एका दिवसात दोन लाख प्रवाशांचा प्रवास
मुंबई : उन्हाळ्यात उकाड्यापासून बचावासाठी आता पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसी लोकलकडे वळविला आहे. सोमवारी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून तब्बल दोन लाख ४७ हजार २२३ प्रवाशांनी प्रवास केला. तर मध्य रेल्वे मार्गावर एक लाख ४० हजार प्रवाशांनी गारेगार आल्हाददायक प्रवास एसी लोकलने केला. यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३७ टक्क्यांनी वाढल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आज दिली.
मुंबईत दमट हवामान त्यातच उन्हाळ्यात आला की, लोकलच्या प्रवास नागरिकांना नकोसा वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धावत घेत आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या दिवसाला सात एसी लोकलच्या ९६ फेऱ्या चालविण्यात येतात. तर मध्य रेल्वेवर पाच एसी लोकल गाड्यांचा ६६ फेऱ्या चालविण्यात येतात.
१ ते ६ मे या सहा दिवसांच्या कालावधीत पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलमधून नऊ लाख १६ हजार ०९३ प्रवाशांनी प्रवास केला आहे. शनिवार आणि रविवारी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या ५३ फेऱ्या चालविण्यात येतात. ४ मे रोजी ७५ हजार १५४ आणि ५ मे रोजी एक लाख ११ हजार ६२० प्रवाशांनी एसी लोकलचा लाभ घेतला.
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने एसी लोकलचा पास काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये तीन हजार ७३७ प्रवाशांनी सोमवारी एसी लोकलचा मासिक पास काढला. तर दरदिवशी एसी लोकलचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण २८ हजार २७९ पोहोचली आहे.
मध्य रेल्वेवरही चांगला प्रतिसाद
मध्य रेल्वेवरही एसी लोकलची प्रवासी संख्या वाढते आहे. गेल्या वर्षी ६ मे रोजी केवळ २६ हजार ८३४ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला होता. यंदाच्या ६ मे रोजी तब्बल एक लाख ४० हजार ९४४ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला.
