तब्बल १० वर्ष ८ महिने आणि २१ दिवसांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून त्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर उर्वरित तीन आरोपी संशयाचा फायदा घेऊन आणि पुराव्याअभावी निर्दोष सुटले आहेत. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी आठच्या सुमारास पुण्यात मॉर्निंग वॉकला जात असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर या समाजसेवी व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोलकर यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण काम उभे केले होते. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्यच खर्ची घातले होते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अशा व्यक्तिमत्त्वाची भरदिवसा भर रस्त्यावर हत्या झाली होती. या हत्येने उभा देश हादरला होता.
डॉ. दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत होते. त्यामुळे हिंदू धर्मीयांमध्ये कार्यरत असलेल्या सनातन संस्थेचा त्यांना विरोध होता असे बोलले जात होते. त्यामुळे सनातन संस्थेनेच ही हत्या घडवून आणली असावी असा आरोप केला जात होता. २००५-०६ पासून आपल्या देशात काही कथित पुरोगामी राजकीय नेत्यांनी हिंदू दहशतवाद ही संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात होता अशी टीका त्यावेळी होत होती. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित हे या संकल्पनेचीच शिकार बनले होते असे बोलले जात होते. त्यामुळे दाभोळकरांची भर दिवसा झालेली हत्या ही देखील हिंदू दहशतवादाचाच प्रकार आहे असे निश्चित करूनच या प्रकरणाचा तपास केला गेला असा आरोप केला जातो.
दाभोलकरांची हत्या झाल्यावर सुरुवातीला हे प्रकरण पुणे पोलिसांकडे तपासासाठी होते. नंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम नेमून त्याकडे हा तपास सोपवला. तरीही यात काहीच हाती लागत नव्हते म्हणून न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआय कडे सोपवले होते, सीबीआयने या प्रकरणात तपास करून पाच आरोपीविरुद्ध २०१८ मध्ये खटला दाखल केला होता. त्याचा आज निकाल लागला आहे.
सदर प्रकरणात सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या दोन प्रमुख आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, एड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तीन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. फिर्यादी पक्षाच्या मतानुसार डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे या कटाचे मास्टर माईंड होते. मात्र यादृष्टीने कोणतेही पुरावे सरकार पक्षाला उपलब्ध करता आले नाहीत .त्यामुळेच या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
डॉक्टर दाभोलकरांची कन्या मुक्ता दाभोलकर आणि मुलगा हमीद दाभोलकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना दोन आरोपींना जन्मठेप झाली त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र या कटाच्या सूत्रधाराला शिक्षा झाली नाही आणि प्रमुख सूत्रधार कोणते समोर आले नाही याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याचवेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी मुक्ता आणि हमीद या दोघांनी कठीत मोठेपणा मिळवण्याच्या मागे लागून या प्रकाराचा तपास भरकटवला असा आरोप केला आहे. घटना झाल्यानंतर तास-दीड तासातच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा हिंदू दहशतवादाचा प्रकार असल्याचा दावा करत तपासाला वेगळीच दिशा दिली असाही सनातन संस्थेचा आरोप आहे.
या प्रकाराचा तपास नीट झाला नाही असा आरोप फक्त सनातन संस्थाच करते आहे असे नाही, तर इतरही. व्यक्ती आणि संस्थांकडून यासंदर्भात दबक्या आवाजात आरोप केला जातो आहे. डॉ. दाभोलकरांनी जी महाराष्ट्रस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली होती, त्या समितीत अनेक वाद होते. त्याचे पर्यावसान समितीची दोन शकले होण्यातही झाले होते. समितीच्या आर्थिक व्यवहारासंबंधीही काही तक्रारी होत्या. त्या मार्गाने कोणताही तपास झाला नाही असेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्या काळात डॉक्टर दाभोलकर आणि त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हिंदू समाजातील अंधश्रद्धांवरच आसूड ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सनातनी मंडळी त्यांच्यावर नाराज होती ,असे गृहीत धरून फक्त सनातन संस्था आणि कथित हिंदू दहशतवादी यांनाच टार्गेट केले गेले असाही आरोप केला जातो आहे.
