वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी प्रचारासाठी वाडा तालुक्यात काढलेल्या रॅलीने महायुतीचा झंझावात पाहावयास मिळाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचे वाडा शहरासह ग्रामीण भागात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर वडवली येथे मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या रॅलीने वाडा तालुक्यात `मोदीमय’ वातावरण निर्माण झाले आहे.
वाडा तालुक्याच्या सीमेवरील डाकिवली फाटा येथून कपिल पाटील यांच्या रॅलीला आज सकाळी उत्साहात सुरूवात झाली. महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. मोदी मोदी…चा गजर करीत कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या रॅलीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, भाजपाचे पदाधिकारी नंदकुमार पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जयेश शेलार, मनसेचे तालुकाध्यक्ष कांतीलाल ठाकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, कुणबी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी विजय जाधव, धनश्री चौधरी, अंकिता दुबेले, दीक्षा पाटील, नरेश आक्रे, संदिप पवार, योगेश पाटील आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
डाकिवली येथून वडवली येथे रॅली पोचल्यानंतर काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कपिल पाटील यांच्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कुडूस येथे रॅली पोचली. तेथे ग्रामस्थांनी विजयाच्या घोषणा देत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
वाडा तालुक्यातील चिंचघर येथील पुरातन श्री चिंतामणी मयुरेश्वर, पाली येथील गणपती मंदिर, वाडा शहरातील शिव मंदिर, हिंगलाज माता मंदिर, चेडोबा मंदिर,हनुमान मंदिराबरोबरच हातोबा देवस्थानचेही कपिल पाटील यांनी दर्शन घेतले. तत्पूर्वी वाडा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. पुष्पवृष्टीबरोबरच मोठा हार घालून कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. वाडा शहरातील मुख्य रस्त्यावर रॅलीने वातावरण मोदीमय झाले होते. त्यानंतर वाडा तालुक्याच्या दुर्गम भागातील ग्रामस्थांची भेट घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यानंतर तिळसा येथील श्री तिळसेश्वराचे दर्शन घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमुळे वाडा तालुक्याचे वातावरण महायुतीमय झाले होते.
