ओंकार, सिद्धेश चमकले
ठाणे : ओंकार करंदीकर,अश्विन माळीची गोलंदाजी आणि राहुल कश्यपच्या नाबाद खेळी मुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने रॉयल क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित ३७ व्या डॉ श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रॊयल क्रिकेट क्लबला ६१ धावांमध्ये गुंडाळल्यावर ८.२ षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या ६४ धावांसह विजय इंदप क्रिकेट क्लबने आगेकूच कायम राखली.
ओंकार करंदीकर, अश्विन माळी आणि स्वप्नील दळवीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रॉयल क्रिकेट क्लबला ६१ धावांवर रोखले. भावेश पवारच्या २६ धावांचा अपवाद वगळता रॉयलचे इतर फलंदाज छाप पाडू शकले नाहीत. ओंकार आणि अश्विनने प्रत्येकी तीन, स्वप्नील दळवीने दोन आणि प्रतीक जयस्वालने एक गडी बाद केला. त्यानंतर राहुल कश्यपच्या नाबाद ३२ धावांमुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने ८ गडी राखून पराभव केला. सिद्धेश भगतने १३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : रॉयल क्रिकेट क्लब : १५.४ षटकात सर्वबाद ६१(भावेश पवार २६, ओंकार करंदीकर ४-११-३, अश्विन माळी ४-१५-३ स्वप्नील दळवी ०.४- १-२) पराभूत विरुद्ध विजय इंदप क्रिकेट क्लब : ८.२ षटकात २ बाद ६४ ( राहुल कश्यप नाबाद ३२, सिद्धेश भगत १३, राहुल म्हात्रे २-२१-१, गणेश मोरे ३-१८-१).