ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावू पाहत आहेत. त्यात अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात ७९ उमेदवार हे प्रत्यक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामध्ये १३ रणरागिणी लोकसभेत जाण्यासाठी आपले नशीब अजमावणार आहेत. यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात एक, कल्याण दोन आणि भिवंडीतून नऊ असे डझनभर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात ७९ जण निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक उमेदवार हे २८ उमेदवार कल्याण मतदारसंघात असून त्या खालोखाल भिवंडी आणि ठाण्यात आहेत.
छोट्या-मोठ्या पक्षांच्या बरोबरीने ४५ अपक्ष उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. विशेष ७९ उमेदवारांमध्ये १३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ठाण्यात दोन, कल्याणमध्ये पाच आणि भिवंडीत सहा महिला उमेदवार आहेत. यामध्ये सात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत.
इतर सहा जणी या पक्षांच्या उमेदवार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ठाकरे गट, बसप, बहुजन महा पार्टी, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी या पक्षाच्या महिला उमेदवारांचा समावेश आहेत.
दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकमेव अर्ज मागे घेणारे संभाजी जाधव हे कल्याणच्या सुभेदारीसाठी सज्ज झाले आहेत. ते संयुक्त भारत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर कल्याण आणि भिवंडी अशा दोन मतदारसंघातून एकाच वेळी अपक्ष म्हणून चंद्रकांत मोटे हे उभे राहिले आहेत. याशिवाय अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले हे देखील कल्याणमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
या आहेत रणरागिणी
वैशाली दरेकर-राणे, सलिमा मुक्तार वसानी, अर्चना गायकवाड, पूनम बैसाणे, सुशीला कांबळे, अश्विनी केंद्रे, प्राजक्ता येलवे, मुमताज अन्सारी, कांचन वाखारे, मनीषा गोंधळे, रंजना त्रिभुवन, तारा वाघे, सोनाली गंगावणे.
मतदारांना गोंधळात टाकणारी नावे
जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघात भाजपचे खासदार कपिल पाटील, शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे अशी रंगतदार लढत होईल, असेच दिसत आहे. मात्र, या मतदारसंघात नेहमीप्रमाणे यंदाही एकच नाव आणि आडनाव असलेले उमेदवार आमनेसामने आले आहेत. यामध्ये कपिल मोरेश्वर पाटील आणि कपिल जयहिंद पाटील; तर सुरेश गोपीनाथ म्हात्रे आणि सुरेश सीताराम म्हात्रे अशा दोन जोड्या मतदारांना गोंधळात टाकणार आहेत.