मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची निवडणूक केली प्रतिष्ठेची

अनिल ठाणेकर

ठाणे: लोकसभा मतदार संघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची निवडणूक प्रचार सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी टीप टॉप प्लाझा येथे पार पडली. या ठाणे लोकसभा मेळाव्यात नाईक समर्थक नवीमुंबई व मिरा-भाईंदरचे पदाधिकारी मात्र अनुपस्थित असल्याचे दिसून आले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचेही दिसून आले.

नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभेतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेला शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पण भाजप नेते गणेश नाईक समर्थक नवीमुंबई व मिराभाईंदर येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती मात्र या सभेत सर्वांना जाणवली. स्वतः गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, मिरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे या सभेला गैरहजर होते. त्यामुळे नवी मुंबई व मिराभाईंदर येथील भाजप नेते गणेश नाईक कुटुंबात व नाईक समर्थकांत नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे निर्माण झालेली नाराजी अद्याप दूर झाली नसल्याचेच चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे.

ठाणे लोकसभेची निवडणूकीमुळे नरेश म्हस्के यांच्याबद्दलच्या पक्षांतर्गत व महायुतीतील नाराजीची कल्पना आपल्याला असल्याची जाणीव, शिवसेना विभाग प्रमुख हेमंत पवार यांचे व भाजप आमदार संजय केळकर यांचे आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नाव घेऊन उल्लेख केला, याद्धारे दाखवून दिले.आणि नरेश म्हस्के हे बदलतील असेही स्पष्ट केले. नरेश म्हस्के हे खासदार झाल्यावर दिल्लीतील संसदेतील कामकाज पाहतील. ठाणे महापालिकेच्या कामात ते लक्ष देणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याला सभेत जोरदार प्रतिसाद मिळाला. यामुळेच खासदारकीच्या निवडणुकीत नरेश म्हस्के उमेदवार नसून मी स्वतः उमेदवार आहे असे समजून प्रचारला लागावे, काम न करणाऱ्यांची माझ्याशी गाठ आहे अशी तंबीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी स्वतः गलोगल्ली फिरत असल्याचे चित्रही दिसत आहे. नरेश म्हस्के यांची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केल्याचे यातुन दिसून येत आहे. या महायुतीच्या मेळाव्यात ठाण्याचे आमदार संजय केळकर, ओवळा माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे, भाईंदरच्या आमदार गीता जैन, माजी खासदार आनंद परांजपे,  शिवसेना नेते विजय नहाटा, विजय चौगुले, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसेचे नेते अभिजीत पानसे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *