महिला गटात शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर) विजयी तर पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) सलग दुसऱ्यांदा विजयी
अनिल ठाणेकर
ठाणे : श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर) या संघाने अंतिम विजेतेपद मिळवले. तर, पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) ह्या संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेतेपद पटकावले.
महिला गटात मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेऊन अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या २८-२३ असा ५ गुणांनी पराभव केला. शिवशक्ती महिला संघाने ओलीसुकी जिंकून क्रीडांगणाची निवड केली. प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या अंकिता पिसाळने प्रथम चढाई केली. शिवशक्ती महिला संघाच्या समृद्धी भागतने आपल्या संघाकडून प्रथम चढाई प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या उजव्या कोपऱ्या रक्षकाला टिपत आपल्या संघाच्या गुणांचे खाते उघडले. प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून त्यांच्या तिसऱ्या चढाईत अंकिता पिसाळ ने गुण मिळवत आपल्या संघाच्या गुणांचे खाते उघडले. दोन्ही संघ अतिशय सावध खेळ करीत होते. प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या अंकिता पिसाळ व हर्षा शेट्टी ह्या चढाईपट्टूनी खोलवर चढाया करीत मध्यन्तराला काही मिनिटे असताना शिवशक्ती महिला संघावर लोण चढविला व माधनत्रला ११-०८ अशी ३ गुणांची आघाडी घेतली. मध्यन्तलानंतर शिवशक्ती महिला संघाने अतिशय संयमी व सुंदर डावपेचाचे प्रदर्शन करीत फक्त बोनस गुणांवरभर भर देत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविली ती अनुभवी अश्या रक्षा नारकर व पौर्णिमा मेचे यांच्या खेळाने. सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना शिवशक्ती महिला संघाने दोन गुणांची आघाडी घेतली व सामना संपेपर्यंत ती आघाडी कायम ठेवीत अंतिम विजेतेपद मिळवले. प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून अंकिता पिसाळ हिने एकाकी लढत दिली.
पुरुष गटातील अंतिम फेरी गतवेळीचे विजेते स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध शिव शंकर क्रीडा मंडळ ठाणे या संघात झाली. अतिशय एकतर्फी झालेल्या या सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने शिव शंकर क्रीडा मंडळाचा ४४-१७ असा ९२७ गुणांनी पराभव करीत सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेतेपद पटकावले. सदर सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने ओलीसुकी जिंकून क्रीडांगणाची निवड केली. शिव शंकर क्रीडा मंडळाच्या भूषण घानविंदे याने पहिली चढाई केली व स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या संघाने त्याची यशस्वी पक्कड करीत सामन्यातील पहिल्या गुणांची नोंद केली. स्वस्तिक क्रीडा मंडळाकडून आकाश रूडेल याने प्रथम चढाई करीत आपल्या संघाला दुसरा गुण मिळवून दिला. सामान्याच्या पहिल्या पाच मिनिटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने शिव शंकर क्रीडा मंडळावर पहिला लोण चढविला. नंतरच्या पाच मिनिटात त्यांनी अजून एक लोण देत सामना पूर्णपणे एकतर्फी केला व मध्यन्तराला २८-५ अशी २३ गुणांची भरभक्कम आघाडी घेतली ती आकाश रूडेल ह्याच्या नेत्रदीपक चढाया व पक्कडीत अक्षयने दिलेल्या साथीमुळे. सादर सामना पूर्णतः एकतर्फी झाला. शिव शंकर क्रीडा मंडळाने आपल्या संघाचे खाते उघडण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ घेतला. शिव शंकर क्रीडा मंडळाकडून भूषण घानविंदेने एकट्यानेच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरणाचा समारंभ प्रमुख पाहुणे मा. श्री. राजू भावसार (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू , अर्जुन पुरस्कार विजेते) यांच्या शुभहस्ते झाला. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोरे, उपाध्यक्ष श्री. मिलिंद यादव, चिटणीस श्री. रमण गोरे, उप चिटणीस श्री. संतोष सुर्वे, सहाय्यक चिटणीस श्री. चिंतामणी पाटील, खजिनदार श्री. दिनेश मोरे, विश्वस्त श्री. कृष्णा डोंगरे, विश्वस्त श्री. प्रभाकर सुर्वे, विश्वस्त श्री. रवींद्र आंग्रे, ,विशवस्त श्री. केशव मुकणे हे उपस्थित होते.
स्पर्धेतील पारितोषिके :
महिला गट :अंतिम विजेता : शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर), अंतिम उपविजेता : प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे), उप उपांत्य विजेता : कर्नाळा क्रीडा (रायगड) व स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), स्पर्धेतील सर्वोत्कुष्ट खेळाडू : प्रतीक्षा तांडेल (शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर), स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू : हर्षा शेट्टी (प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन, पुणे), स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पक्कडपट्टू : अंकिता चव्हाण (प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन, पुणे), अंतिम दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू : रचना म्हात्रे (कर्नाळा क्रीडा, रायगड), अंतिम दिवसाचा उत्कुष्ट पक्कडपट्टू : शर्वरी गोडसे (स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर).
पुरुष गट : अंतिम विजेता : स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), अंतिम उपविजेता : शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे), उप उपांत्य विजेता : विजय काल्हेर (ठाणे) व मिडलाईन कर्जत (रायगड), स्पर्धेतील सर्वोत्कुष्ट खेळाडू : राज साळुंखे (स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू : आकाश रूडेल (स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर), स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पक्कडपट्टू : अमर डुबरे (शिव शंकर क्रीडा मंडळ ठाणे), अंतिम दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू : कौस्तुभ शिंदे (शिव शंकर क्रीडा मंडळ ठाणे), अंतिम दिवसाचा उत्कुष्ट पक्कडपट्टू : प्रतीक बैलमारे (मिडलाईन कर्जत, रायगड).
