काही सांगतात ते अधोरेखित केले.

कालच्या मेळाव्यात विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरेंना फटकारल्यावर ते बॅक फुटवर आले खरे. मला जर विश्वजीत कदम यांचा या मतदारसंघातील इंटरेस्ट कळला असता तर मी चंद्रहार पाटीलची उमेदवारी जाहीर केली नसती असा खुलासा त्यांनी करून टाकला. अर्थात संजय राऊत यांनी जर विश्वजीत कदम हे सांगलीचे वाघ असतील तर त्यांनी आपली ताकद लावून चंद्रहार पाटील ला विजयी करून दाखवावे असे आव्हान देऊन ते मोकळे झाले. मात्र आम्ही इतर मित्रपक्षांना विश्वासात न घेता परस्पर आमचा उमेदवार लावल्याने मित्रपक्षांचे स्थानिक नेते दुखावले आहेत याबद्दल त्यांना काहीही खंत खेद दिसत नव्हता…
विशाल पाटील यांच्या परिवाराचे जिल्ह्यातच तीन पिढ्यांपासून संबंध असल्यामुळे बहुतेक सर्वच पक्षाचे लोक त्यांच्या मदतीला धावले आहेत, आणि अशा स्थितीत उद्धव  ठाकरेंची शिवसेना सांगलीत पूर्णतः एकाकी झालेली आहे असे चित्र आज तरी दिसते आहे.
आज सांगलीत तरी शिवसेना एकाकी झालेली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आज तिथे शिवसेनेला नसलेल्या अस्तित्वासाठी कसाबसा संघर्ष करावा लागणार आहे. त्यातून काय साध्य होणार याचे उत्तर ४ जूनला मिळेलच. पण तोवर सांगतिलीत दिल, दोस्ती आणि दृष्मनीच्या अनेक कथा एकायला मिळतील इतके नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *