भारताचे लष्करी समर्थ सामर्थ्य हे जसे वाढते आहे, तसेच आंतरराष्ट्रीय जगतात देखील भारताची पत वाढते आहे. १९४७ पासून काश्मीरचा काही भूभाग पाकिस्तानने बळकावून ठेवलेला आहे. आज भारत तो परत घेऊ शकतो. मात्र तसे करण्याची गरज पडणार नाही. कारण या पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकच भारतात येण्यास इच्छुक असल्यामुळे तो परिसर भारतात आणता येईल, अशा आशयाचे निधन विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. याच्या या विधानाच्या उत्तरात काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाही असे विधान केल्याचे वृत्त आहे. फारूक अब्दुल्लांनी असे विधान केले असेल तर हे प्रकरण गंभीरच म्हणायला हवे. अर्थात काश्मीरमधील एक गट सुरुवातीपासून पाकधार्जीणा राहिला आहे. त्यामुळेच फारूक अब्दुल्लांनी असे विधान केले आहे हे उघड आहे.
आपल्या देशातील काश्मीरचा भूभाग हा कायम वादग्रस्त राहिला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरने भारतात सहभागी व्हावे किंवा नाही यावर वाद सुरू होता. त्यावेळी काश्मीर मध्ये राजा हरि सिंह हे सत्तेत होते. त्याच दरम्यान पाकिस्तानने राजा हरिसिंह यांच्या काश्मीर संस्थानवर हल्ला केला. त्यातील काही भूभाग त्यांनी बळकावला. त्यावेळी काश्मीरने भारतात सहभागी होण्याच्या अटीवर तत्कालीन भारत सरकारने काश्मीरला लष्करी मदत दिली, आणि पाकिस्तानचे सैन्य परतवून लावले, अशा आशयाची इतिहासात नोंद आहे. मात्र त्यावेळी जो भूभाग पाकिस्तानने बळकावला तो परत घेण्याचे कोणतेही प्रयत्न तत्कालीन काँग्रेस सरकारने केले नाहीत. इतकेच काय तर संयुक्त राष्ट्र संघात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनल्याचाही आरोप केला जातो.
तेव्हापासून हा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. कागदोपत्री हा भूभाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. त्याचवेळी उर्वरित काश्मीर हा देखील पाकिस्तानचा भूभाग आहे असा दावा आजही पाकिस्तान सरकार करते. इतकेच काय पण काश्मीरमधील काही पाक धार्जिणे मुस्लिम नेते देखील असाच दावा अनेकदा करतात.
अशाच विविध कारणांमुळे जरी काश्मीर भारतात सहभागी झाला तरी तत्कालीन मुस्लिम नेत्यांच्या मागणीनुसार पंडित नेहरूंनी घटनेच्या ३७० कलमान्वये काश्मीरला विशेष दर्जा देऊ केला होता. या दर्जा नुसार काश्मीरला त्यांचा स्वतंत्र ध्वज आणि स्वतंत्र घटना ठेवण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे काश्मीरमध्ये देशातील इतर कोणत्याही भागातील नागरिकांना कोणतीही मालमत्ता खरेदी करता येत नव्हती. काश्मीर मधल्या मुस्लिम शासकांनी मधल्या काळात तिथे कित्येक पिढ्यांपासून मुक्कामी असलेल्या काश्मिरी ब्राह्मणांना काश्मीर मधून हुसकावून लावले होते, आणि हे काश्मिरी ब्राह्मण देशभरात अक्षरशः निर्वासितासारखे राहत होते.
ज्यावेळी पंडित नेहरूंनी काश्मीरला विशेष दर्जा दिला, त्या वेळेपासून तत्कालीन जनसंघ म्हणजेच आजच्या भारतीय जनता पक्षाने असा विशेष दर्जा देण्याला विरोधच केला होता. काश्मीरमध्ये कित्येक वर्ष भारतीयांचा अभिमान असलेला तिरंगा फडकवू दिला जात नव्हता. त्यामुळे १९९२ मध्ये तत्कालीन भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी शेकडो समर्थकांसह तिथे जाऊन श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला होता. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक जाहीरनाम्यात काश्मीरचा ३७० कलमान्वये असलेला विशेषाधिकार काढून घेतला जाईल असे आश्वासन दिले जात होते.
