अंबरनाथ, उल्हासनगर आणि दिव्यातील रॅलीला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा तुफान प्रतिसाद
डोंबिवली : कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात येत असतानाच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता प्रचार रॅली सुद्धा काढण्यात येत आहेत. अंबरनाथ, उल्हासनगर आणि दिवा शहरात काढण्यात आलेल्या महायुतीच्या रॅलीला महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबतच नागरिकांचाही तुफान असा प्रतिसाद मिळाला. यंदा महायुतीला विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असून हा प्रतिसाद, उत्साह अन जल्लोष पाहून ही प्रचाराची नव्हे, तर जणूकाही भविष्यातील मोठ्या विजयाची रॅली असल्याचे चित्र सगळीकडे निर्माण झाले आहे, असे यावेळी डॉ श्रीकांत शिंदे बोलताना म्हणाले.
कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून यंदा मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत केलेल्या विक्रमी कामांचे प्रगतीपुस्तक मतदारांसोमोर ठेवून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका, रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, कल्याण शीळ रोड, काटई ऐरोली फ्री वे, पत्री पूल, खारेगाव उड्डाणपूल, शिळफाटा उड्डाणपूल, मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपूल, मोठागाव माणकोली उड्डाणपूल, डोंबिवली एमआयडीसीतले रस्ते, उल्हासनगर येथे भुयारी गटार योजना, ग्रामीण भागात अमृत योजना, जलजीवन मिशन, कल्याण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक, अंबरनाथ येथे जिल्ह्यातील पहिले मेडिकल कॉलेज, शूटिंग रेंज, नाट्यगृह, १ लाख पुस्तकांचे ग्रंथालय, नेहरू गार्डन, यूपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, बेघर निवारा, संपूर्ण लोकसभेत सिमेंट काँक्रिटचे पक्के रस्ते, मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉली अशी कामे मार्गी लागली आहेत, असे यावेळी डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले.
तर मेट्रो १२, चिखलोली रेल्वे स्टेशन, पलावा उड्डाणपूल, कल्याण डोंबिवलीतील रिंग रोड, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत मार्ग, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, लोकग्राम पूल, अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास, खिडकाळी मंदिर परिसर विकास, हिंदी भाषी भवन, अंबरनाथमध्ये ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव, अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरांचा सामायिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, डोंबिवलीतील कॅन्सर हॉस्पिटल आणि सूतिकागृह असे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळाने कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात भरघोस निधी आला असून पुढील काळातही कल्याण लोकसभेच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील १० वर्षांचे हे सगळे प्रगतीपुस्तक खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी जनतेसमोर मांडले असून याच कामांमुळे जनतेतून त्यांना ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ असे संबोधले जाऊ लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याच कामांच्या जोरावर शिंदे यांची विक्रमी मताधिक्याने हॅटट्रिक होणारच असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून वैयक्तिक भेटीगाठी आणि रॅली अशा दोन्ही पद्धतीने प्रचार सुरू करण्यात आला आहे. कुणावरही टीका न करता आपण केलेली कामे जनतेसमोर मांडून शिंदेंकडून प्रचार सुरू असून ही पद्धत मतदारांनाही भावली आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत झालेल्या रॅलींना महायुतीचे कार्यकर्तेच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेकडूनही तुफान प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
