मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धुळे : पाचशे रुपयांचे सिलेंडर अकराशे रुपये केले. आदिवासी शेतकऱ्यांना तुम्ही मारहाण केली. शेतकऱ्यांच्या सगळ्याच वस्तू मोदींनी महाग केल्या. मोदी है तो मुमकिन है लेकिन टॅक्स बढाने के लिए. आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनले नसते, अशी जोरदार टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे यांची सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ही निवडणूक अत्यंत मोठी आहे. देशाला घडवणारी ही निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवले आहे ते वाचवणं हे आपलं काम आहे. लोकशाही वाचवणे हे आपले काम आहे. लोकशाही नसेल, संविधान नसेल तर आपल्याला कोणीही विचारणार नाही.
खोटं बोलणं ही मोदींची सवय
स्वातंत्र्यापूर्वी आदिवासी, दलित, गरीब गुलामासारखे जगत होते. मात्र तीच परिस्थिती मोदी आणि शाह यांना मत दिल्यास निर्माण होईल. नंदुरबारमध्ये इंदिरा गांधींनी पाय ठेवल्यावर संपूर्ण हिंदुस्तान हालला होता. मी एकाच पक्षात काम केले आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षात कधीही गेलो नाही. लोकशाहीत संविधान वाचवण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. संविधान संपवण्यासाठी हे निवडणूक लढवीत आहे. तुमचे आणि आमचे मालक जनता आहे. खोटं बोलणं ही मोदींची सवय आहे. आम्ही मोदींना खोटे बोलतो, खोटं नाही म्हटलं तर काय म्हटलं पाहिजे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पहिल्यांदा सत्ता आल्यावर विदेशातील काँग्रेसवाल्यांनी ठेवलेला काळा पैसा मी देशात आणेल हे पहिलं खोटं नरेंद्र मोदी बोलले. दुसऱ्यांदा प्रत्येक तरुणाला दरवर्षी दोन करोड नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना दरवर्षी उत्पन्न देण्याचे सांगितले होते.
मात्र सगळ्यांच्या किमती दुप्पट झाल्या मात्र उत्पन्न दुप्पट झाले नाही. मोदींनी कधीही धुळ्यातील किंवा नंदुरबारच्या कापसाचे कपडे घातले नाही. ते परदेशातील कपडे घालतात. म्हणून मी नेहमी मोदींना खोट्यांचे सरदार म्हणतो.
…तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनले नसते
पाचशे रुपयांचे सिलेंडर अकराशे रुपये केले. आदिवासी शेतकऱ्यांना तुम्ही मारहाण केली. शेतकऱ्यांच्या सगळ्याच वस्तू मोदींनी महाग केल्या. मोदी है तो मुमकिन है लेकिन टॅक्स बढाने के लिए. आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनले नसते. देशाला इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेते हवेत. देशाला मजबूत करायचे आहे. मात्र तुम्ही प्रत्येकाला त्रास देत आहात.
मतदान मागायचे असेल तर तुमच्या कामावर मागा
एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण हे मोदींना साष्टांग नमस्कार घालतात. मी खोटे बोलत नाही आणि रेटूनही बोलत नाही. देशासाठी काँग्रेस लढले मात्र कशाला भाजपला मतदान करतात. अनेकांनी शाळा सोडली, कॉलेज सोडले. अनेकांनी गांधींच्या खांद्याला खांदा लावून देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. नरेंद्र मोदी हिंदू मुसलमानांमध्ये वाद निर्माण होतील एवढेच बोलतात. विकासाबद्दल बोलत नाही मात्र तुम्ही जे केलं ते सांगा. मतदान मागायचे असेल तर तुमच्या कामावर मागा, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
जे रोड शो करतात ते देशाचा विकास करू शकत नाही
लोकांना तुम्ही काही वेळासाठी मूर्ख बनवाल. मात्र सर्व काळासाठी मूर्ख बनवू शकत नाहीत. लोक आता हुशार झाले आहेत. मोदी आता 400 पार म्हणत आहेत. मात्र ते 40 पार देखील होणार नाहीत. मोदींना आणि भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी जे करता येईल ते आम्ही करू. महाराष्ट्रात आमच्या सर्वाधिक जागा येतील. नरेंद्र मोदी रोड शो करतात. पंतप्रधान कधीतरी येत होते मात्र आता हे एक गल्लीही सोडत नाही. जे रोड शो करतात ते देशाचा विकास कधीच करू शकत नाही.
