अशोक गायकवाड
रायगड : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास संघटना यांचे सहकार्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) राबविण्यात आला. मतदान हाच आपल्या ‘हातभर तक्रारींचा बोटभर उपाय’ आहे, असा संदेश याप्रसंगी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांच्या उपस्थितीत यावेळी मतदारांना देण्यात आला.*
याधेळी प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, नायब तहसिलदार अजित तोलकर आणि अलिबाग येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक अजय वनारसे, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी सहायक पी. कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. अलिबाग हे कोकणातील लोकप्रिय असे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी पर्यटक विरंगुळ्याचे क्षण घालवण्यासाठी दररोज दाखल होतात. विशेषतः शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी अलिबाग परिसर हा पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. या बाबी विचारात घेता पर्यटकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोमार्फत अलिबाग समुद्रकिनारा आणि अलिबाग बस स्टँड परिसर येथे शनिवार (४ मे) आणि रविवार (५ मे) असे दोन दिवस स्वीपसंदर्भात कार्यक्रम राबवण्यात आले. यामध्ये पथनाट्य सादरीकरण, सेल्फी स्टँड तसेच स्वीप प्रतिज्ञा यांच्यामार्फत मतदारांनी लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा उपयोग इतर कामांसाठी न करता आवर्जून मतदान करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच मतदान यादीत नाव शोधणे, मतदान यादीत नाव नोंदवणे, दुरुस्ती तसेच पत्ता बदल करण्यासाठीची प्रक्रिया, यांबाबत पर्यटकांना मार्गदर्शनही करण्यात आले. मतदान हाच आपल्या ‘हातभर तक्रारींचा बोटभर उपाय’ आहे, असा संदेश यावेळी मतदारांना देण्यात आला. याप्रसंगी रायगड येथील स्वयंमसिद्ध सामाजिक विकास संस्थेने सादर केलेल्या पथनाट्यांना पर्यटक आणि मतदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