या आरोपातील तथ्य अगदीच नाकारता येणार नाही. डॉ. दाभोलकर हे हिंदू दहशतवाद्यांचे टार्गेट होते, असे म्हणण्याचे कारण एकच की त्यांनी फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवरच टीका केली होती. असे असले तरी हिंदूधर्मीय हा एकूणच सहिष्णू म्हणून ओळखला जातो. अन्य धर्मीयांप्रमाणे सुडाची भावना ठेवून धर्मविरोधकांवर जीव घेणे हल्ले करणे हे हिंदू संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे सनातन संस्थेनेच हे घडवले असावे किंवा कधीच हिंदू दहशतवादच याच्यामागे असावा हा तर्कही एकांगी ठरू शकतो. त्यामुळे सर्वच अंगांनी या प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी होती, आणि त्यानुसार दोषींना शोधून खटला भरला जायला हवा होता. आता या प्रकरणात निर्दोष सुटलेल्यांविरुद्ध दाभोलकर बंधू भगिनी उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. त्याचबरोबर या दोघांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली ते देखील न्यायालयात जातीलच. त्यावेळी तरी वर नमूद केलेल्या मुद्द्यांवर विचार व्हावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
या निमित्ताने एका महत्त्वपूर्ण मुद्याकडे सर्वांचेच लक्ष वेधावेसे वाटते. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. लोकशाहीत प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे. आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशावेळी कोणी एखादी व्यक्ती किंवा संस्था किंवा जमात आपल्या विरोधात मते मांडते आहे म्हणून मुद्यांवरून गुद्यांवर येणे हे चुकीचेच ठरणार आहे. अशाप्रकारे जर काही टीका झाल्या आणि त्या चुकीच्या जरी असल्या तर त्यांना मुद्द्यानेच उत्तर द्यायला हवे. गुद्द्यावर येणे उचित नसते. मात्र गेल्या काही वर्षात भारतातील परिस्थिती बदललेली आहे. आज कोणत्याही छोट्या मोठ्या कारणांसाठी समाजात आणि राजकीय क्षेत्रातही लोक लगेचच मुद्द्यांवरून गुद्द्यावर येतात. सध्या राजकारणात तर सर्वांनीच पातळी सोडली आहे असे दिसून येते आहे. गेल्या काही वर्षात असे प्रकार वाढले आहेत. कुणीतरी एका अभियंत्याने समाज माध्यमांवर टीका केली म्हणून त्याला बंगल्यावर बोलावून मारहाण करणे किंवा दहा जणांच्या घोळक्याने त्याला रस्त्यात पकडून मारठोक करणे असे प्रकार राजकीय क्षेत्रात नियमित चालतात. समाजातही अनेकदा असे प्रकार घडलेले दिसतात. हे कितपत योग्य याचाही विचार व्हायला हवा. आज आम्ही २१व्या शतकात आहोत. समस्त जग विकसनशील म्हणून ओळखले जात आहे. भारत हा देखील विकसित प्रगत राष्ट्र म्हणून पुढे येतो आहे. आपली भारतीय संस्कृती ही सहिष्णुता शिकवणारी संस्कृती आहे. अशावेळी मुद्द्यांचा प्रतिवाद हा मुद्द्यांनीच करायला हवा, आणि त्यातून सामाजिक सौहार्द कसे जपले जाईल याचा विचार व्हायला हवा. मात्र तसे होताना दिसत नाही. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर याच मुद्द्यांवरून डॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी अशाही काही जणांच्या हत्या झाल्या. त्यांचाही तपास अजून चालूच आहे. याला सुसंस्कृत समाजाचे लक्षण म्हणायचे काय याचाही विचार व्हायला हवा.
या मुद्द्यावर आज समाजात विचारमंथन व्हायला हवे. समाजातील सर्वच सुजाण सुसंस्कृत सुज्ञ मंडळींनी एकत्र बसून विचारविनिमय करायला हवा. आणि भविष्यात वैचारिक मतभेद कितीही असले तरी ते चर्चेतून सोडवले जातील, मुद्द्यावरून गुद्द्यावर येणार नाहीत आणि त्यातून कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असे वातावरण निर्माण केले जावे. हीच आजची सर्वांची अपेक्षा आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात आज निर्णय जाहीर होत असताना नेमका हाच बोध सर्वांनी घ्यायला हवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *