२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी अजमल कसाबच्या गोळीने झाला नव्हता, तर दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला होता, आणि हा अधिकारी आर. एस. एस.धार्जिणा होता असा आरोप काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच जेव्हा या प्रकरणात न्यायालयात खटला चालला तेव्हा तत्कालीन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ही माहिती न्यायालयापासून लपवली असा आरोप करीत निकम हे देशद्रोही असल्याचा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
ख्यातनाम विधीज्ञ एड. उज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून काँग्रेस पक्षातील सर्वच नेते निकम यांच्यावर तुटून पडत आहेत. मात्र वडेट्टीवार यांनी टीका करताना पातळी सोडून टीका केली आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते.
वडेट्टीवार फक्त इतक्यावरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुशरीफ यांच्या पुस्तकातील कथित मजकुराचा दाखला दिला आहे. त्यानंतर ज्यावेळी अजमल कसाब या सदर प्रकरणातील प्रमुख आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यावेळी निकम यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती असे सांगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी निकम यांच्यावर टीका करताना हे काम एखादा तालुका कोर्टातील सामान्य वकीलही करू शकला असता असे वक्तव्य केल्याचेही वडेट्टीवार यांनी नमूद केले आहे.
वडेट्टीवर यांच्या या वक्तव्यावर सहाजिकच राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उंटत आहेत. स्वतः उज्वल निकम यांनी आपण वडेट्टीवार यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने वडेट्टीवर यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर निदर्शने करून त्यांचा पुतळा ही जाळल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या या वक्तव्याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केल्याचे वृत्त आहे, इथे मुद्दा असा येतो की एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकातील दावा क्षणभर खरा मानला, तरी सदर प्रकरणाची राज्य सरकारने त्यावेळी निवृत्त मुख्य सचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेत समिती नेमून चौकशी केली होती. त्यावेळी हा मुद्दा समोर का आला नाही? ज्यावेळी हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले होते, त्यावेळी उज्वल निकम यांनी हे तथ्य न्यायालयापासून लपवले असा वडेट्टीवारांचा आरोप आहे. जर हे खरे मानले तर तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी निकम यांची ही चूक किंवा हेतू पुरस्सर केलेले चुकीचे विधान राज्य सरकारच्या लक्षात का आणून दिले नाही? आणि राज्य सरकारने त्यांना हा दावा बदलायला भाग का पाडले नाही? ज्यावेळी २६/११ ची घटना घडली त्यावेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. जर हेमंत करकरे यांच्यावर आर.एस.एस. शी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली होती असे मुश्रीफ यांचे म्हणणे असेल, तर ही बाब त्याचवेळी सरकारच्या का लक्षात आणून दिली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या राजवटीत आर. एस. एस. शी संबंधित व्यक्तींना वरिष्ठ आणि संवेदनशील पदांपासून दूर ठेवले जात होते. ही बाब लक्षात घेतली तर करकरेंसोबत जाणारा पोलीस अधिकारी आर. एस. एस. शी संबंधित होता हे सरकार स्तरावर कोणालाच माहीत नव्हते का? नंतर लक्षात आल्यावर तरी ही बाब लक्षात आणून देऊन त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही?
