वाचक मनोगत
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आलेल्या निकालाचे फिर्यादी आणि आरोपी अशा दोन्ही पक्षांनी स्वागत केले असले, तरी या प्रकरणात अपेक्षित न्याय झाला असे दोन्ही पक्षांना वाटत नाही ज्यामुळे हे दोन्ही पक्ष उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार आहेत. प्रखर विज्ञानवादी, चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे सारख्या सांस्कृतिक शहरात भर दिवसा गोळ्या घालून हत्या केली जाते आणि त्याचा निकाल जाहीर होण्यासाठी तब्बल ११ वर्षे लागावीत ही बाबच मुळात खटकणारी आहे. मात्र हा निकाल लागल्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांतून असे लक्षात येते कि हा विलंब लागण्यामध्ये फिर्यादी पक्षच कारणीभूत ठरला आहे. या हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने आपला तपास पूर्ण करून चार्जशीट फाईल केली त्यानंतर त्याला पुरवणी चार्जशिटही जोडल्या गेल्या; मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप बाहेर असल्याचे दाभोलकर कुटुंबियांकडून पुन्हा पुन्हा सांगण्यात येत होते. या सर्वांमध्ये पुढे सात ते आठ वर्षे निघून गेली आणि आज ११ वर्षानंतर या हत्या प्रकरणाचा निकाल समोर येतो आहे. या प्रकरणाचा तपास भरकटवण्यामागेही दाभोलकर परिवार कारणीभूत आहे आणि तपासाची दिशा भरकटल्यामुळेच खऱ्या आरोपींपर्यंत तपास यंत्रणा पोहोचू शकल्या नाहीत परिणामी हाती आलेल्या ३ आरोपीना निर्दोष सोडण्याची नामुष्की ओढवली गेली असेही काही कायदेतज्ञांकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील तपास यंत्रणा पुरेशा सक्षम आहेत, अनेक क्लिष्ट प्रकरणांचा छडा आपल्या तपस यंत्रणांनी आजतागायत लावला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिले असते तर या प्रकरणाचा निकाल केव्हाच लागून खरे आरोपी गजाआड असते. तपास यंत्रणेत हस्तक्षेप केल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव आणल्याने तपासाची दिशा भरकटते आणि खऱ्या आरोपींना मोकळे रान मिळते. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातही असेच काही झाले आहे का याचा शोध घेणे आवश्यक आहे !
सौ. मोक्षदा घाणेकर,
काळाचौकी, मुंबई