अनिल ठाणेकर
ठाणे : शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास प्रसिध्द अभिनेते व नाम फाऊडेंशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ ते १२ मे दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांशी यानिमित्ताने संवाद होतो, त्यांच्या समस्या जाणून घेता येतात, यासाठी गेली १२ वर्षे मी या महोत्सवाला भेट देत असल्याचे मकरंद अनासपुरे म्हणाले. गेल्या ५ वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने शेतकर्यांना सुलतानी नाही तर अस्मानी संकटाचाही सामना करावा लागतो आहे, गेल्या २- ३ कोकणात आलेल्या मोठ्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला आहे, मात्र अशा अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाहीत, ते पुन्हा उभे रहातात, आणि जोमाने कामाला लागतात, त्यामुळे मला कोकणच्या शेतकऱ्यांचे कौतुक वाटते असे मकरंद अनासपुरे यांनी केले. संस्कार संस्थेचे अध्यक्ष व आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्याना शहरात बाजारपेठ मिळावी, यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली कित्येक वर्ष भरवत आहे, नाम फाऊडेंशनची सुरवात होती, तेव्हा मराठवाड्याच्या शेतकर्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत, अशी मागणी आमदार केळकर यांच्याकडे केली होती, त्यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातल्या शेतकर्यांचे १५ स्टॉल लावले होते, १० दिवसात २५ टन धान्यांची विक्री झाल्याची आठवण अनासपुरे यांनी सांगितली. शेतकर्यांना, भूमिपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी आमदार केळकर यांची धडपड सुरू असते, या महोत्सवात विक्रीसाठी येणारा आंबा हा नैसर्गिक, सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला दर्जेदार असतो. या महोत्सवाच्या माध्यमातून , इंडिया विरूध्द भारत यांच्यातील पुल सांधण्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहे, असे मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. मी स्वतः ग्रामीण भागातून शहरात आलो आहे, त्यामुळे मला माझ्या गावकडचे धान्य,नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले फळे मला शहरात मिळावीत, याचा शोध मी घेत असतो, त्यामुळे नैसर्गिक, सेंद्रिय पध्दतीने पिकवलेल्या या शेतमालासाठी एकत्रित असे व्यासपीठ, बाजारपेठ असावी, ती बाजारपेठ आमदार केळकर ठाणेकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.
कोकणातील राजापूर, चिपळूण मध्ये आलेल्या महापूराने खूप नुकसान झाले होते, त्यावेळी नाम फाऊडेंशनने केवळ मदतच पोहचवली नाही तर जगबुडी, वशिष्ठी,गोदवली यासारख्या नद्यातील गाळ नाम फाऊडेंशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या मार्गदर्शनखाली काढण्याचे खूप मोठे काम नाम फाऊडेंशनने केले, त्यामुळे आता तिथे परिस्थिती सुधारत असल्याचे अनासपुरे यांनी नमूद केले. सजग नागरिकांनी या महोत्सवाला भेट देवून शेतकर्यांच्या या चळवळीला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. या महोत्सवातील आंबा हा सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला आहे, या महोत्सवातील आंबा हा थेट शेतकऱ्यांच्या शेतातला,अढीतला आहे, त्यामुळे दर्जेदार आंबा आहे,
१२ मे पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला आवर्जून भेट देवून शेतकर्यांच्या चळवळीला पाठिंबा द्यावा. असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, सुनील लोखंडे उपस्थित होते.
