फेसबुक लाईव्ह करत केले बोगस मतदान

भाजपाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाऊन धमकावले

पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

अहमदाबाद : गुजरातमधील दाहोद लोकसभा मतदार संघात लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगत भाजपा नेत्याच्या मुलाने धुमाकूळ घातला. ईव्हीएम माझ्या बापाचे अशी दर्पोक्ति करीत फेसबुक लाईव्ह करून ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड करण्यापर्यंत त्याची मजल गेली. इतकेच नव्हे तर या लोकसभा मतदार संघातील तब्बल २५ मतदान केंद्रात घुसून मतदारांना दमदाटी करून भाजपाच्या कमळावर मतदान करण्यास भाग पाडले. मतदान यंत्रासोबत छेडछाड करण्याची आणि त्यातही फेसबुक लाईव्ह करण्याची हिम्मत भाजपाच्या मुलाच्या नेत्यात येतेच कशी असा सवाल विरोधकांनी केला आहे. दरम्यान काँग्रेसने याबाबत आयोगाकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी भाजापा नेत्याच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

महिसागरचे पोलीस अधीक्षक जयदिपसंह जडेजा यांनी याबाबत माहिती दिली. विजय भाभोर आणि मनोज मगन अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील विजय भाभोरचे वडिल रमेश भाभोर हे संतरामपूर येथील तालुक पंचायत समितीचे सभापती आहेत. दरम्यान, आरोपींवर आयपीसीच्या कलम 171 आणि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरुन काँग्रेसने संताप व्यक्त केला असून भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. येथील प्रशासन अधिकाऱ्यांसमोर आरोपी फेसबुक लाईव्ह करुन बोगस मतदान करत आहेत, ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचंही काँग्रसने तक्रारीत म्हटलं आहे.

आम्हाला केवळ 10 मिनिटे द्या, आम्ही इथेच बसून आहोत. ही ईव्हीएम मशिन माझ्या बापाची आहे, असे म्हणत आरोप भाभोर हा इतरही सहकाऱ्यांना कमळाचे बटण दाबण्याचा आग्रह करतो. या क्षेत्रात आपला दबदबा असल्याचे सांगत ईव्हीम मशिनसोबत नाचताना आरोपी भाभोर दिसून येतो. निवडणूक अधिकाऱ्यालाही दमदाटी करताना हा आरोपी लाईव्हमध्ये दिसून येत आहे.  दरम्यान, या २५ मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेणार का याबाबत मात्र अद्याप निवडणूक आयोगाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

भारताच्या इतिहासात असे कधी घडले नाही- आव्हाड

ठाणे: भारताच्या इतिहासाता असे कधी घडले नाही अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आपल्या व्टिटमध्ये ते म्हणतात,” स्वतंत्र भारताच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात निवडणूक आयोगाची प्रतिमा इतकी कधीच डागाळली नसेल. निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करताना मुख्य निवडणूक आयुक्त जेव्हा वारंवार समान संधीचा उल्लेख करत होते, तेव्हाच काहीतरी काळंबेरं असल्याचा अंदाज आलेला. हळूहळू प्रत्येक गोष्टीचा उलगडा होतोय. भाजपच्या राजवटीत गुजरातमधील दाहोड येथे ईव्हीएम हायजॅक करून मतदान करताना लाईव्ह स्ट्रीम करण्यापर्यंत भाजप उमेदवाराच्या मुलाची मजल जाते, ही अतिशय गंभीर बाब आहे. लोकशाहीत हे कदापी शक्य नाही आणि सहन केलं जाणार नाही. हुकूमशाही आम्ही येऊ देणार नाही. भाजप ‘चारशे पार’चा नारा कशाच्या बळावर देतंय माहित नाही, पण या असल्या लोकशाही विरोधी कृत्यातून ते आपला खरा आणि भेसूर चेहरा जगाला दाखवून देत आहेत,हे मात्र नक्की.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *