कल्याण लोकसभेत अभिजीत बिचुकले यांची एंट्री
डोंबिवली : कल्याण मध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. यातच शुक्रवारी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथे शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत आहे.
त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो आहे असे बिचुकले यावेळी म्हटले आहे. यामुळे शिंदे व दरेकर यांच्यातील रंगतदार लढतीत बिचुकले आगीत तेल कसे टाकतात हे पहावे लागेल.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वादग्रस्त विधान करत नेहमीच चर्चेत राहिलेले बिचुकले आता कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कशी रंगत आणतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
त्यातच त्यांनी येथे चुरशीची लढत अगोदरच आहे. त्यात तेल ओतायला मी आलो आहे असे सांगितले. तसेच सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील 13 दिवस मी येथेच ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसिद्धीसाठी आपण निवडणूक लढता असे म्हटले जाते. यावर बिचुकले म्हणाले, 288 आमदारांपेक्षा मी नक्कीच प्रसिद्ध आहे. मला प्रसिद्धीची गरज नाही मी जन्मापासून प्रसिद्ध आहे. परडे 50 हजार, 1 लाख रुपयाचे काम सोडून जनतेसाठी मी लढतो तर जनतेला माझ्याबरोबर आले पाहिजे. माझ्याकडे काम आहे मी माझ्या स्टाईल मध्ये काम करतो.
कल्याणमध्ये विकास झालेला नाही…
अभिजीत बिचुकले म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला मात्र या अडीच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यापू्र्वी त्यांनी विकास केला असेल त्यात दुमत नाही. मागील अडीच वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली आहे.
कल्याण लोकसभेतून अर्ज भरला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना भूलथापा देत आहेत असं मला वाटतं. मी अधिकारवाणीने हे बोलतो आहे. लोकांची कामं होत नाहीयेत. संसदेला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या असं पत्र मी नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. नरेंद्र मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात.
मात्र बाबासाहेबांचं नाव संसदेला देण्यास यांचा नकार आहे का? हा माझा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अटल सेतू हे नाव देण्याआधीही मी त्या सेतूला माँसाहेब जिजाऊंचं द्या अशी मागणी केली होती मात्र ते नावही देण्यात आलं नाही असंही बिचुकलेंनी म्हटलं आहे.
अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं?
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार होतं. त्या समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? उदयनराजेंना तुम्ही तिकिट दिलंय. त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान असल्याचं वाटत नाही. याच सगळ्या कारणांसाठी मी आता कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात माझी उमेदवारी घोषित करतो आहे असं अभिजित बिचुकलेंनी म्हटलं आहे.