मुंबई: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या सोमवारी १३ मे रोजी देशभरातली ९६ लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे. रावसाहेब दानवे, अमोल कोल्हे, आढळराव पाटील, पंकजा मुंढे, चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलिल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर आदी दिग्गज निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
मतदानाचे आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. एकुण सात टप्प्यात ५४३ लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहेत. पाचव्या टप्यात मुंबई, ठाणे नाशिकसह महाराष्ट्रातील उर्वरीत जागांसाठी मतदान होणार आहे. उद्या नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात आज नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.
जालन्यातून भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रसचे कल्याण काळे यांच्यात लढत होणार आहे. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील, छ.संभाजीनगर मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. येथून एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, मविआकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपाम भुमरे यांचं नाव आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेतून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुण्यातून मविआतून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि महायुतीतून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितमधून वसंत मोरे निवडणूक लढवणार आहे. शिरूर मतदारसंघातून मविआतून पवार गटाचे अमोल कोल्हे, अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे निलेश लंके निवडणूक लढवणार आहेत. नंदूरबार मतदारसंघातून महायुतीतून भाजपच्या हिना गावित तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगाव मतदारसंघातून महायुतीतून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीतून करण पाटील पवार यांच्यात लढत होईल.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मविआतून ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदे गटातील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यंदा पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहे, तर मविआकडून पवार गटाचे बजरंग सोनावणे उभे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशमध्ये २५ , छत्तीसगडच्या ५, झारखंडमधल्या ४, मध्य प्रदेशमधल्या ८, महाराष्ट्रातील ११, ओडिशातल्या ४, तेलंगणामधील १७,, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालच्या ८ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांचा निकाल ४ जूनला लागणार आहे.
