महायुतीला ७ तर मविआला ४ जागा राखण्याचे आव्हान
या जागांसाठी होणार मतदान रायगड●बारामती●उस्मानाबाद ●लातूर ●सोलापूर ●माढा ●सांगली ●सातारा ●रत्नागिरी-सिंधुदुर्ग ●कोल्हापूर ●हातकणंगले
मुंबई : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मंगळवारी महाराष्ट्रातील ११ लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. या ११ जागांपैकी २०१९ साली ७ जागा भाजपाप्रणित महायुतीकडे तर ४ जागा महाराष्ट्र विकास आघाडीकडे होत्या या जागा टिकवण्याचे आव्हान उद्या या पक्षांकडे असेल. यात सुप्रीया सुळेंच्या बारामतीसह रत्नागिरी सिंधुदुर्गातील नारायण राणे यांच्या भवितव्याचाही फैसला होणार आहे. उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारासोबतच उन्हाचेही टेन्शन असणार आहे. उकाड्यामुळे मतदारांनी पहिल्या दोन टप्यात मतदानाकडे पाठ फिरवल्यामुळे कमी मतदान झाले होते.
पहिल्या दोन टप्प्यांत राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यातील रायगड, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले हे सात मतदारसंघ महायुतीकडे आहेत. तर बारामती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि सातारा हे मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. यापैकी बारामती, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग , माढा, रायगड या मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यातील प्रचार अधिक आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूर, सोलापूर, माढा, कराड, पुणे, धाराशिव, लातूर अशा सात ठिकाणी जाहीर सभा झाल्या. मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केल्याने महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. त्यावर ‘शेतकऱ्यांसाठी आत्मा अस्वस्थ असल्याचे’ प्रत्युत्तर पवारांनी दिले. शरद पवारांच्या विरोधात बारामतीत शड्डू ठोकून बसलेल्या अजित पवारांच्या समर्थकांनी तर सुनेत्रा पवारांच्या बॅनरवरून मोदींचे फोटो हटवून टाकलेयात मोदी यांनी प्रामुख्याने शरद पवार यांना लक्ष्य केल्याचे चित्र होते.
मोदी एका वेळी दोन-तीन मतदारसंघांच्या प्रचारात सभा घेतात. पण सोलापूर आणि माळशिरस अशा दोन लागोपाठ सभा त्यांनी एकाच जिल्ह्यात प्रथमच घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला नकली सेना म्हणून हिणवले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या टीकेचा भर हा प्रामुख्याने भाजप आणि मोदींवर होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही या टप्प्यात सभा घेतल्या. कोल्हापूरची लढत छत्रपती शाहू महाराज यांच्याविरोधात नसून ही लढाई राहुल गांधी विरुद्ध मोदी असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणात सभा घेतली. कोकणात राणेंच्या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक होते. पण उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते नाराज आहेत. त्याचा फटका राणेंना बसू शकतो.
सांगलीमध्ये काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे.
गुजरात आणि गोव्यातील सर्व जागांसह १२ राज्यांतील ९४ मतदारसंघात मंगळवारी मतदान होईल . सुरतमध्ये भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाल्यामुळे ९३ जागांवर मतदान होईल. कर्नाटकातील १४, उत्तर प्रदेशात १०, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमध्ये ७ तर प. बंगाल व आसाममधील प्रत्येकी ४ मतदारसंघांत मंगळवारी मतदान होईल. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संवेदनशील मतदारसंघांत अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडण्याबरोबरच उष्णतेच्या लाटेत अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान आहे.
