अनिल ठाणेकर

ठाणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रिपाइंच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा मनिषा करलाद  यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी विटावा येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनिषा करलाद यांनी विटावा, रेतीबंदर, माजीवडा आदी भागातील कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश केला. रामदास आठवले हे भाजप सोबत गेले आहेत. सध्या भाजपकडून संविधानविरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याविरोधात लढण्याची भूमिका घेण्याऐवजी आठवले भाजपला साथ देत असल्याने आपण संविधान रक्षणासाठी शरदचंद्र पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणार आहोत, असे करलाद यांनी सांगितले. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी करलाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान,  मनिषा करलाद आणि त्यांचे दिवंगत पती गणपत करलाद हे दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. नामांतर लढा, रिडल्स आदी आंदोलनात हे दाम्पत्य सक्रीय होते. गणपत करलाद यांच्या निधनानंतर मनिषा करलाद यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विटावा परिसरातील ताकद अधिकच वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *