वडाळा ते सीएसएमटी गाड्यांची रांग

मुंबई : सीएसएमटी स्थानकात तीन दिवसांत दोनदा लोकल रुळांवरून खाली घसरण्याची घटना घडली. त्यानंतर मध्य रेल्वेने प्रशासनाने रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यानंतर खबरादारी म्हणून हार्बर मार्गावरील अपघातग्रस्त जागेवर १० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू केली.

त्यामुळे हार्बर मार्गावरून सीएसएमटी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल सेवा कासवगतीने ये-जा करत असल्याने लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लेटमार्क लागला.

उन्हाळ्यामुळे मुंबईकरांना लोकलच्या गर्दीचा प्रवास नकोसा वाटत आहे. त्यातच सलग दोन दिवस लोकल रुळावरून खाली घसरल्याने मुंबईकरांचे पुरते हाल झाले. पनवेल- सीएसएमटी लोकल सोमवारी (ता. २९) सीएसएमटी स्थानकात शिरताना प्लॅटफॉर्म क्रमाक दोनवर घसरली. या घटनेनंतर बुधवारी (ता. १) चाचणीदरम्यान त्याच ठिकाणी लोकलच्या एका डब्याची दोन चाके रुळावरून घसरली.

यामुळे हार्बर आणि मुख्य मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. लागोपाठ दोन घटना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (ता. २) मस्जिद बंदर ते सीएसएमटी स्थानकापर्यंत लोकलची वेगमर्यादा १० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळपासून लोकलचे वेळापत्रक पुरते विस्कळित झाले होते.

लोकलच्या रांगा

हार्बर मार्गावरील लोकलचा वेग गुरुवारी (ता. २) सकाळपासून मंदावला होता. त्यामुळे वडाळा ते सीएसएमटीदरम्यान लोकलची एकामागोमाग एक रांग लागली होती. रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनेकांनी कंटाळून टॅक्सी आणि रिक्षाने जाणे पसंत केले. वेगमर्यादेमुळे विस्कळित झालेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी अनेक लोकल रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *