राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आता घर वापसीच्या मनस्थितीत आले आहेत असे चित्र आज दिसते आहे. फक्त आता ते एकटेच जातात की सोबत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही घेऊन जातात याचे उत्तर नजीकच्या भविष्यात दडलेले आहे.
झाले असे असे की काल एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी देशातील बहुतेक राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकीत केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यात शरद पवारच आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलीन करणार असा तर्क काढला जातो आहे.
अर्थात काँग्रेस पक्ष सोडून स्वतःचा नवा पक्ष काढून पुन्हा त्या नव्या पक्षाला काँग्रेसमध्येच विलीन करण्याची ही शरद पवारांची काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ,१९८७ मध्ये त्यांनी असे एक विलीनीकरण घडवून आणले होते. आता दुसऱ्या विलीनिकरणाची त्यांनी तयारी केलेली दिसते आहे.
काल जेव्हा पवारांची मुलाखत छापून आली तेव्हा त्यांनी इतर पक्षांबाबत म्हटले असू शकेल असा तर्क काढण्यात येत होता. मात्र आज त्यांनी मी अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस होणार असे म्हटलेले नाही असा खुलासा केल्याचे वृत्त आहे. शरद पवार जे सांगतात त्याच्या विपरीत ते वागतात असे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ दिवंगत नेते मनोहर जोशी नेहमी सांगायचे. तसा अनेकदा अनेकांना अनुभवही आला आहे. जोशी सरांचा हा निष्कर्ष लक्षात घेतला तर जेव्हा पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार नाही असे म्हणतात म्हणजेच विलीनीकरणाची त्यांची मानसिकता झालेली आहे असे म्हणता येऊ शकेल.
पवारांनी सर्वप्रथम काँग्रेस फोडून स्वतःचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष १९७८ मध्ये स्थापन केला होता. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री बनायचे होते. त्यानुसार त्यांना दीड वर्षाचे मुख्यमंत्रीपद उपभोगता आले. नंतर इंदिरा गांधींनी त्यांचे सरकार बरखास्त केले. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. नंतर दीर्घकाळ ते विरोधी पक्ष नेते होते. मात्र समाजवादी काँग्रेसमध्ये राहून आता मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी १९८७ मध्ये आपली समाजवादी काँग्रेस ही काँग्रेस पक्षात विलीन करून टाकली. वर्षाच्या आत पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, पुन्हा मुख्यमंत्री, मग आधी विधान परिषदेत आणि मग लोकसभेतील विरोधी पक्ष नेते असा प्रवास करताना पवारांना पंतप्रधान पदाचे स्वप्न पडू लागले होते. मात्र त्याचवेळी काँग्रेस पक्षातून सोनिया गांधींचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आले होते. सोनियाजी असेपर्यंत आपल्याला पंतप्रधानपद शक्य नाही हे लक्षात घेत पवारांनी त्या मूळ भारतीय वंशाच्या नाहीत असा मुद्दा पुढे करत त्यांच्या पंतप्रधानपदाला विरोध केला. त्यांच्या या विधानाला काँग्रेसमधून विरोध होऊ लागला. ही संधी साधून त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस फोडली आणि १९९९ च्या जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस गठीत केली.
१९९९ मध्ये सोनियाजी पंतप्रधान होत नाहीत हे लक्षात आल्यावर पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची महाराष्ट्रात युती घडवून आणली. खरे तर त्यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर उभा करण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यांचा तो प्रयत्न फसला. त्यांचे अस्तित्व महाराष्ट्रात आणि त्यातही महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यातच शिल्लक राहिले. म्हणून मग २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेत सोनियाजींच्या पंतप्रधानपदालाही साथ द्यायचे ठरवले. त्यांचे सुदैव म्हणून सोनियाजी पंतप्रधान झाल्या नाहीत, आणि पवारांना मात्र दहा वर्षे केंद्रात कृषी मंत्रीपद उपभोगता आले. त्याचबरोबर महाराष्ट्रातही त्यांना सत्ता उपभोगता आली.
२०१४ मध्ये केंद्रातीलही सत्ता गेली आणि महाराष्ट्रातही त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले. म्हणून २०१९ मध्ये भाजपशी शिवसेनेची असलेली युती तोडायला लावून त्यांनी महाराष्ट्रात सत्ता मिळवली. मात्र अडीच वर्षातच शिवसेना फुटली आणि पवारांची तसेच उद्धव ठाकरेंची ही सत्ता गेली. शिवसेना पक्ष पुरता खिळखिळा झाला होता. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फुटला. विशेष म्हणजे त्यांच्या घरातलाच एक सदस्य अजितदादा पवार हेच काकांविरुद्ध बंड करून उभे राहिले. अजित पवारांनी महायुतीशी हात मिळवणी करून सत्ता तर मिळवलीच, पण आपली सख्खी चुलत बहीण सुप्रिया सुळे यांनाही पराभूत करण्याची तयारी सुरू केली. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच सुप्रिया सुळे विरुद्ध निवडणुकीत उतरवले आहे.दोन्ही बाजूंनी झालेला प्रचार लक्षात घेता कोण निवडून येईल हे आज सांगणे कठीण आहे.
या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर पवारांच्या राजकारणाला तो फार मोठा धक्का बसणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळजवळ हातातून गेलेला दिसतो आहे. अजित पवार त्यांच्या ५४ पैकी ४० आमदार घेऊन वेगळे झाले आहेत. त्याच वेळी काही खासदारही त्यांनी सोबत नेले आहेत. अजूनही काही आमदार जाऊ शकतात. म्हणूनच आता निवडणुकीचा निकाल काय लागतो ते पाहून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकावा असा विचार पवार करू शकतात, नव्हे त्यांनी तो विचार सुरू केला असावा असे स्पष्ट चित्र दिसते आहे.
पवारांचा हा विचार कधीपासूनच सुरू आहे. मात्र त्यांनी टाकलेल्या अटीमुळे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकला नाही अशी माहिती काँग्रेस मधून शिवसेना शिंदे गटात आलेले संजय निरुपम यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार विलीनीकरणाला पवार कायम तयार असतात. मात्र त्या बदल्यात काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करू द्यावे अशी अट ते टाकतात आज महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज आहेत. ते सुप्रिया सुळे यांना नेतृत्व देवू देतील असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळेच हे विलीनीकरण रेंगाळले असावे असा निष्कर्ष काढता येतो. ४ जून रोजी लोकसभेचे निकाल काय लागतात हे बघूनच शरद पवार हा निर्णय घेऊ शकतात. आज त्यांनी महाराष्ट्रात काही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
त्यातून किती निवडून येतील ही आज शंकाच आहे. त्यातही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही काटे की टक्कर असल्याचे बोलले जाते आहे. आजवर पवारांना बारामतीत कधीच प्रचार करावा लागत नव्हता. यावेळी पहिल्यांदाच मुलीसाठी मतांचा जोगवा मागत त्यांना दारो दार फिरावे लागले आहे. विशेष म्हणजे राजकीय दृष्ट्या जो खमकेपणा अजित पवारांमध्ये आहे तो खमकेपणा सुप्रिया सुळेंमध्ये नाही आज शरद पवार थकत चालले आहेत. त्यामुळे भविष्यात सुप्रिया सुळे यांना राजकारणात स्थिर करायचे असेल तर काँग्रेसमध्ये त्यांना पाठवणे हेच सोयस्कर ठरणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो ते पाहून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात, नव्हे ती तयारीही झाली असावी असे म्हणता येते.
काहीही असो, पण निवडणुकीचा निकाल काय लागतो आणि नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय करतात याकडे आता फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर उभ्या देशाचे लक्ष लागून राहणार आहे हे नक्की.