उन्हामुळे मुंबईकरांचे त्रस्तीचे जीवन
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामध्ये मुंबईकर घराबाहेर पडायचं टाळत आहेत. अशा कडक उन्हातदेखील वाहतूक पोलिस, रिक्षा-टॅक्सी चालक, पोस्टमन आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात उन्हामुळे रिक्षा, टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचे रिक्षा, टॅक्सीचालकांनी सांगितले.
मुंबईतील दादर, सीएसएमटी, भायखळा, सायन, चेंबूर आदी ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. यंदा उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त होत आहेत. अशा परिस्थितीतदेखील वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिस चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत.
वाहतूक पोलिसांना उन्हामध्ये शहरातील चौकात उभे राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना काही काळ विसावा घ्यायचा झाल्यास त्यांना उड्डाणपूल किंवा जवळच्या झाडाखाली उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.
उन्हामुळे रिक्षाचालकांचे खूप हाल होत आहेत. रिक्षाचे छत तीव्र उन्हामुळे तापत आहे. अशात वाढत्या तामपानामुळे शहरातील ६० रिक्षा रस्त्यावर असून ४० टक्के रिक्षाचालक गावी गेले आहेत, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले.
सध्या प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. तापमान असह्य झाल्यामुळे झाडाखाली रिक्षा, टॅक्सी उभी करून चालक विसावा घेत आहेत. तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, वाद होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
