पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत
पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी ० साताऱ्यात उदयनराजे दिड लाखाच्या मताने पडणार ० बारामतीत सुप्रीया सुळे जिंकणार ० लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व संपणार
कराड – लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे राज्यातील अस्तित्व संपलेले असेल असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. शिंदे आणि पवार यांचा राजकीय पक्ष लोप पावेल, या पक्षांचं अस्तित्व दिसणार नाही किंवा यातील लोक इतर पक्षात जातील असा दावाही त्यांनी केला.
तसेच महाविकास आघाडीकडे राज्यात ४८ पैकी जास्तीत जास्त जागा येतील. हे निकाल अनपेक्षित असतील. महाराष्ट्रात मविआला चांगला प्रतिसाद आहे. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल असा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता मोदी नको, अशी सुप्त लाट राज्यात आहे. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने मोदी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात नसलेल्या गोष्टी बोलतायेत. १० वर्ष सत्तेत असलेले सरकार त्यांच्या कामगिरीचा आढावा देत नाही. भाजपाच्या जाहिरनाम्याबाबत मोदी बोलत नाही असा निशाणा पृथ्वीराज चव्हाणांनी साधला.
महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आणि संविधान बचाव या ५ मुद्द्यावरून आमचा प्रचार होता. उदयनराजे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकिटावर आम्ही निवडून दिले होते. पण २०१९ ला त्यांनी पक्ष बदलला. भाजपाची साथ धरली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं मिळून उदयनराजेंचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. आता आम्ही ३ पक्ष आहोत. त्यामुळे दीड लाखांच्या फरकाने उदयनराजेंचा पराभव नक्कीच होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेने तीन वेळा उदयनराजेंना निवडून दिले, त्यानंतर चौथ्यांदा पाडले. जनतेला त्यांच्या खासदारकीची कारकिर्द, लोकसभेत मांडलेली भूमिका, भाषणे याकडे लोकांचे लक्ष असते. कराड दक्षिण, पाटण, कराड उत्तर या भागात उदयनराजे कितीदा आले? लोकांच्या सुखदुखात ते गेले का? हा विचार सामान्य माणूस करतो. आम्ही गेलो तर भेट होईल का असा विचार लोकांच्या मनात असतो. त्यामुळेच उदयनराजेंचा ९० हजार मतांनी पराभव झाला. आता उदयनराजेंचा पराभव होईल त्याबाबत शंका नाही. फक्त किती फरकाने असेल हे पाहावे लागेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला.
बारामतीत एकतर्फी सुप्रिया सुळेंचा विजय होईल, भोर, पुरंदरच्या काँग्रेस आमदाराची महत्त्वाची भूमिका आहे. या मतदारसंघात संघर्ष आहे. घरातलं भांडण आहे. मात्र शरद पवारांबाबत कृतज्ञता भावना आहे, पवारांनी बारामतीला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं. शरद पवार नसते तर अजित पवार कुठे असते? हा प्रश्न लोक विचारतात, निवडणुकीत जी भाषा वापरली जातेय, जे काही घडले ते लोकांना आवडले नाही. मोदींनी शरद पवारांबाबत जे उद्गार काढले त्यावर लोकांचा संताप आहे असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.
