बीड : सत्ता मिळाली तर कलम 370 पुन्हा स्थापित करणार, मोदी सरकारने आणलेला सीएए कायदा रद्द करणार, मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरुद्ध आणलेला कायदा रद्द करणार आणि किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारा निधी रद्द करणार, मोफत धान्य योजना रद्द करणार असे काँग्रेस आणि इंडीया आघाडीने जाहीर केले आहे. आम्ही देशातील 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत देणार आहोत, तर मोदी सरकारने लागू केलेल्या लोककल्याणाच्या साऱ्या योजना गुंडाळून केवळ मतपेढीवर खैरात करण्याचा डाव काँग्रेसने आखला आहे,असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. काँग्रेसचा हा मिशन कॅन्सल कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी सज्ज व्हा, अशी सादही त्यांनी देशातील जनतेस घातली.बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे झालेल्या प्रचंड विजय संकल्प सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि इंडीया आघाडीचे मनसुबेच जनतेसमोर उघड केले. सत्तेवर आल्यास गरीब, वंचित आणि मागासवर्गीयांचे आरक्षणही हिसकावून ते मुस्लिमांना बहाल करण्याचा काँग्रेस आघाडीचा डाव हाणून पाडा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा. डॉ . प्रीतम मुंडे, आ. प्रकाश सोळंके ,आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा आदी यावेळी उपस्थित होते.

तिसऱ्या टप्प्यात इंडीया आघाडीचा उरलासुरला दिवादेखील विझला आहे. विकसित भारताचा आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी भावपूर्ण सादही त्यांनी घातली. आपणच माझा वारसा आहात, आपल्या भावी पिढ्या हाच माझा वारसा आहे. तुमचा, तुमच्या मुलाबाळांचा भविष्यकाळ सुखकर व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. आपणच माझे कुटुंब आहात. माझा भारत हाच माझा परिवार आहे, इंडीया आघाडी सत्तेवर आली, तर आमच्या लोककल्याणाच्या चांगल्या योजना रद्द करण्याचा कार्यक्रम राबविणार आहे. जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोवर जगातील कोणतीही ताकद गरीबांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दिली.

यावेळी श्री. मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. मोदी सरकारने लागू केलेल्या सर्व कल्याणकारी योजना रद्द करण्याचा काँग्रेस आघाडीचा इरादा असून अयोध्येतील राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णयही फिरवण्याचा त्यांचा डाव आहे. अलीकडेच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एका जुन्या काँग्रेस नेत्यानेच हा सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. राम मंदिरासंदर्भात न्यायालयाचा निर्णय आला तेव्हा एका खास बैठकीत राहुल गांधी यांनीच असे सांगितल्याचा खुलासा या नेत्याने केला आहे, असे श्री. मोदी यांनी सांगितले. यांच्या पित्याने शहाबानो खटल्याचा निर्णयही बदलला, त्याप्रमाणे राम मंदिराचा निर्णयही फिरविण्याचा यांचा इरादा आहे,असे ते म्हणाले.इंडीया आघाडीच्या अन्य एका नेत्याने राम मंदिराबाबत अपमानास्पद भाषा वापरली असून तुष्टीकरण आणि मतपेढीच्या मजबुतीसाठी हे लोक वारंवार प्रभू रामचंद्राचा आणि रामभक्तांचा अपमान करत आहेत, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

काँग्रेस व इंडीया आघाडीने आता तुष्टीकरणाचा नवा खेळ मांडला आहे. इंडीया आघाडीचे नेते आता व्होट जिहादचे आवाहन करत आहेत, 26-11 च्या दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे दाखले वाटत सुटले आहेत. कसाबसारख्या पाकिस्तानी अतिरेक्यांशी काँग्रेस कोणते नाते जपत आहे, असा सवालही मोदी यांनी केला. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांचे स्वागत पंतप्रधानांच्या निवासस्थानी होत होते. जेव्हा दिल्लीत बाटला हाऊसमध्ये आतंकवादी मारले गेले तेव्हा काँग्रेसची सर्वोच्च नेता असलेली महिला अश्रू ढाळत होती, याचा देशाला विसर पडलेला नाही. तेच दिवस देशात पुन्हा आणू पाहात असाल, तर मोदी छातीचा कोट बनवून त्याविरोधात उभा राहील, असा इशारा त्यांनी इंडीया आघाडीला उद्देशून दिला.

तुष्टीकरणासाठी विरोधक आणखी एक धोकादायक चाल खेळत आहेत,असे सांगून मोदी म्हणाले, गरीब, आदिवासी, वंचितांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे. धर्माच्या नावावर आरक्षण देण्यास डॉ. आंबेडकर व संपूर्ण संविधान सभेचा सक्त विरोध होता, पण आता इंडीया आघाडी आणि काँग्रेस आता दलित, आदिवासी, मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून धर्माच्या नावावर त्याचे वाटप करण्याचा इरादा आहे. आपल्यासमोर केवढे मोठे संकट उभे आहे याची जाणीव करून देण्याचे काम मी करत आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. तेथे रातोरात एक फतवा जारी करून ओबीसींचे 27 टक्के आरक्षण काढून संपूर्ण आरक्षण मुस्लिमांना वाटून टाकले. हाच डाव देशात राबविण्याचा इंडीया आघाडीचा इरादा आहे, असा आरोपही मोदी यांनी केला. ओबीसींच्या हक्काचे आरक्षणावर दरोडा घालून त्याचा मोठा हिस्सा मुस्लिमांना देण्याचा हा खेळ जनता सहन करणार का, असा सवाल त्यांनी केला. चारा घोटाळाप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या इंडीयाया आघाडीच्या एका नेत्याने स्वतःच आजच हा डाव उघड केला आहे, असेही मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *