मुंबई : राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळे हे एकत्र येणे केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे, असे नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे. वस्तुतः देशहितासाठी जो कोणी आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाचे आम्ही सहर्ष स्वागतच करू, अशी राजकी बात पंतप्रदान नरेंद्र मोदींनी राज ठाकरेंच्या पाठिंब्याबाबत सांगितली.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी भूमिका जाहीर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मनसेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याचे म्हटले. मनसेच्या पाठिंब्यांचे राज्यातील महायुतीकडून स्वागत करण्यात आले.
लोकांच्या मनात प्रश्न आहे की, भाजपला विजयाची एवढी खात्री होती तरी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत का घेतले?, असा प्रश्न लोकमतच्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरे आम्हाला नवीन नाहीत, असे मोदींनी म्हटले. मी आधी सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्य प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षापासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत, मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते, असे मोदींनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत मनसे निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. मात्र, भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभाही घेण्यास राज यांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार, आत्तापर्यत कल्याण, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील कणकवली, आणि पुणे अशा तीन ठिकाणी राज ठाकरेंच्या सभा झाल्या आहेत.