ज्यावेळी २६/११ ची घटना घडली, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेच होते. नंतर काहीच दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर कॉंग्रेसचेच अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. वडेट्टीवारांच्या मते जर उज्वल निकम यांची फारशी लायकी नव्हती, तर त्यांना या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्यात आले तेव्हा वडेट्टीवारांनी आक्षेप का घेतला नाही? शासकीय नोंदीनुसार वडेट्टीवार हे त्यावेळी देखील विधानसभेत आमदार होतेच. बहुदा ते राज्यमंत्री देखील असावेत. त्यावेळी जर त्यांनी निकम हे त्या लायकीचे वकील नाहीत ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली असती, तर सरकारने असा कथीत देशद्रोही वकील नेमला नसता. असेही असू शकेल की वडेट्टीवारांनी सांगितले असेलही तरी त्यांच्या स्वपक्षीय मुख्यमंत्र्यानेच त्यांच्या शब्दाला किंमत दिली नसेल, आणि म्हणूनच निकम यांना नेमले गेले असेल. हे जरी खरे मानले तरी निकाल आल्यावर तरी वडेट्टीवार काहीच का बोलले नाहीत? असे असंख्य प्रश्न आज महाराष्ट्रातील नव्हे देशातील प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात उपस्थित झालेले आहेत. आणखी एक मुद्दा असा आहे की ज्यावेळी एस. एम. मुश्रीफ यांचे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यात करकरे यांच्यावर गोळी आर.एस.एस. शी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती असे संदर्भ देण्यात आल्याचे लक्षात आले, त्यावेळी शासन स्तरावर या प्रकरणाची फेर चौकशी झाली असणारच. त्यातही असे काही तथ्य सापडले नाही का ?
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे फक्त देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरले होते. या पूर्ण घटनाक्रमामागे पाकिस्तानचा हात आहे असा आरोप होत होता. त्यावेळी पाकिस्तान मात्र कानावर हात ठेवत होता, आणि अजमल कसाब हा दोषी नाहीच हा दावा करत होता. मात्र ज्यावेळी न्यायालयात खटला चालला त्यावेळी अजमल कसाबने आपणच या अधिकाऱ्यांवर गोळी झाडली होती असा कबुली जबाबही दिल्याची माहिती आहे. तरी देखील पाकिस्तान अजमल कसाब निर्दोष आहे हाच दावा करत होता. आज उज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवायला उभे झाले म्हणून त्यांच्यावर टीका करताना अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर करणे हे कुठेतरी पाकिस्तान सरकार करत असलेल्या दाव्याला पुष्टी देण्यासारखे नाही काय आणि मग पाकिस्तानी दाव्याला पुष्टी देणारे विधान करणे हा देशद्रोह ठरणार नाही का याचा विचार विजय वडेट्टीवारांनी केला आहे काय याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे. देशाची सत्ता मिळवण्यासाठी राजाकीय पक्ष समोरासमोर नेहमीच उभे ठाकतात. त्यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केले जातात. मात्र असे आरोप प्रत्यारोप करताना राष्ट्रहिताचे भान देखील पाळले जायला हवे. भलेही राजकारणात आम्ही परस्परांचे प्रतिस्पर्धी असो पण सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत हे भान ठेवले जायला हवे. येथे एक आठवण द्यावीशी वाटते. १९७१ साली बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारताने पाकिस्तानशी युद्ध छेडले होते. ज्यावेळी ही घोषणा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत केली, त्यावेळी लोकसभेतील प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी आता आम्हाला पक्षभेद विसरायला हवेत, आता या देशात एकच पक्ष आहे आणि आमच्या पक्षाच्या एकमेव नेत्या इंदिरा गांधी आहेत, असे जाहीर करून विरोधी पक्षांतर्फे सरकारला एकमुखी पाठिंबा जाहीर केला होता. हे स्पिरिट, ही राष्ट्र प्रेमाची भावना आज आमचे विरोधी पक्ष विसरले आहेत की काय अशी शंका सामान्य माणसाच्या मनात निर्माण होते आहे.
वडेट्टीवारांच्या या कथित विधाना संदर्भात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सदस्यांनी करायची ती टीका केलेलीच आहे. मात्र या देशातील सुजाण सामान्य नागरिकही कुठेतरी दुखावला आहे. आता राजकीय पक्ष यासंदर्भात काय करायची ती कारवाई करतील. वडेट्टीवारांवर कारवाई व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे. यात निवडणूक आयोगातील अधिकारी आपल्या सत् सत् विवेक बुद्धीला स्मरून करायची ते कारवाई करतीलही. मात्र देशातील सामान्य नागरिक कुठेतरी दुखावून सांगतो आहे..‘विजयभाऊ हे वागणं बरं नव्हं’

विजय वडेट्टीवारांनी याचा विचार करावा इतकेच आम्हाला सुचवावेसे वाटते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *