गडचिरोली : छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 6 नक्षलवादी मारले गेले आहेत. नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर लिंगा आणि पापारावला यांना या जंगलात घेरल्याची माहिती आहे.
बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे.
पीडिया जंगलात असलेल्या अनेक बड्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती आहे. दोन्हीकडून अजूनही अधूनमधून चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांतील जवान हे नक्षलविरोधी अभियानात सहभागी आहे.
गांगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया भागातील जंगलात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या समितीमध्ये डीकेएसझेडसी, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरमधील बडे नक्षलवादीही आहेत.
माहितीनंतर शेजारच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांतील एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या 1200 जवानांनी संयुक्त कारवाई केली. जिथे शुक्रवारी सकाळी जंगलात झालेल्या भीषण चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले.