भारतीय जनता पक्षाने आपला शब्द पाळला. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी कलम ३७० रद्दबातल ठरवणारा प्रस्ताव पारित केला आणि काश्मीर मधील विशेष अधिकार संपवण्यात आले. तेव्हापासून जम्मू आणि काश्मीर हे दोन्ही भारताच्या इतर राज्यांपैकी सारखेच राज्य म्हणून ओळखले जात आहेत. आता पाच वर्षात तिथे हळूहळू शांतता प्रस्थापित केली जात आहे. लवकरच काश्मीरमध्ये नियमित निवडणुका घेऊन लोकशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू करण्याचे ही केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या सर्व प्रकारामुळे भाजप विरोधकांना कायम पोटशुळ उठत असतो. अजूनही काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही काश्मीरला कलम ३७० अन्वये देण्यात आलेले विशेषाधिकार परत बहाल करू असे आश्वासन काँग्रेस देत असते. त्याचबरोबर काश्मीर मधल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि तत्सम प्रादेशिक पक्षांना पाकिस्तानचे प्रेम उफाळून येत असते. तसेच पाकिस्तान प्रेम इथेही उफाळून आलेले दिसते आहे.
आज जो भूभाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो, तो भूभाग १९४७ मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीररित्या बाळकावलेला आहे. भारत तो कधीही परत घेऊ शकतो. सध्या पाकिस्तान हा आर्थिक दृष्ट्या पूर्णतः डबघाईला आलेला देश आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकच भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत असे बोलले जाते. जर पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानपासून तोडून मूळ भारताला जोडला गेला आणि तिथे भारतीय प्रशासन सक्रिय झाले तर तिथल्या नागरिकांना बरे दिवस येतील असे वाटते आहे. त्यामुळेच तिथले नागरिकच स्वतःहून भारतात जोडले जातील अशा आशयाचे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.
आज पाकव्याप्त काश्मीर परिसर हा तसाही भारतासाठी एक डोकेदुखीच ठरलेला आहे. या ठिकाणी दहशतवादी गटांचे अड्डे बनलेले आहेत. या गटांना पाकिस्तान सरकारचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे हा परिसर जर भारताला जोडला गेला तर इथले दहशतवादी अड्डे उध्वस्त करता येतील आणि त्यामुळे देशात ठिकठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी निर्माण करत असलेला उपद्रवही आटोक्यात आणता येऊ शकेल. त्यामुळे हा परिसर भारताला जोडला गेला आणि तिथे भारताची सत्ता लागू झाली तर ते देशाच्या हिताचे ठरणार आहे.
त्यामुळेच पाकधार्जिण्या फारूक अब्दुल्लांना पोटशूळ उठला आहे आणि त्यांना पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याची अचानक जाणीव झाली आहे. पाकिस्तान जवळही अण्वस्त्र आहेत याची त्यांनी राजनाथ सिंह यांना आठवण करून दिली आहे.
राजनाथ सिंह जेव्हा एखादे विधान करतात तेव्हा देशाच्या लष्करी सामर्थ्याबाबत त्यांच्या मनात असलेला विश्वास बोलत असतो. गत दहा वर्षात देशाने सर्वच आघाड्यांवर आपले सामर्थ्य वाढवले आहे. तरीही देशातील काही देशद्रोही मंडळींना आज पाकिस्तानचाच पुळका येतो आहे ही बाब चिंताजनक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. देश सर्वार्थाने एक सक्षम, स्वयंपूर्ण राष्ट्र म्हणून पुढे येतो आहे. सर्वच आघाड्यांवर देश स्वयंपूर्ण होतो आहे. अशावेळी देशातील काही घटकांनी अशा प्रकारे शत्रू राष्ट्राशी बाजू घेत आपल्या सैन्याला आणि लष्करी सामर्थ्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करावा हा प्रकार चीड आणणारा संताप जनकच म्हणावा लागेल. त्यामुळेच अशा देशद्रोही मानसिकतेचा फक्त निषेध करून चालणार नाही, तर अशी देशद्रोही मानसिकता आणि अशा मानसिकतेचे देशातील सूर्याजी पिसाळ शोधून त्यांना ठिकाणावर आणले पाहिजे, आणि ही सूर्याजी पिसाळांची मानसिकता संपविली पाहिजे. तरच हा देश जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल. अन्यथा देशातील राष्ट्रभक्त नागरिकांचे छुपे खच्चीकरण करण्यासाठी हे देशद्रोही सूर्याजी पिसाळ सक्रिय होत जातील, आणि देशाच्या अखंडता आणि एकात्मतेला तो मोठा धोका ठरेल, ही भीती लक्षात घ्यायला हवी.