७१वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला गटात  कर्नाळा क्रीडा (रायगड), प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, पुरुष गटात पारले स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे), जय भवानी तरुण मंडळ कर्ंजवडे (मुंबई उपनगर) या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला गटातील दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यात रायगडच्या कर्नाळा क्रीडा संघाने मुंबई शहरच्या अमर हिंद मंडळाचा ३६-२० असा १६ गुणांनी पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यन्तराला  कर्नाळा क्रीडा संघाकडे १५-१३ अशी २ गुणांची नाममात्र आघाडी होती. मध्यन्तरानंतर कर्नाळा क्रीडा संघाच्या तेजा सकपाळ , रश्मी पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली व सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. पराभूत संघाकडून श्रद्धा कदम हिने एकाकी लढत दिली. महिला गटातील दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने चिपळूणच्या स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा ५१-१३ असा ३६ गुणांनी धुव्वा उडवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यन्तराला प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या हर्षा शेट्टी व अंकिता पिसाळ यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवीत मध्यन्तराला २७-०६ अशी २१ गुणांची विजयी आघाडी घेतली. मध्यन्तरानंतर या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत सामना ३६ गुणांनी जिंकला. पराभूत संघाकडून चिन्मयी ढगळे ही एकाकी लढली. पुरुष  गटातील दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यात मुंबई उपनगरच्या पारले स्पोर्ट्स क्लब संघाने रायगडच्या टी आय पी ल क्लब पनवेल संघाचा ४३-१९ असा २७ गुणांनी पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ह्या सामन्यात मध्यन्तराला पारले स्पोर्ट्स क्लब संघाने १७-०९ अशी आश्वासक आघाडी घेतली ती आकाश गायकवाड व अभिषेक गिरी यांच्या सुंदर खेळामुळे. हि आघाडी कायम ठेवीत पारले स्पोर्ट्स क्लब संघाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष गटातील दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या शिव शंकर क्रीडा मंडळाने ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाचा अतिशय रोमहर्षक सामन्यात ३०-२५असा ५ गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ह्या सामन्यात दोन्ही संघाने सुरुवातीपासूनच अतिशय आक्रमक खेळ केला व मध्यन्तराला शिव शंकर क्रीडा मंडळाकडे १५-१३ अशी नाममात्र २ गुणांची आघाडी होती. मध्यन्तरानंतर दोन्ही संघानी आक्रमक खेळ करीत शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना सामना २१-२१ अशा समसमान गुणांवर सामना आणला. शिव शंकर क्रीडा मंडळाच्या नरेंद्र चाळकेने आपल्या तिसऱ्या चढाईत चार गुणांची कमाई करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.  होतकरू मित्र मंडळाच्या क्षितिज ठोंबरेने आपल्या संघाचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु तो आपल्या संघाचा पराभव टाळण्यास अपयशी ठरला. पुरुष  गटातील दुसऱ्या फेरीच्या अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या जय भवानी तरुण मंडळ कर्ंजवडे संघाने ठाण्याच्या जय हनुमान स्पोट्स क्लब काल्हेर संघाचा ३१-२८ असा ३ गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. दि. ६-०५-२०२४ दिवसाचा मानकरी : उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : क्षितिज ठोंबरे (शिव शंकर क्रीडा मंडळ, ठाणे), उत्कुष्ट पक्कड (पुरुष) : आदित्य गजमल (ओवळी क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर), उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला)  : हर्षा शेट्टी (प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन, पुणे), उत्कुष्ट पक्कड (महिला ) : रश्मी पाटील (कर्नाळा क्रीडा, रायगड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *