जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टिका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी एवढे लक्षात ठेवावे की त्यांचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर यांचे 15 आमदार तरी निवडून आले असते का? असा सवाल राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. पावसात भिजल्याने किंवा रडल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत असा टोलाही त्यांनी शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांना लगावला.

उद्धव ठाकरे ज्यावेळी आमच्या सोबत होते त्यावेळी ते नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावं का? आमच्या भरवशावरच तुमच्या 18 जागा निवडून आल्या. आम्ही नसतो तर 15 आमदार तरी उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आले असते का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं असेही महाजन म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणं उचित होणार नाही. मात्र रोहित पवार हे थोडं काही झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाहीत. तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकणार नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी मुद्द्यावर बोलावं, विकासावर बोला कामावर बोलावं आणि त्यावर मत मागावी.

गिरीश महाजन म्हणाले की, “संजय राऊत यांच्या जिभेला कुठलेही हाड नाही. कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही असं संजय राऊत बोलतात. संजय राऊत यांच्या बोलण्याला आता मी महत्त्व देत नाही. जनता ही संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *